Logo YouVersion
Eicon Chwilio

मत्तय 15

15
परुश्यांचा ढोंगीपणा
1यरुशलेमहून काही परुशी व शास्त्री येशूकडे येऊन म्हणाले, 2“तुमचे शिष्य वाडवडिलांच्या रूढीप्रमाणे का चालत नाहीत? ते हात न धुता जेवतात.”
3त्याने त्यांना उत्तर दिले, “तुम्ही स्वतःची परंपरा पाळण्याकरता देवाची आज्ञा का मोडता? 4देवाने असे म्हटले आहे, “तू तुझे वडील व तुझी आई ह्यांचा मान राख आणि जो कोणी वडिलांची किंवा आईची निंदा करतो, त्याला देहान्त शिक्षा व्हावी.’ 5परंतु तुम्ही म्हणता, जो कोणी बापाला अथवा आईला म्हणेल, “मी तुम्हांला जे काही द्यायला हवे होते, ते मी देवाला अर्पण केले आहे’, 6अशा माणसाने आपल्या वडिलांचा अथवा आईचा सन्मान केला नाही तरी चालेल. अशा प्रकारे, तुम्ही आपली परंपरा चालू ठेवून देवाचे वचन रद्द करता. 7अहो ढोंग्यांनो, तुमच्याविषयी यशयाने यथायोग्य संदेश दिला,
8हे लोक ओठांनी माझा सन्मान करतात, परंतु त्यांचे अंतःकरण माझ्यापासून दूर आहे.
9धर्मशास्त्र म्हणून
ते माझी व्यर्थ उपासना करतात
कारण ते मनुष्यांचे नियम शिकवतात.”
अशुद्ध करणाऱ्या गोष्टी
10नंतर येशूने लोकसमुदायाला आपल्याकडे बोलावून म्हटले, “ऐका व समजून घ्या. 11जे तोंडातून आत जाते ते माणसाला अशुद्ध करत नाही, तर जे तोंडातून बाहेर निघते ते माणसाला अशुद्ध करते.”
12नंतर शिष्य येऊन त्याला म्हणाले, “हे वचन ऐकून परुश्यांच्या भावना दुखावल्या गेल्या, हे आपल्याला कळले काय?”
13त्याने उत्तर दिले, “माझ्या स्वर्गातील पित्याने लावले नाही, असे प्रत्येक रोपटे उपटले जाईल. 14त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, ते आंधळ्यांचे आंधळे वाटाड्ये आहेत आणि आंधळा आंधळ्याला नेऊ लागला तर दोघेही खड्ड्यात पडतील.”
15परंतु पेत्र त्याला म्हणाला, “हा दाखला आम्हांला समजावून सांगा.”
16तेव्हा तो म्हणाला, “तुम्हीदेखील अज्ञानी आहात काय? 17जे काही तोंडात जाते, ते पोटात उतरते व नंतर पुढे शरीराबाहेर टाकण्यात येते, हे तुम्हांला समजत नाही काय? 18मात्र जे तोंडातून निघते ते अंतःकरणातून येते व माणसाला अशुद्ध करते. 19अंतःकरणातूनच दुष्ट कल्पना, खून, व्यभिचार आणि लैंगिक अनैतिकता, तसेच चोऱ्या, खोट्या साक्षी व निंदानालस्ती निघतात. 20ह्या गोष्टी माणसाला अशुद्ध करतात. न धुतलेल्या हातांनी जेवणे माणसाला अशुद्ध करत नाही.”
कनानी बाईचा विश्वास
21येशू तेथून निघून सोर व सिदोन ह्या भागात गेला. 22त्या भागातील एक कनानी बाई येऊन ओरडू लागली, “हे प्रभो, दावीदपुत्रा, माझ्यावर दया करा. माझ्या मुलीला एक भूत फारच त्रास देत आहे.”
23तरी येशूने तिला एका शब्दानेही उत्तर दिले नाही. तेव्हा त्याच्या शिष्यांनी जवळ येऊन त्याला विनंती केली, “तिला पाठवून द्या, कारण ती आपल्यामागून ओरडत येत आहे.”
24त्याने उत्तर दिले, “इस्राएलच्या घराण्यातील हरवलेल्या मेंढरांसाठीच मला पाठवलेले आहे.”
25ती येऊन त्याच्या पाया पडून म्हणाली, “प्रभो, मला साहाय्य करा.”
26त्याने उत्तर दिले, “मुलांची भाकर घेऊन ती घरच्या कुत्र्यांना टाकणे ठीक नाही.”
27तिने म्हटले, “खरे आहे, प्रभो, तरीही कुत्रीदेखील आपल्या धन्याच्या मेजावरून पडलेला चुरा खातात.”
28नंतर येशूने तिला उत्तर दिले, “बाई, तुझा विश्वास मोठा आहे. तुझी इच्छा सफळ होवो!” आणि त्याच घटकेस तिची मुलगी बरी झाली!
अनेकांना आरोग्यदान
29येशू तेथून निघून गालील सरोवराजवळ आला व डोंगरावर चढून तेथे बसला. 30लोकांच्या झुंडीच्या झुंडी त्याच्याकडे आल्या, त्यांच्याबरोबर लुळेपांगळे, आंधळे, मुके, व्यंग व दुसरे पुष्कळ आजारी लोक होते; त्यांना त्यांनी त्याच्या पायांशी आणून ठेवले आणि येशूने त्यांना बरे केले. 31मुके बोलतात, लुळेपांगळे धड होतात, लंगडे चालतात व आंधळे पाहतात, हे बघून लोकसमुदायाने आश्‍चर्य व्यक्त केले आणि त्यांनी इस्राएलच्या देवाचा गौरव केला.
चार हजारांना भोजन
32नंतर येशूने आपल्या शिष्यांना जवळ बोलावून म्हटले, “मला लोकांचा कळवळा येतो, कारण आज तीन दिवस ते माझ्याबरोबर आहेत आणि आता त्यांच्याजवळ खायला काही नाही. मी त्यांना उपाशी घरी पाठवले तर ते वाटेवर मूर्च्छित होतील.”
33शिष्य त्याला म्हणाले, “एवढा मोठा लोकसमुदाय तृप्त होईल इतक्या भाकरी येथे अरण्यात आम्ही कुठून आणणार?”
34येशूने त्यांना विचारले, “तुमच्याजवळ किती भाकरी आहेत?” ते म्हणाले, “सात व काही लहान मासे आहेत.”
35त्याने लोकसमुदायाला जमिनीवर बसायला सांगितले. 36त्या सात भाकरी व मासे घेऊन त्याने परमेश्वराचे आभार मानले व त्यांचे तुकडे करून ते शिष्यांना दिले आणि शिष्यांनी ते लोकसमुदायाला वाटले. 37ते सर्व जेवून तृप्त झाले आणि उरलेल्या तुकड्यांच्या सात टोपल्या शिष्यांनी भरून घेतल्या. 38जेवणारे चार हजार पुरुष होते, शिवाय स्त्रिया व मुले होती ती निराळीच.
39त्यानंतर लोकसमुदायाला निरोप दिल्यावर तो मचव्यात बसून मगदानाच्या हद्दीत गेला.

Uwcholeuo

Rhanna

Copi

None

Eisiau i'th uchafbwyntiau gael eu cadw ar draws dy holl ddyfeisiau? Cofrestra neu mewngofnoda