YouVersion Logo
Search Icon

रोमकरांस 1

1
1मी पौल, ख्रिस्त येशूंचा दास, प्रेषित होण्यास पाचारलेला आणि परमेश्वराच्या शुभवार्तेसाठी वेगळा केलेला 2ज्या शुभवार्तेविषयी पवित्रशास्त्रलेखात त्यांनी आपल्या संदेष्ट्यांद्वारे आधी अभिवचन दिले होते. 3त्यांच्या पुत्राविषयी, जे शारीरिक दृष्टीने दावीदाचे वंशज होते, 4ते आपले प्रभू येशू ख्रिस्त, जे पवित्रतेच्या आत्म्याद्वारे व मृतांच्या पुनरुत्थानाच्या सामर्थ्याने परमेश्वराचे पुत्र ठरविले गेले. 5त्यांच्याद्वारे आम्हाला कृपा व प्रेषितपण मिळाले आहे; ते यासाठी की सर्व गैरयहूदीयांनी त्यांच्या नावाकरिता विश्वासाने आज्ञापालन करणारे व्हावे. 6तुम्ही सुद्धा त्या गैरयहूदीयांमधून येशू ख्रिस्ताचे होण्यासाठी बोलाविलेले आहात.
7रोम मधील सर्वजण, ज्यांच्यावर परमेश्वर प्रीती करतात आणि ज्यांना त्यांचे पवित्र लोक होण्यासाठी पाचारण केले आहे:
परमेश्वर जे आपले पिता व येशू ख्रिस्त आपले प्रभू यांच्यापासून तुम्हाला कृपा व शांती असो.
रोमला भेट देण्याची पौलाची इच्छा
8प्रथम, तुमचा विश्वास जगजाहीर होत आहे, म्हणून मी तुम्हा प्रत्येकासाठी येशू ख्रिस्ताद्वारे माझ्या परमेश्वराचे आभार मानतो. 9ज्या परमेश्वराची सेवा मी माझ्या आत्म्याने व त्याच्या पुत्राच्या शुभवार्तेचा संदेश गाजवून करतो, ते माझे साक्षी आहेत की, मी नेहमीच तुमची आठवण करीत असतो. 10माझ्या प्रार्थनेमध्ये मी सर्वदा प्रार्थना करतो की शेवटी का होईना परमेश्वराची इच्छा असेल तर तुमच्याकडे येण्याचा माझा मार्ग मोकळा व्हावा.
11तुम्ही बळकट व्हावे म्हणून तुम्हाला आध्यात्मिक देणगी प्रदान करावी यासाठी भेटण्यास मी उत्कंठित झालो आहे— 12तर एकमेकांच्या विश्वासाकडून मला व तुम्हालाही उत्तेजन मिळावे. 13बंधूंनो व भगिनींनो, इतर गैरयहूदीयांमध्ये मला जशी पीकप्राप्ती झाली, तशी तुम्हामध्येही व्हावी म्हणून मी तुमच्याकडे येण्याचा अनेकदा निश्चय केला, पण आतापर्यंत मला प्रतिबंध करण्यात आला, हे तुम्हाला कळावे अशी माझी इच्छा आहे.
14कारण ग्रीक व बर्बर, तसेच शहाणे व मूर्ख या दोघांचाही मी ॠणी आहे. 15यामुळे तुम्ही जे रोममध्ये आहात त्या तुम्हालाही शुभवार्ता सांगण्यास मी एवढा उत्सुक झालो आहे.
16शुभवार्तेची मला लाज वाटत नाही, कारण त्यावर विश्वास ठेवणार्‍या प्रत्येकाचे, प्रथम यहूदीयांचे नंतर गैरयहूदीयांचे तारण करण्यास ती परमेश्वराचे सामर्थ्य आहे. 17या शुभवार्तेमध्ये परमेश्वराचे नीतिमत्व प्रकट होते व हे नीतिमत्व विश्वासाने प्रथमपासून शेवटपर्यंत विश्वासाद्वारे#1:17 किंवा विश्वासापासून विश्वासाकडे साध्य होते, कारण असे लिहिले आहे, “नीतिमान विश्वासाने जगेल.”#1:17 हब 2:4
परमेश्वराचा पापी मानवजातीविरुद्ध क्रोध
18जे अनीतीने सत्य दाबून ठेवतात त्या सर्व अधार्मिक आणि दुष्कर्म करणार्‍या लोकांवर परमेश्वराचा क्रोध स्वर्गातून प्रकट होतो, 19परमेश्वराविषयी जे कळले पाहिजे ते त्यांना प्रकट झाले आहे; स्वतः परमेश्वरानेच त्यांना ते प्रकट केले आहे. 20कारण जगाच्या उत्पत्तीपासून, परमेश्वराचे अदृश्य गुण व त्यांचे दैवी अस्तित्व व सनातन सामर्थ्य्याचे ज्ञान, त्यांच्या निर्मीतीद्वारे झालेले आहे, म्हणून त्यांना कोणतीही सबब राहिली नाही.
21परमेश्वराचे ज्ञान त्यांना निश्चित होते, पण त्यांनी परमेश्वर म्हणून त्यांचे गौरव केले नाही अथवा त्यांचे आभारही मानले नाहीत. याउलट त्यांचे विचार पोकळ झाले आणि त्यांची मूर्ख मने अंधाराने व्याप्त झाली. 22ते स्वतःला शहाणे समजत असताना मूर्ख बनले 23आणि मग त्यांनी अविनाशी परमेश्वराच्या गौरवाची अदलाबदल करून, स्वतःसाठी नश्वर मानव, पक्षी, पशू, सरपटणारे प्राणी यांच्या मूर्ती बनविल्या.
24याकरिता परमेश्वरानेही त्यांना हृदयाच्या पापी वासना व सर्वप्रकारच्या लैंगिक अशुद्धतेच्या अधीन होऊ दिले आणि त्यांनी आपल्या शरीराची आपसात मानहानी केली. 25परमेश्वराविषयीच्या सत्याची अदलाबदल त्यांनी खोटेपणाशी केली आणि उत्पन्नकर्त्या ऐवजी उत्पन्न केलेल्या वस्तूंची उपासना व सेवा केली. तो उत्पन्नकर्ता युगानुयुग धन्यवादित आहेत. आमेन.
26या कारणासाठी, परमेश्वराने त्यांना निर्लज्ज वासनांच्या स्वाधीन केले. त्यामुळे त्यांच्या स्त्रियांनी देखील नैसर्गिक लैंगिक संबंधापेक्षा अनैसर्गिक संबंध ठेवले. 27तसेच पुरुषही स्त्रियांबरोबर नैसर्गिक संबंध सोडून एकमेकांविषयीच्या अभिलाषेने कामातुर होऊन, त्यांनी एकमेकांशी लज्जास्पद कर्मे केली, याचा परिणाम असा झाला की त्यांना त्यांच्या अपराधांची योग्य शिक्षा मिळाली.
28यानंतरही, परमेश्वराचे ज्ञान राखून ठेवावे हे त्यांना उचित वाटले नाही, म्हणून परमेश्वरानेही त्यांची मने दुष्टतेच्या स्वाधीन केली, यासाठी की जे करू नये ते त्यांनी करावे. 29सर्वप्रकारचा दुष्टपणा व वाईटपणा, लोभ आणि दुष्टता यांनी ते भरले. ते द्वेष, खुनशीपणा, कलह, खोटेपणा, कटुता आणि कुटाळकी यांनी ते भरून गेले. 30ते निंदक, परमेश्वराचा द्वेष करणारे, उद्धट, गर्विष्ठ आणि बढाईखोर, नव्या वाईट मार्गाचा विचार करणारे, आणि आईवडिलांची आज्ञा न मानणारे झाले; 31ते निर्बुद्धि, विश्वासघातकी, प्रीतिशून्य आणि दयाहीन असे झाले. 32अशा गोष्टी करणार्‍यांना मरण रास्त आहे, हा परमेश्वराच्या नीतिमत्वाचा आदेश ठाऊक असूनही, ते या गोष्टी करीतच राहिले, इतकेच नव्हे तर, जे करतात त्यांनाही मान्यता दिली.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in

Videos for रोमकरांस 1