YouVersion Logo
Search Icon

नीतिसूत्रे 10

10
शलोमोनाची नीतिसूत्रे
1शलोमोनाची नीतिसूत्रे:
शहाणा मुलगा त्याच्या पित्याला सुखी करतो,
परंतु मूर्ख मुलगा त्याच्या आईला दुःख देतो.
2दुष्टाईने मिळविलेल्या संपत्तीस कायमचे मूल्य नसते
परंतु धार्मिकता मृत्यूपासून सोडविते.
3याहवेह नीतिमान मनुष्याची उपासमार होऊ देत नाहीत,
परंतु दुष्टांची लालसा ते विफल करतात.
4आळशी हात दरिद्री आणतो,
परंतु उद्योगी हात समृद्धी आणतो.
5जो उन्हाळ्यात धान्याचा संचय करतो तो शहाणा पुत्र होय;
परंतु जो कापणीच्या हंगामात झोपून राहतो, तो लज्जेचे कारण होतो.
6आशीर्वाद हे नीतिमानाच्या मस्तकावरील मुकुट आहेत,
परंतु दुष्ट मनुष्याच्या मुखात हिंसाचार दडलेला असतो.
7आशीर्वाद देण्यासाठी धार्मिक मनुष्याच्या नावाचा उपयोग करतात,#10:7 पहा उत्प 48:20.
परंतु दुष्ट मनुष्याचे नाव सडून नाहीसे होते.
8सुज्ञ अंतःकरणाचा मनुष्य आज्ञेचे पालन करतो,
परंतु मूर्खपणाची बडबड करणार्‍या नाश होतो.
9सात्विक व सरळ जीवन जगणारा निर्भयतेने चालतो,
परंतु जो वाकड्या मार्गानी चालतो तो पकडला जाईल.
10जो दुष्टतेने डोळे मिचकावितो तो दुःखाचे कारण होतो,
परंतु मूर्खपणाची बडबड करणार्‍या नाश होतो.
11नीतिमान मनुष्याचे मुख जीवनाचा झरा आहे,
परंतु दुष्टाचे मुख हिंसाचाराचे कोठार आहे.
12द्वेष कलहास चेतावणी देतो;
परंतु प्रीती सर्व अपराधांवर आच्छादन टाकते.
13बुद्धिमानाच्या ओठावर सुज्ञान वास करते,
परंतु विवेकहीन माणसाच्या पाठीला काठीच योग्य ठरते.
14सुज्ञ ज्ञानाचा साठा करतात,
परंतु मूर्खाचे तोंड नाश ओढवून घेते.
15धनवानाचे धन हे त्यांचे तटबंदीचे नगर आहे,
दारिद्र्य गरिबाचा नाश आहे.
16नीतिमान मनुष्याचे वेतन जीवन आहे,
परंतु दुष्ट मनुष्याचे कमाई पाप आणि मृत्यू हेच आहेत.
17जो शिस्तीचे पालन करतो तो जीवनाचा मार्ग दाखवितो
परंतु जो सुधारणा नाकारतो, तो दुसर्‍यांची दिशाभूल करतो.
18जो लबाडीच्या ओठांनी आपला द्वेष गुप्त ठेवितो,
आणि चहाडी करीत फिरतो, तो मूर्ख होय.
19शब्द बहुगुणित करून पापाचा अंत होत नसतो;
पण सुज्ञ लोक त्यांच्या जिभेवर ताबा ठेवतात.
20नीतिमान मनुष्याची जिव्हा उत्तम चांदीप्रमाणे असते;
परंतु दुष्टाच्या अंतःकरणास क्षुल्लक किंमत असते.
21नीतिमान मनुष्याचे ओठ अनेकांचे पोषण करतात;
परंतु मूर्ख लोक विवेकाच्या अभावी नाश पावतात.
22याहवेहच्या आशीर्वादाने धनसंपत्ती मिळते,
त्यासाठी दुःखद परिश्रम करावे लागत नाहीत.
23दुष्कर्म करण्यात मूर्खाला मौज वाटते,
परंतु सुज्ञ मनुष्य सुज्ञानात आनंदित होतो.
24दुष्ट ज्याला भितो, तेच त्याच्यावर येईल;
नीतिमान मनुष्याच्या इच्छा फलद्रूप होतील.
25वावटळ येते आणि निघून जाते, तसा दुष्ट नाहीसा होतो,
परंतु नीतिमान सर्वकाळ स्थिर उभा राहतो.
26जशी आंब दातांस आणि धूर डोळ्यास,
तसा आळशी मनुष्य त्याला पाठविणाऱ्यास आहे.
27याहवेहचे भय बाळगल्याने मनुष्याचे आयुष्य वाढते,
परंतु दुष्टांच्या आयुष्याची वर्षे कमी केली जातील.
28नीतिमानाची अपेक्षा त्याला आनंद देते,
परंतु दुष्टाची आशा फोल ठरते.
29याहवेहचा मार्ग निर्दोष मनुष्याचे आश्रयस्थान आहे,
परंतु जे दुष्कर्म करतात त्यांच्यासाठी तो नाश आहे.
30नीतिमान लोक कधीही उपटून टाकले जाणार नाहीत,
परंतु दुष्ट लोक भूमीवर राहणार नाहीत.
31धार्मिक मनुष्याच्या मुखाद्वारे सुज्ञानाचे फळ निघते;
परंतु विकृत जिभेला शांत केले जाईल.
32नीतिमानांच्या ओठास कृपा कशी मिळवावी हे कळते,
परंतु दुष्ट लोकांचे मुख फक्त विकृतीच जाणते.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in