नीतिसूत्रे 8
8
सुज्ञानाची हाक
1सुज्ञान हाक मारीत नाही काय?
समंजसपणा तिचा आवाज उंचावत नाही का?
2रस्त्याच्या कडाला असलेल्या सर्वात उंच जागेवर,
जिथे रस्ते जोडले जातात, तिथे ती उभी राहते;
3शहरात जाणार्या वेशीच्या बाजूला,
प्रवेशद्वाराजवळ ती ओरडून सांगते:
4“अहो लोकांनो, मी तुम्हाला बोलाविते;
सर्व मानवजातीला उद्देशून मी माझा आवाज उंचाविते.
5तुम्ही जे साधे भोळे आहात, समंजसपणा मिळवा;
तुम्ही जे मूर्ख आहात, तुमचे लक्ष तिच्याकडे#8:5 किंवा तुमच्या मनांना ताकीद द्या लावा.
6ऐका! कारण मला काही विश्वसनीय गोष्टी सांगावयाच्या आहेत;
योग्य ते सांगण्यासाठीच मी माझे मुख उघडते.
7माझे मुख सत्य बोलते,
कारण माझे ओठ वाईटाचा तिरस्कार करतात.
8माझ्या मुखातील सर्व शब्द नीतियुक्त आहेत;
त्यातील कोणतेही कुटिल किंवा विकृत नाहीत.
9जे समजूतदार आहेत त्यांच्यासाठी ते योग्य आहेत;
ज्यांना ज्ञान प्राप्त झाले आहे त्यांना माझी वचने सुबोध आहेत.
10चांदीऐवजी माझ्या शिक्षणाची,
आणि उत्कृष्ट सोन्यापेक्षा ज्ञानाची निवड कर.”
11कारण सुज्ञान माणकांपेक्षा उत्तम आहे;
तुला आवडणाऱ्या इतर कशाशीही तिची तुलना करता येणार नाही.
12मी, सुज्ञान, सुज्ञतेबरोबर सहवास करते;
ज्ञान आणि विवेक माझ्याकडे आहेत.
13याहवेहचे भय धरणे म्हणजे वाईटाचा द्वेष करणे होय.
गर्विष्ठपणा आणि उद्धटपणा,
वाईट आचरण आणि विकृत भाषण यांचा मी तिरस्कार करते.
14सल्ला आणि अचूक न्याय माझे आहेत;
माझ्याकडे अंतर्ज्ञान आणि शक्ती आहे.
15माझ्याद्वारे राजे राज्य करतात,
आणि शासन करणारे योग्य तो हुकूमनामा देतात;
16माझ्याच साहाय्याने अधिपती,
आणि थोर—पृथ्वीवरील सर्व नीतिमान शासक अधिकार चालवितात.
17जे माझ्यावर प्रीती करतात त्यांच्यावर मी प्रीती करते,
आणि जे माझा शोध घेतात त्यांना मी सापडते.
18माझ्याजवळ समृद्धी आणि सन्मान,
कायम टिकणारी संपत्ती आणि वैभव आहे.
19माझे फळ शुद्ध सोन्यापेक्षा चांगले आहे;
आणि माझ्याद्वारे उत्पन्न झालेले उत्कृष्ट चांदीपेक्षा उत्तम आहे.
20मी नीतिमत्वाच्या मार्गाने चालते,
आणि न्याय्यमार्गाला धरून राहते,
21माझ्यावर प्रीती करणाऱ्यांना मी समृद्ध वारसा देते.
आणि त्यांची भांडारे मी भरून टाकते.
22याहवेहनी त्यांच्या सृष्टी निर्मितीमध्ये,
त्यांच्या पुरातन कार्यापूर्वी सर्वप्रथम माझी रचना केली;
23अनादिकालापासून माझी रचना केलेली होती.
जेव्हा जग अस्तित्वात आले तेव्हाच.
24जेव्हा महासागर नव्हते, माझा जन्म झाला होता,
तेव्हा ओसांडून वाहणारे झर्यांचे पाणीही नव्हते;
25पर्वत त्यांच्या जागेवर स्थिर झाले नव्हते,
डोंगर निर्माण होण्यापूर्वी माझा जन्म झाला होता,
26त्यांनी पृथ्वी किंवा तिच्यावरील शेती
किंवा पृथ्वीवरील धूळ निर्माण करण्यापूर्वी,
27त्यांनी जेव्हा आकाशास त्याच्या ठिकाणी स्थापित केले,
जेव्हा त्यांनी महासागरावर क्षितिजाची सीमा निश्चित केली तेव्हा मी तिथे होते,
28जेव्हा त्यांनी वर अंतराळात ढगांची प्रस्थापना केली
आणि पृथ्वीगर्भातील झर्यांना घट्ट बसविले,
29जेव्हा त्यांनी सागरांना त्यांच्या मर्यादा घालून दिल्या,
जेणेकरून पाणी त्यांच्या आदेशाचे उल्लंघन करणार नाही.
जेव्हा त्यांनी पृथ्वीचा पाया घातला,
30तेव्हा मी सतत#8:30 किंवा लहान मूल होते त्यांच्याभोवती होते;
दिवसेंदिवस मी आनंदाने भरून गेले होते.
नेहमी त्यांच्या उपस्थितीचा आनंद मी घेत होते,
31त्यांच्या संपूर्ण जगामध्ये मी आनंदात आहे
आणि मानवजातीमध्ये आनंद करीत आहे.
32“आणि म्हणून मुलांनो, माझे ऐका,
कारण जे माझी शिकवण आचरतात, ते खूप आशीर्वादित होतात.
33माझे शिक्षण कान देऊन ऐका आणि शहाणे व्हा;
त्याचा अव्हेर करू नका.
34जे व्यक्ती माझे ऐकतात ते धन्य आहेत,
ते रोज माझ्या दारांवर लक्ष ठेऊन,
माझ्या दारावर प्रतीक्षा करतात.
35कारण ज्याला मी सापडते, त्याला जीवन सापडते,
आणि त्याला याहवेहकडून कृपादृष्टी मिळते.
36परंतु जे माझा शोध घेण्यास चुकतात, ते स्वतःचे नुकसान करून घेतात;
जे सर्व माझा तिरस्कार करतात, ते मृत्यूची आवड धरतात.”
Currently Selected:
नीतिसूत्रे 8: MRCV
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.