Logo YouVersion
Eicon Chwilio

मत्तय 17

17
येशूंचे रूपांतर
1सहा दिवसानंतर पेत्र, याकोब आणि याकोबाचा भाऊ योहान या तिघांना बरोबर घेऊन येशू एका उंच डोंगरावर गेले; 2तेथे त्यांच्यासमोर येशूंचे रूपांतर झाले, त्यांचा चेहरा सूर्यासारखा तेजस्वी झाला आणि त्यांची वस्त्रे प्रकाशासारखी शुभ्र झाली. 3त्याचवेळी मोशे आणि एलीया तेथे प्रकट झाले आणि येशूंबरोबर संवाद करू लागले.
4तेव्हा पेत्र येशूंना म्हणाला, “प्रभुजी, आपल्याला येथेच राहता आले, तर फार चांगले होईल. आपली इच्छा असेल, तर मी येथे तीन मंडप उभारेन एक तुमच्यासाठी, एक मोशेसाठी आणि एक एलीयासाठी.”
5पण तो हे बोलत असतानाच, मेघाने त्यांच्यावर छाया केली आणि मेघातून वाणी ऐकू आली, “हा माझा पुत्र आहे, माझा प्रिय आणि मी त्याच्याविषयी संतुष्ट आहे. याचे तुम्ही ऐका!”
6ही वाणी कानी पडताच, शिष्य अतिशय भयभीत झाले आणि जमिनीवर पालथे पडले. 7पण येशूंनी येऊन त्यांना स्पर्श करून म्हणाले, “उठा, भिऊ नका!” 8जेव्हा त्यांनी वर पाहिले, त्यावेळी येशू व्यतिरिक्त त्यांना कोणीही दिसले नाही.
9डोंगरावरून खाली उतरत असताना येशूंनी त्यांना आज्ञा केली, “तुम्ही जे काही पाहिले, ते मानवपुत्र मरणातून पुन्हा उठेपर्यंत कोणालाही सांगू नका.”
10येशूंच्या शिष्यांनी त्यांना विचारले, “एलीया प्रथम आला पाहिजे, असे नियमशास्त्राचे शिक्षक का म्हणतात?”
11येशूंनी उत्तर दिले, “हे निश्चित आहे, एलीया प्रथम येईल व सर्वकाही व्यवस्थित करेल. 12पण मी तुम्हाला सांगतो की एलीया आलेला आहे आणि त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांनी त्याला वाटेल तसे वागविले आहे.” अशाच प्रकारे मानवपुत्रालाही त्यांच्या हातून यातना भोगावयास लागतील. 13तेव्हा येशू बाप्तिस्मा करणार्‍या योहानाविषयी बोलत आहेत, हे शिष्यांच्या लक्षात आले.
फेपरेकरी मुलास बरे करणे
14जेव्हा ते समुदायाकडे आले, त्यातील एक मनुष्य येशूंकडे आला आणि त्यांच्यापुढे गुडघे टेकून म्हणाला, 15“महाराज, माझ्या मुलावर दया करा, कारण तो फेपरेकरी आहे आणि त्यामुळे त्याला फार यातना भोगाव्या लागतात. तो वारंवार आगीत नाही तर पाण्यात पडतो. 16मी मुलाला तुमच्या शिष्यांकडे घेऊन आलो, पण त्यांना बरे करता आले नाही.”
17येशूंनी उत्तर दिले, “हे विश्वासहीन व दुष्ट पिढी, आणखी किती काळ मी तुमच्याबरोबर राहिले पाहिजे? आणखी किती काळ मी सहन करू? त्या मुलाला माझ्याकडे आणा.” 18मग येशूंनी त्या मुलामधील दुरात्म्याला धमकावून घालवून दिले व त्या क्षणापासून तो मुलगा बरा झाला.
19मग येशूंच्या शिष्यांनी त्यांच्याकडे एकांतात येऊन त्यांना विचारले, “त्याला आम्ही का काढू शकलो नाही?”
20येशूंनी उत्तर दिले, “तुमच्या अल्पविश्वासामुळे,” मी तुम्हाला सत्य सांगतो, तुमच्याजवळ मोहरीच्या दाण्याएवढा विश्वास असला आणि या डोंगराला तू पलीकडे सरक, असे तुम्ही म्हणाला, तरी तो दूर सरकेल. तुम्हाला कोणतीही गोष्ट अशक्य होणार नाही. 21असला प्रकार प्रार्थनेद्वारेच जाऊ शकतो.#17:21 काही मूळप्रतींमध्ये घेतलेला समान शब्द आहे मार्क 9:29.
आपल्या मृत्यूविषयी येशू दुसर्‍यांदा भविष्य करतात
22ते गालीलात एकत्र आले असताना, येशूंनी शिष्यांना सांगितले, “मानवपुत्राला, मनुष्यांच्या हाती दिले जाईल. 23ते त्याला जिवे मारतील. पण तिसर्‍या दिवशी तो पुन्हा जिवंत केला जाईल.” हे ऐकून शिष्यांची अंतःकरणे दुःखाने व्यापून गेली.
मंदिराचा कर
24येशू व त्यांचे शिष्य कफर्णहूमात आल्यानंतर, मंदिराचे जकातदार पेत्राकडे येऊन म्हणाले, “तुमचे गुरुजी मंदिराचा कर भरीत नसतात काय?”
25“अर्थात् ते कर भरीत असतात,” पेत्राने उत्तर दिले.
मग पेत्र घरात गेला, तेव्हा तो काही बोलण्या अगोदरच येशूंनी त्याला विचारले, “शिमोना, तुला काय वाटते? पृथ्वीचे राजे कर कसे गोळा करतात; स्वतःच्या लेकरांकडून की इतर लोकांकडून?”
26“इतर लोकांकडून,” पेत्राने उत्तर दिले.
“लेकरे कर भरण्यापासून मुक्त आहेत.” तेव्हा येशू म्हणाले 27“पण आपण अडखळण होऊ नये, म्हणून सरोवराच्या किनार्‍यावर जा व तुझा गळ टाक आणि प्रथम जो मासा धरशील त्या माशाचे तोंड उघड. त्यात तुला आपल्या दोघांचे कर भरण्यास पुरेल इतक्या किमतीचे नाणे मिळेल. ते घे आणि आपला कर भर.”

Dewis Presennol:

मत्तय 17: MRCV

Uwcholeuo

Rhanna

Copi

None

Eisiau i'th uchafbwyntiau gael eu cadw ar draws dy holl ddyfeisiau? Cofrestra neu mewngofnoda