YouVersion Logo
Search Icon

स्तोत्रसंहिता 143

143
स्तोत्र 143
दावीदाचे एक स्तोत्र.
1हे याहवेह, माझी प्रार्थना ऐका,
कृपा करून माझ्या विनवणीकडे लक्ष द्या,
तुमच्या विश्वासूपणा व नीतिमत्वास अनुसरून
माझ्या मदतीच्या हाकेला उत्तर द्या.
2आपल्या सेवकाचा न्याय करून त्याला शासन करू नका,
कारण जीवितांमध्ये तुमच्यासमोर नीतिमान असा कोणीही नाही.
3माझ्या शत्रूने पाठलाग करून मला पकडले आहे;
त्याने मला जमिनीवर तुडविले आहे;
जसे दीर्घकाळाच्या मृतास ठेवावे,
तसे त्याने मला अंधारात जखडून ठेवले आहे.
4माझा आत्मा निराशेने व्याकूळ झाला आहे;
भीतीने मी हतबल झालो आहे.
5मला पुरातन काळचे स्मरण होत आहे;
तुम्ही केलेल्या अद्भुत कृत्यांचे मी मनन करतो,
आणि तुमचे हस्तकौशल्य माझ्या विचारांचा विषय आहे.
6मी माझे हात तुमच्यापुढे पसरतो;
शुष्क भूमीसारखा माझा जीव तुमच्यासाठी तहानलेला आहे. सेला
7हे याहवेह, त्वरेने मला उत्तर द्या;
माझा आत्मा दुर्बल झाला आहे.
तुम्ही आपले मुख माझ्यापासून लपवू नका,
नाहीतर मी अधोलोकात जाणार्‍यासारखा होईन.
8प्रातःकाळी तुमच्या वात्सल्याचा मला प्रेमसंदेश येऊ द्या,
कारण मी तुमच्यावर विश्वास ठेवला आहे.
माझे जीवन मी तुमच्या हातात सोपविले आहे,
म्हणून मी कोणत्या मार्गाने चालावे ते मला दाखवा.
9याहवेह, मला माझ्या शत्रूच्या तावडीतून सोडवा,
कारण मी तुमच्यामध्ये लपलो आहे.
10तुमच्या इच्छेप्रमाणे वागण्यास मला साहाय्य करा,
कारण तुम्हीच माझे परमेश्वर आहात;
तुमचा उत्तम आत्मा
मला नीतिमार्गाने नेवो.
11हे याहवेह, तुमच्या नावाचे गौरव व्हावे म्हणून माझे जीवन सुरक्षित ठेवा;
तुमच्या नीतिमत्वास अनुसरून या संकटातून मला बाहेर काढा.
12माझ्यावरील तुमच्या अक्षय प्रीतीमुळे माझ्या शत्रूंचा नाश करा;
माझ्या सर्व विरोधकांचा नायनाट करा,
कारण मी तुमचा सेवक आहे.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in