YouVersion Logo
Search Icon

स्तोत्रसंहिता 27

27
स्तोत्र 27
दावीदाचे स्तोत्र.
1याहवेह माझे प्रकाश व माझे तारण आहेत—
मी कोणाचे भय बाळगू?
याहवेह माझ्या जीवनाचे दुर्ग आहेत—
मला कोणाचे भय आहे?
2जेव्हा वाईट लोक मला गिळण्यास
माझ्यावर हल्ला करतील,
तेव्हा माझे शत्रू व माझे विरोधकच
अडखळतील आणि पडतील.
3जरी सैन्याने मजभोवती वेढा घातला,
तरी माझे अंतःकरण भयभीत होणार नाही;
माझ्याविरुद्ध युद्ध जरी पेटले,
तरी मी निश्चिंत राहीन.
4मी याहवेहला एक याचना केली,
हीच माझी आकांक्षा आहे:
मी आयुष्यभर याहवेहच्या
भवनात वस्ती करावी जेणेकरून
मी याहवेहचे सौंदर्य बघून त्यांच्या
मंदिरात ध्यान करावे.
5कारण संकटाच्या दिवसात
ते मला त्यांच्या वसतिस्थानात सुरक्षित ठेवतील;
तेच मला आपल्या निवासमंडपात लपवून ठेवतील;
उंच खडकावर मला सुरक्षा देतील.
6माझ्या सभोवती असणार्‍या
शत्रूंसमोर माझे मस्तक उंच करतील.
मी त्यांच्या पवित्र मंडपात हर्षगर्जना करून यज्ञ अर्पण करेन;
मी गायन व संगीताने माझ्या याहवेहची स्तुती करेन.
7याहवेह, माझी याचना ऐका;
माझ्यावर दया करा आणि मला उत्तर द्या.
8तुमच्याविषयी माझे अंतःकरण म्हणाले, “त्यांचे मुख शोध!”
हे याहवेह, मी तुमचे मुख शोधेन.
9तुम्ही आपले मुख माझ्यापासून लपवू नका,
तुमच्या दासाला रागाने दूर लोटू नका;
तुम्हीच माझे सहायक राहिले आहात;
हे माझ्या तारणकर्त्या परमेश्वरा,
मला नाकारू नका वा माझा त्याग करू नका.
10माझ्या आईवडिलांनी माझा त्याग केला.
तरी याहवेह, माझा स्वीकार कराल.
11याहवेह, मला तुमचे मार्ग शिकवा;
माझी छळणूक करणाऱ्यांमुळे
मला सरळ मार्गावर घेऊन चला.
12मला माझ्या शत्रूंच्या तावडीत सापडू देऊ नका,
कारण खोटी साक्ष देणारे आणि क्रूरपणाने फुत्कारणारे
माझ्याविरुद्ध उठले आहेत.
13मला हा पूर्णपणे विश्वास आहे:
की मी या जीवनातच याहवेहच्या
चांगुलपणाचा अनुभव घेणार.
14याहवेहची प्रतीक्षा कर;
हिंमत बांध, धैर्य धर;
आणि याहवेहचीच प्रतीक्षा कर.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in