YouVersion Logo
Search Icon

स्तोत्रसंहिता 39

39
स्तोत्र 39
संगीत दिग्दर्शकासाठी. यदूथून याकरिता दावीदाचे स्तोत्र.
1मी स्वतःशी म्हणालो, “मी आपले आचरण जपणार
आणि माझी जीभ पापापासून जपणार;
अनीतिमान लोक माझ्याभोवती असतील,
तेव्हा मी माझ्या मुखाला मुसक्या बांधीन.”
2म्हणून मी काही चांगलेही बोललो नाही,
अगदी शांत राहिलो.
पण माझा त्रास वाढतच गेला;
3माझ्या अंतःकरणातील घालमेल अधिकच वाढत गेली,
मी मनन करत असताना, माझ्या अंतःकरणातील अग्नी तप्त होत होता;
तेव्हा मी आपल्या जिभेने बोललो:
4याहवेह, माझ्या जीवनाचा अंत मला दाखवा
आणि माझे किती दिवस बाकी आहेत हे मला दाखवून द्या;
माझे आयुष्य किती क्षणभंगुर आहे ते मला कळू द्या.
5पाहा, तुम्ही माझे दिवस चार बोटे केले आहे;
माझा जीवितकाल तुमच्या दृष्टीने केवळ एका क्षणाचाच आहे;
प्रत्येकजण, अगदी निश्चिंत असणारे लोकसुद्धा
केवळ एक श्वास आहेत. सेला
6निश्चितच प्रत्येकजण खरोखर सावलीप्रमाणेच जगतो;
संपत्ती गोळा करण्याची त्याची सर्व धावपळ ही निरर्थकच,
याचा उपभोग कोण घेईल हे त्याला ठाऊक नाही.
7तर प्रभू, मी आता कोणत्या गोष्टींची प्रतीक्षा करू?
माझी सर्व आशा तुमच्या ठायी आहे.
8माझ्या पातकांपासून माझे रक्षण करा;
मला मूर्खांच्या थट्टेचा विषय होऊ देऊ नका.
9मी शांत राहिलो; मी माझे तोंड उघडले नाही,
कारण तुम्हीच हे केले आहे.
10तुमचा चाबूक माझ्यापासून दूर करा;
तुमच्या हाताच्या प्रहाराने मी म्लान झालो आहे.
11तुम्ही मनुष्याला त्याच्या पापाबद्दल फटके मारून शिस्त लावता,
त्याचे ऐश्वर्य कसर लागलेल्या वस्‍त्रांप्रमाणे निकृष्ट करता;
निश्चितच मनुष्य खरोखर केवळ श्वासमात्र आहे. सेला
12“याहवेह, माझी प्रार्थना ऐका;
माझी मदतीची आरोळी ऐका;
माझ्या अश्रूंकडे दुर्लक्ष करू नका.
माझ्या सर्व पूर्वजांप्रमाणे या पृथ्वीवर प्रवास करणारा
मी एक परदेशीय आणि वाटसरू आहे.
13मी जाण्यापूर्वी, माझ्यावरची तुमची कडक नजर मजपासून फिरवा.
जेणेकरून मी थोड्या काळासाठीच जीवनाचे सुख पुन्हा प्राप्त करू शकेन.”

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in