YouVersion Logo
Search Icon

नीतिसूत्रे 30

30
आगूरची नीतिसूत्रे
1मस्सा याकेहाचा पुत्र आगूराची आत्मप्रेरित वचने.
या मनुष्याने इथिएल व उकाल यांना उद्देशून असे बोलले आहे:
“परमेश्वरा, मी थकलो आहे,
तरीही मी जिंकू शकतो.
2मी फक्त पशुतुल्य आहे, मनुष्य नाही;
मला मानवी समज नाही.
3मी सुज्ञता शिकलो नाही,
तसेच मला पवित्र परमेश्वराचे ज्ञानही नाही.
4वर स्वर्गात कोण चढून गेला आणि मग खाली उतरला आहे?
वार्‍याला मुठीमध्ये धरलेला असा कोण आहे?
अंगरख्यामध्ये कोणी पाणी बांधले आहे काय?
पृथ्वीच्या सर्व सीमांची स्थापना कोणी केली आहे?
त्याचे नाव काय आहे आणि त्याच्या पुत्राचे नाव काय आहे?
तुम्हाला ते निश्चितच माहीत आहे!
5“परमेश्वराचा प्रत्येक शब्द दोषरहित आहे;
जे त्यांच्याकडे आश्रय घेतात, त्यांची ते ढाल आहेत.
6त्यांच्या वचनात भर घालू नका.
नाहीतर ते तुम्हाला रागावतील आणि तुम्ही लबाड आहात हे सिद्ध होईल.
7“हे याहवेह, मी दोन कृपादानांची याचना करतो;
माझ्या मरणापूर्वी मला नकार देऊ नका:
8कपटी वागणे आणि असत्य बोलणे यापासून मला दूर ठेवा;
मला दारिद्र्य किंवा श्रीमंतीही देऊ नका;
परंतु फक्त माझी रोजची भाकर मला द्या.
9कारण असे होऊ नये, कि मी श्रीमंत झालो तर तुम्हाला विसरेन
आणि म्हणेन, ‘याहवेह कोण आहे?’
किंवा दरिद्री झालो तर कदाचित मी चोरी करेन
आणि माझ्या परमेश्वराच्या नावाची निंदा होईल.”
10दासाविरुद्ध त्याच्या धन्याकडे निंदानालस्ती करू नका;
असे केल्यास तो तुम्हाला शाप देईल आणि तुम्ही दोषी ठराल.
11असे काही लोक आहेत जे त्यांच्या वडिलांना शाप देतात,
आणि त्यांच्या मातांनाही धन्यता देत नाहीत.
12जे लोक आपल्या दृष्टीने स्वतःला शुद्ध समजतात,
तरीपण त्यांची मलिनता त्यांनी स्वच्छ केलेली नसते;
13काही लोकांचे डोळे नेहमीच मग्रुरीत असतात,
ज्यांच्या नजरा तिरस्काराने भरलेल्या असतात;
14पृथ्वीवरील गरिबांना
आणि मानवजातीतील गरजूंना गिळंकृत करण्यासाठी,
त्यांचे दात करवतीसारखे आहेत,
आणि ज्यांच्या जबड्यामध्ये चाकू ठेवलेले आहेत.
15“जळूला दोन मुली आहेत.
‘दे! दे!’ असे त्या ओरडतात.
“अशा तीन गोष्टी आहेत त्या कधीही समाधानी नसतात,
‘पुरे झाले!’ असे कधीही न बोलणार्‍या चार गोष्टी आहेत:
16अधोलोक
आणि वांझ गर्भाशय;
भूमी, जिचे पाण्याने कधीही समाधान होत नाही,
अग्नी, जो कधीही म्हणत नाही, ‘पुरे झाले!’
17“आपल्या वडिलांचा चेष्टा करणारे डोळे,
आणि वृद्ध आईचा तिरस्कार करणारे डोळे,
दरीतील डोमकावळे टोची मारून बाहेर काढतील,
त्यांची शरीरे गिधाडे खातील.
18“मला फारच आश्चर्यचकित करणार्‍या तीन गोष्टी आहेत.
चार गोष्टी मला समजत नाहीत:
19गरुडाचा आकाशातील मार्ग,
खडकावरून सरपटणारा साप,
खवळलेल्या समुद्रात तरंगणारे जहाज,
पुरुषाचा तरुणीशी संबंध?
20“व्यभिचारी स्त्रीचा मार्ग असा आहे:
ती खाऊन तोंड पुसते,
आणि म्हणते, ‘मी काहीच वाईट केले नाही.’
21“तीन गोष्टीमुळे पृथ्वी हादरते,
चार गोष्टी ती सहन करू शकत नाही:
22एक नोकर जो राजा होतो,
देवहीन मूर्ख ज्याला भरपूर खाण्यास मिळते,
23तिरस्करणीय स्त्री जी विवाहबद्ध होते,
आणि एक मोलकरीण तिच्या मालकिणीची जागा घेते.
24“पृथ्वीवर चार लहान जीव आहेत,
तरी त्या अत्यंत बुद्धिमान आहेत:
25मुंग्या, दुर्बल प्राणी आहेत,
तरीही उन्हाळ्यात ते त्यांचे धान्य साठवून ठेवतात;
26खडकातील ससे अगदी नाजूक प्राणी!
तरी ते खडकात स्वतःचे घर बनवतात;
27टोळांना त्यांचा राजा नसतो,
तरी ते टोळीटोळीने एकत्र पुढे चाल करतात;
28पाल, त्यांना हाताने पकडणे शक्य आहे,
तरीपण त्या राजांच्या महालात सापडतात.
29“तीन गोष्टी आहेत, ज्यांची चाल अत्यंत डौलदार असते,
चार प्राणी ज्यांची हालचाल डौलदार असते:
30सिंह, सर्व प्राण्यात सामर्थ्यशाली, तो कोणाही समोर मागे सरत नाही;
31तोऱ्यात चालणारा एक कोंबडा,
बोकड,
आणि बंडखोरीविरुद्ध सुरक्षित असलेला राजा.
32“जर तू आत्मप्रशंसेने फुगून मूर्खपणा केला असशील
किंवा दुष्ट योजना आखली असशील,
तर हातांनी आपले तोंड झाकून घे.
33कारण जसे साय घुसळल्याने लोणी मिळते,
व नाक पिळण्याने रक्त निघते,
तसेच क्रोध भडकविल्याने कलह उत्पन्न होतात.”

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in