Logo YouVersion
Eicon Chwilio

योहान 15

15
द्राक्षवेल आणि फाटे
1मीच खरा द्राक्षवेल आहे आणि माझा बाप माळी आहे.
2माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा तो काढून टाकतो; आणि फळ देणार्‍या फाट्याला अधिक फळ यावे म्हणून तो त्या प्रत्येकाला साफसूफ करतो.
3जे वचन मी तुम्हांला सांगितले त्यामुळे तुम्ही आता शुद्ध झालाच आहात.
4तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुमच्यामध्ये राहीन. जसे फाटा वेलात राहिल्यावाचून त्याला आपल्याआपण फळ देता येत नाही तसे माझ्यामध्ये राहिल्यावाचून तुम्हांलाही देता येणार नाही.
5मीच वेल आहे, तुम्ही फाटे आहात; जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो, कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हांला काही करता येत नाही.
6कोणी माझ्यामध्ये राहिला नाही तर त्याला फाट्याप्रमाणे बाहेर टाकतात व तो वाळून जातो; आणि तसले फाटे गोळा करून अग्नीत टाकतात व ते जळून जातात.
7तुम्ही माझ्यामध्ये राहिलात व माझी वचने तुमच्यामध्ये राहिली तर जे काही तुम्हांला पाहिजे असेल ते मागा म्हणजे ते तुम्हांला प्राप्त होईल.
8तुम्ही विपुल फळ दिल्याने माझ्या पित्याचा गौरव होतो; आणि तुम्ही माझे शिष्य व्हाल.
9जशी पित्याने माझ्यावर प्रीती केली तशी मीही तुमच्यावर प्रीती केली आहे; तुम्ही माझ्या प्रीतीत राहा.
10जसा मी आपल्या पित्याच्या आज्ञा पाळून त्याच्या प्रीतीत राहतो तसे तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर माझ्या प्रीतीत राहाल.
11माझा आनंद तुमच्यामध्ये असावा व तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा म्हणून मी तुम्हांला ह्या गोष्टी सांगितल्या आहेत.
12जशी मी तुमच्यावर प्रीती केली तशी तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी अशी माझी आज्ञा आहे.
13आपल्या मित्रांकरता आपला प्राण द्यावा ह्यापेक्षा कोणाची प्रीती मोठी नाही.
14मी तुम्हांला जे काही सांगतो ते तुम्ही कराल तर तुम्ही माझे मित्र आहात.
15मी आतापासून तुम्हांला दास म्हणत नाही; कारण धनी काय करतो ते दासाला ठाऊक नसते; परंतु मी तुम्हांला मित्र म्हटले आहे; कारण जे काही मी आपल्या पित्यापासून ऐकून घेतले ते सर्व मी तुम्हांला कळवले आहे.
16तुम्ही मला निवडले नाही, तर मी तुम्हांला निवडले व तुम्हांला नेमले आहे; ह्यात हेतू हा की, तुम्ही जाऊन फळ द्यावे, तुमचे फळ टिकावे आणि जे काही तुम्ही माझ्या नावाने पित्याजवळ मागाल ते त्याने तुम्हांला द्यावे.
17तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी म्हणून मी तुम्हांला ह्या आज्ञा करतो.
जग व सत्याचा आत्मा
18जग जर तुमचा द्वेष करते तर तुमचा द्वेष करण्यापूर्वी त्याने माझाही केला आहे हे तुम्हांला माहीत आहे.
19तुम्ही जगाचे असता तर जगाने स्वकीयांवर प्रेम केले असते; परंतु तुम्ही जगाचे नाही. मी तुम्हांला जगातून निवडले आहे, म्हणून जग तुमचा द्वेष करते.
20‘दास धन्यापेक्षा मोठा नाही’ हे जे वचन मी तुम्हांला सांगितले त्याची आठवण करा. ते माझ्या पाठीस लागले तर तुमच्याही पाठीस लागतील, त्यांनी माझे वचन पाळले तर ते तुमचेही पाळतील;
21परंतु ते माझ्या नावाकरता हे सर्व तुम्हांला करतील, कारण ज्याने मला पाठवले त्याला ते ओळखत नाहीत.
22मी आलो नसतो व त्यांच्याबरोबर बोललो नसतो तर त्यांच्याकडे पाप नसते; परंतु आता त्यांना आपल्या पापाविषयी निमित्त सांगता येत नाही.
23जो माझा द्वेष करतो तो माझ्या पित्याचाही द्वेष करतो.
24जी कृत्ये दुसर्‍या कोणी केली नाहीत ती मी त्यांच्यामध्ये केली नसती तर त्यांच्याकडे पाप नसते, परंतु आता त्यांनी मला व माझ्या पित्यालाही पाहिले आहे व आमचा द्वेष केला आहे.
25तथापि ‘विनाकारण त्यांनी माझा द्वेष केला’ हे जे वचन त्यांच्या शास्त्रात लिहिले आहे ते पूर्ण व्हावे म्हणून हे असे होते.
26परंतु जो पित्यापासून निघतो, ज्याला मी पित्यापासून तुमच्याकडे पाठवीन तो कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो माझ्याविषयी साक्ष देईल;
27आणि तुम्हीही साक्ष द्याल, कारण तुम्ही माझ्याबरोबर आरंभापासून आहात.

Uwcholeuo

Rhanna

Copi

None

Eisiau i'th uchafbwyntiau gael eu cadw ar draws dy holl ddyfeisiau? Cofrestra neu mewngofnoda