YouVersion Logo
Search Icon

फिलेमोन 1

1
1ख्रिस्त येशूंचा बंदिवान पौल आणि आपला बंधू तीमथ्य,
आमचा प्रिय मित्र आणि सहकारी फिलेमोन— 2आमची बहीण अप्फिया आणि आमचा सहसैनिक अर्खिप—आणि जी मंडळी तुमच्या घरात जमते त्यांना:
3परमेश्वर जे आपला पिता आणि प्रभू येशू ख्रिस्त यांच्यापासून तुम्हाला कृपा व शांती लाभो.
उपकारस्तुती आणि प्रार्थना
4मी माझ्या प्रार्थनांमध्ये तुझी आठवण करून माझ्या परमेश्वराचे सतत आभार मानतो, 5कारण त्यांच्या सर्व पवित्र लोकांवरील तुझी प्रीती आणि प्रभू येशूंवरील तुझा विश्वास याविषयी मी ऐकले आहे. 6तुला ख्रिस्तात प्राप्त होणार्‍या सर्व चांगल्या गोष्टींचे सखोल ज्ञान होण्यासाठी तुझी आमच्याबरोबर विश्वासामध्ये असलेली भागीदारी कार्यरत व्हावी अशी मी प्रार्थना करतो. 7तुझ्या प्रीतिने मला फार आनंद व प्रोत्साहन प्राप्त झाले आहे, कारण बंधू, तू, प्रभुच्या लोकांची अंतःकरणे ताजीतवानी केली आहेस.
पौलाची अनेसिमसाठी विनंती
8यास्तव, जे योग्य आहे ते तू करावे म्हणून तुला आज्ञा देण्याचे जरी मला ख्रिस्ताद्वारे धैर्य आहे, 9तरी मी पौल—वृद्ध मनुष्य, ख्रिस्त येशूंचा बंदिवान तुला प्रीतीस्तव विनंती करण्याचे पसंत करतो. 10माझी विनंती माझा पुत्र अनेसिम जो मी बंधनात असताना माझा आत्मिक पुत्र झाला त्याच्या संदर्भात आहे. 11तो यापूर्वी तुला उपयोगी नव्हता, परंतु आता तो आपल्या दोघांनाही तुला व मला उपयोगी आहे.
12तो माझा प्राण आहे—त्याला मी तुझ्याकडे—परत पाठवीत आहे. 13शुभवार्तेमुळे मी या बंधनात असताना माझी मदत करण्यासाठी त्याने तुझी जागा घेतली असती आणि त्याला येथेच ठेवणे मला आवडले असते. 14परंतु तुझ्या संमतीशिवाय काहीही करणे मला योग्य वाटले नाही, यासाठी की जे काही औदार्य तू करशील ते बळजबरीने केल्यासारखे नसावे परंतु स्वेच्छेने केलेले असावे. 15कदाचित या कारणासाठी तो थोडा काळ तुझ्यापासून वेगळा झाला असेल यासाठी की तू त्याला सर्वकाळसाठी प्राप्त करून घ्यावे. 16परंतु येथून पुढे दास नव्हे, तर दासापेक्षा योग्य, प्रिय बंधू असे व्हावे. तो मला अतिशय प्रिय आहे, परंतु व्यक्तिगत रीतीने आणि प्रभुमध्ये बंधू या दोन्हीही नात्याने तो तुला अधिक प्रिय आहे.
17यास्तव जर तू मला भागीदार समजत असशील, तर जसे तू माझे स्वागत केले असते, तसेच त्याचे कर. 18जर त्याने काही अयोग्य कृत्य केले असेल अथवा तो तुझा कर्जदार असेल तर ते मूल्य माझ्या हिशोबी मांड. 19हे, मी पौल, माझ्या हाताने लिहित आहे. मी त्याची परतफेड करीन—वास्तविक तू स्वतः माझे ॠण आहेस परंतु मी त्याचा उल्लेख करणार नाही. 20बंधू, माझी इच्छा आहे की प्रभुमध्ये मला तुझ्याकडून काही लाभ व्हावा; माझ्या अंतःकरणाला ख्रिस्तामध्ये ताजेतवाने कर. 21तू आज्ञापालन करशील याची खात्री बाळगून मी तुला हे लिहिले आहे आणि जे मी तुला सांगत आहे त्यापेक्षा तू कितीतरी अधिक करशील हे मला माहीत आहे.
22आणि आणखी एक गोष्ट: माझ्यासाठी पाहुण्यांची खोली तयार ठेव, कारण तुझ्या प्रार्थनेचे उत्तर म्हणून माझ्या येण्याने तुझी भरपाई होईल अशी मी आशा करतो.
23ख्रिस्त येशूंमध्ये माझा सहबंदीवान एपफ्रास तुला शुभेच्छा पाठवितो.
24आणि मार्क, अरिस्तार्ख, देमास व लूक हे जे माझे सहकारी, हेही तुला शुभेच्छा पाठवितात.
25आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुमच्या आत्म्याबरोबर असो.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in