Logo YouVersion
Eicon Chwilio

मत्तय 16

16
चिन्हाची मागणी
1तेथे परूशी व सदूकी लोक येऊन येशूंना प्रश्न विचारू लागले. त्यांची परीक्षा पाहण्याकरिता, ते म्हणाले, “आकाशातून आम्हास चिन्ह दाखवा.”
2तेव्हा येशूंनी उत्तर दिले “संध्याकाळ झाली, म्हणजे तुम्ही म्हणता, ‘हवामान अनुकूल होईल कारण आकाश तांबूस झाले आहे.’ 3आणि सकाळी तुम्ही म्हणता, ‘वादळी हवा सुटेल, कारण आकाश तांबूस आणि गडद आहे,’ आकाशात होणार्‍या बदलांवरून त्याचा अर्थ तुम्हाला काढता येतो, परंतु काळाच्या चिन्हांचा अर्थ तुम्हाला लावता येत नाही. 4दुष्ट आणि व्यभिचारी पिढी चिन्ह मागते, परंतु योनाच्या चिन्हाखेरीज दुसरे कोणतेही चिन्ह दिले जाणार नाही.” मग येशू तेथून निघून गेले.
परूशी व सदूकी यांचे खमीर
5सरोवराच्या पलीकडे गेल्यावर आपण बरोबर भाकरी आणावयास विसरलो आहो, हे शिष्यांच्या लक्षात आले. 6येशू शिष्यांना ताकीद देत म्हणाले, “परूशी व सदूकी यांच्या खमिरापासून सावध असा.”
7तेव्हा शिष्य आपसात चर्चा करू लागले आणि म्हणाले, “कारण आपण भाकर आणली नाही म्हणून ते असे बोलत आहेत.”
8त्यांच्या चर्चेचा विषय ओळखून येशू म्हणाले, “अहो, अल्पविश्वासी, तुम्ही भाकर नाही याबद्दल आपसात का बोलता? 9तुम्हाला अजून समजले नाही काय? पाच हजारांना पाच भाकरींनी जेवू घातले तेव्हा तुम्ही किती टोपल्या गोळा केल्या ते तुम्हाला आठवत नाही काय? 10किंवा सात भाकरींनी चार हजारांना जेवू घातले तेव्हा उरलेल्या अन्नाच्या तुम्ही किती टोपल्या गोळा केल्या? 11तुम्हाला कसे समजत नाही की भाकरीविषयी मी बोलत नाही? परंतु परूशी व सदूकी यांच्या खमिराविषयी सावध असण्यास सांगत आहे.” 12मग भाकरीमध्ये घालण्यात येणार्‍या खमिराबद्दल ते बोलत नसून परूशी व सदूकी यांच्या चुकीच्या शिक्षणाबद्दल ते बोलत होते हे त्यांच्या लक्षात आले.
येशू हे ख्रिस्त असल्याचे पेत्र जाहीर करतो
13येशू कैसरीया फिलिप्पाच्या प्रांतात आले, तेव्हा त्यांनी आपल्या शिष्यांना विचारले, “मानवपुत्र कोण आहे असे लोक म्हणतात?”
14त्यांनी उत्तर दिले, “काही म्हणतात बाप्तिस्मा करणारा योहान; काही एलीया म्हणतात; आणि आणखी काही, यिर्मया किंवा संदेष्ट्यापैकी एक.”
15“परंतु तुमचे मत काय?” येशूंनी विचारले, “मी कोण आहे, असे तुम्ही म्हणता?”
16शिमोन पेत्राने उत्तर दिले, “तुम्ही ख्रिस्त, जिवंत परमेश्वराचे पुत्र आहा.”
17येशूंनी उत्तर दिले, “योनाच्या पुत्रा#16:17 योनाच्या पुत्रा मूळ भाषेत बरयोना शिमोना, तू धन्य आहेस, हे तुला मांस किंवा रक्त यांनी नव्हे, तर माझ्या स्वर्गीय पित्याने प्रकट केले आहे 18आणि मी तुला सांगतो की तू पेत्र#16:18 ग्रीक शब्द पेत्र अर्थ खडक आहेस आणि या खडकावर मी माझी मंडळी उभारीन; तिच्यापुढे अधोलोकाच्या#16:18 अधोलोकाच्या अर्थात् मृतांचे साम्राज्य द्वाराचा विजय होणार नाही. 19मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन; पृथ्वीवर जे काही तू बंद करशील ते स्वर्गात बंद केले जाईल आणि पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल.” 20मग येशूंनी शिष्यांना ताकीद दिली, “मी ख्रिस्त आहे हे कोणालाही सांगू नका.”
येशू आपल्या मृत्यूचे भविष्य करतात
21तेव्हापासून, येशू आपल्या शिष्यांना सांगू लागले की त्यांनी यरुशलेमास जाणे, वडील व मुख्य याजक, नियमशास्त्राचे शिक्षक यांच्याकडून अनेक दुःख सहन करावी, जिवे मारले जावे आणि तिसर्‍या दिवशी पुन्हा जिवंत होणे याविषयी अगत्य आहे.
22पेत्र त्यांना बाजूला घेऊन त्यांचा निषेध करू लागला व म्हणाला, “प्रभुजी, असे तुम्हाला कधीच होणार नाही.”
23तेव्हा येशू पेत्राकडे वळून म्हणाले, “अरे सैताना, माझ्या दृष्टीआड हो! तू मला अडखळण आहे. तुझे मन परमेश्वराच्या गोष्टींकडे नाही, परंतु केवळ मनुष्याच्या गोष्टींकडे आहे.”
24मग येशू आपल्या शिष्यांना म्हणाले, “जर कोणी माझा शिष्य होऊ पाहतो तर त्यांनी स्वतःस नाकारावे, रोज आपला क्रूसखांब उचलावा आणि माझ्यामागे यावे. 25कारण जो कोणी आपला जीव वाचवेल तो आपल्या जीवाला मुकेल, पण जो कोणी माझ्यासाठी आपल्या जीवाला गमावेल, तो त्याचा जीव वाचवेल. 26कोणी सारे जग मिळविले आणि आपला आत्मा गमावला तर त्यातून काय चांगले निष्पन्न होणार? आपल्या आत्म्याच्या मोबदल्यात मनुष्याला दुसरे काही देता येईल का? 27कारण, मानवपुत्र आपल्या पित्याच्या वैभवानिशी त्यांच्या दिव्य दूतांबरोबर येईल, तेव्हा प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या कृत्यांप्रमाणे प्रतिफळ देईल.
28“मी तुम्हाला निश्चित सांगतो, की येथे उभे असणारे काहीजण असे आहेत की, ते मानवपुत्राला त्यांच्या राज्यात येताना पाहतील तोपर्यंत, त्यांना मरणाचा अनुभव येणार नाही.”

Dewis Presennol:

मत्तय 16: MRCV

Uwcholeuo

Rhanna

Copi

None

Eisiau i'th uchafbwyntiau gael eu cadw ar draws dy holl ddyfeisiau? Cofrestra neu mewngofnoda