YouVersion Logo
Search Icon

नीतिसूत्रे 9

9
सुज्ञानाचे आणि मूर्खपणाचे आमंत्रण
1सुज्ञानाने आपले घर बांधले आहे;
तिने तिचे सात खांब तयार केले आहेत.
2तिने तिच्याकडील मांसाहारी भोजन आणि तिचा द्राक्षारस तयार केला आहे;
तिने तिचा मेजसुद्धा सजविलेला आहे.
3तिने तिच्या दासांना बाहेर पाठवले आहे आणि ती
नगराच्या सर्वात उच्च स्थानावरून हाक मारते,
4“जे साधे भोळे आहेत, त्या सर्वांनी माझ्या घरी यावे!”
जे विवेकशून्य आहेत त्यांना ती म्हणते,
5“इकडे या, माझे भोजन खा
आणि मी मिसळलेला द्राक्षारस प्या.
6तुमचे साधेभोळेपण सोडून द्या म्हणजे तुम्ही जगाल;
अंतर्ज्ञानाच्या मार्गाने चला.”
7जो टवाळखोराची सुधारणा करतो, तो अपमानास आमंत्रण देतो;
जो दुष्टाला धमकावितो त्याला अपशब्द ऐकावे लागतात.
8टवाळखोरांची कान उघाडणी करू नकोस, नाहीतर ते तुझा द्वेष करतील,
सुज्ञ माणसांची कान उघाडणी कर आणि ते तुजवर प्रीती करतील.
9सुज्ञ मनुष्याला बोध कर म्हणजे ते अधिक ज्ञानी होतील;
नीतिमानाला शिक्षण दे आणि ते त्यांच्या शिक्षणात भर घालतील.
10याहवेहचे भय हा सुज्ञानाचा प्रारंभ होय,
आणि पवित्र परमेश्वराचे ज्ञान असणे हा सुज्ञपणा होय.
11कारण सुज्ञतेद्वारे तुझ्या आयुष्याचे दिवस बहुगुणित होतील,
आणि तू उदंड आयुष्य जगशील.
12जर तू सुज्ञ असशील, तर तुझे सुज्ञान तुला बक्षीस देईल;
जर तू टवाळखोर आहेस, तर तू एकटाच यातना भोगशील.
13मूर्खपणा एक स्वैर स्त्री आहे;
ती साधीभोळी आहे आणि तिला काहीच समज नाही.
14ती तिच्या घराच्या दारात बसून राहते,
तसेच नगराच्या सर्वात उंच ठिकाणावर ती बसते.
15तिच्याजवळून जाणाऱ्या,
जे सरळ त्यांच्या मार्गाने जातात, त्यांना ती बोलाविते,
16“जे साधे भोळे आहेत त्या सर्वांनी माझ्या घरी यावे!”
जे विवेकशून्य आहेत त्यांना ती म्हणते,
17“चोरलेले पाणी गोड लागते;
गुप्तपणे खाल्लेले अन्न चविष्ट लागते!”
18परंतु त्यांना हे माहीत नसते की तिथे मेलेले लोक आहेत,
आणि तिचे पाहुणे आता मृतांच्या खोल जगात आहेत.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in