Logo YouVersion
Eicon Chwilio

मत्तय 24

24
युगाच्या समाप्तीची चिन्हे व मंदिराचा नाश
1येशू मंदिरातून बाहेर पडून चालत असता, त्यांचे शिष्य त्यांच्याकडे आले आणि त्यांचे लक्ष मंदिराच्या इमारतींकडे वेधले. 2येशू त्यांना म्हणाले, “हे सर्व तुम्ही आता पाहत आहात ना? मी तुम्हाला खचित सांगतो की, एका दगडावर दुसरा दगड राहणार नाही. प्रत्येक दगड खाली पडेल.”
3येशू मंदिराच्या समोर असलेल्या जैतुनाच्या डोंगरावर बसले असताना, शिष्य त्यांच्याकडे एकांतात आले आणि विचारले, “ही घटना केव्हा घडेल आणि आपले पुनरागमन आणि युगाचा शेवट घडण्या अगोदर कोणती चिन्हे असतील?”
4येशूंनी त्यांना म्हटले, “कोणीही तुम्हाला फसवू नये म्हणून सावध राहा. 5कारण अनेकजण माझ्या नावाने येतील आणि, ‘मी ख्रिस्त आहे,’ असे जाहीर करतील आणि पुष्कळांना फसवतील. 6तुम्ही लढायासंबंधी ऐकाल आणि लढायांच्या अफवा ऐकाल, पण त्यामुळे तुम्ही घाबरू नका. कारण या गोष्टी घडल्याच पाहिजेत, पण शेवट अजूनही यावयाचा आहे. 7कारण राष्ट्रांविरुद्ध राष्ट्र व राज्याविरुद्ध राज्य उठतील. वेगवेगळ्या ठिकाणी भूकंप होतील, दुष्काळही पडतील. 8या घटना तर प्रसूती वेदनांची सुरुवात आहेत.
9“छळ करण्यासाठी आणि जिवे मारण्यासाठी तुम्हाला धरून दिले जाईल आणि माझ्यामुळे सर्व राष्ट्रे तुमचा द्वेष करतील. 10त्यावेळी पुष्कळ जण विश्वासापासून दूर जातील व एकमेकांचा द्वेष करतील. 11पुष्कळ खोटे संदेष्टे उदयास येतील आणि पुष्कळांना फसवतील. 12दुष्टता वाढेल व त्यामुळे पुष्कळांची प्रीती थंडावेल. 13परंतु जो शेवटपर्यंत स्थिर राहील त्याचे तारण होईल. 14सर्व जगामध्ये साक्ष म्हणून राज्याच्या शुभवार्तेचा प्रचार सर्व राष्ट्रांमध्ये झाला पाहिजे आणि मगच शेवट होईल.
15“संदेष्टा दानीएल याने सांगितलेला ‘ओसाडीचा अमंगळ पदार्थ’#24:15 दानी 9:27; 11:31; 12:11 पवित्रस्थानी उभा असलेला तुम्ही पाहाल—वाचकाने हे समजून घ्यावे— 16त्यावेळी जे यहूदीयात आहेत त्यांनी डोंगरांकडे पळून जावे. 17जो कोणी घराच्या छपरांवर असेल, त्याने घरातून काही आणण्याकरिता खाली उतरू नये. 18जो शेतात असेल, त्याने आपला अंगरखा नेण्यासाठी परत जाऊ नये. 19गर्भवती आणि दूध पाजणार्‍या स्त्रियांसाठी तर तो काळ किती क्लेशांचा असेल! 20तुमच्या पलायनाचा काळ हिवाळ्यात किंवा शब्बाथ दिवशी येऊ नये, म्हणून प्रार्थना करा. 21कारण ते दिवस इतके भयानक असतील की, परमेश्वराने पृथ्वी निर्माण केल्यापासून आजपर्यंत असे दिवस आले नाहीत किंवा पुढेही येणार नाहीत.
22“आणि परमेश्वराने हा आपत्तिचा काळ कमी केला नाही, तर पृथ्वीवर कोणीही जिवंत राहणार नाही. तरी निवडलेल्या लोकांसाठी मात्र ते दिवस कमी केले जातील. 23त्या काळात ‘येथे ख्रिस्त आहे,’ किंवा ‘पाहा, तो तेथे आहे,’ असे जर कोणी तुम्हाला सांगितले, तर अजिबात विश्वास ठेवू नका. 24कारण खोटे ख्रिस्त आणि खोटे संदेष्टे उदय पावतील आणि मोठी चिन्हे व अद्भुते करून, साधेल तर, निवडलेल्या लोकांनाही फसवतील. 25पाहा मी तुम्हाला अगोदरच सांगून ठेवलेले आहे.
26“जर कोणी तुम्हाला सांगेल, ‘तो तेथे रानात आहे,’ तर तिकडे जाऊ नका किंवा तो तेथे ‘आतल्या खोलीत आहे,’ तर विश्वास ठेवू नका. 27कारण जशी वीज पूर्वेकडून निघते आणि पश्चिमेकडे प्रकाशतांना दिसते, तसाच प्रकारे मानवपुत्राचे आगमन होईल. 28जेथे प्रेत आहे, तेथे गिधाडे जमणार.
29“क्लेशांच्या काळाची समाप्ती झाल्यावर
“ ‘त्या दिवसात, सूर्य अंधकारमय होईल,
आणि चंद्र आपला प्रकाश देणार नाही;
आकाशातून तारे गळून पडतील,
आणि आकाशमंडळ डगमगेल.’#24:29 यश 13:10; 34:4
30“मानवपुत्राच्या आगमनाचे चिन्ह आकाशात दिसेल आणि पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे#24:30 राष्ट्रे किंवा वंश मोठा आक्रोश करतील. ते मानवपुत्राला आकाशात मेघारूढ होऊन पराक्रमाने परत येत असलेले पाहतील.#24:30 दानी 7:13-14 31कर्ण्यांच्या महानादाबरोबर ते आपल्या दूतास पृथ्वीच्या व आकाशाच्या या टोकापासून अगदी शेवटच्या टोकापर्यंत आणि चारही दिशेकडून माझ्या निवडलेल्या लोकांना एकत्र करण्यासाठी पाठवतील.
32“आता अंजिराच्या झाडापासून हा बोध घ्या व शिका. त्या झाडाच्या डाहळ्या कोवळ्या झाल्या आणि त्यांना पालवी फुटू लागली म्हणजे उन्हाळा जवळ आला आहे, हे तुम्ही ओळखता. 33या सर्व घटना घडत असताना तुम्ही पाहाल,#24:33 किंवा तो तेव्हा ते जवळ आहे, दारातच आहे हे समजून घ्या. 34मी तुम्हाला निश्चित सांगतो की, या सर्वगोष्टी घडून आल्याशिवाय ही पिढी खात्रीने नाहीशी होणार नाही. 35आकाश व पृथ्वी नाहीशी होतील, पण माझी वचने नाहीशी होणार नाहीत.
दिवस आणि घटका अज्ञात आहे
36“तरीपण त्या दिवसाबद्दल किंवा वेळेबद्दल कोणालाच माहीत नाही, म्हणजे स्वर्गातील दूतांना नाही, पुत्रालाही नाही,#24:36 पुत्राला काही मूळप्रतींमध्ये पुत्रालाही ठाऊक नाही हे आढळत नाही ते फक्त पित्यालाच ठाऊक आहे. 37नोहाच्या दिवसात जशी परिस्थिती होती, तशीच मानवपुत्र येण्याच्या वेळी होईल. 38जलप्रलय येण्यापूर्वी, नोहा प्रत्यक्ष तारवात गेला, त्या दिवसापर्यंत लोक खातपीत होते, लग्न करून घेत होते, लग्न करून देत होते. 39आपले काय होणार आहे हे त्यांना माहीत नव्हते, मग एकाएकी जलप्रलय आला आणि त्या सर्वांनाच जलसमाधी मिळाली. मानवपुत्र परत येईल त्यावेळीही अगदी असेच होईल. 40शेतात काम करीत असलेल्या दोन मनुष्यांपैकी एक घेतला जाईल व दुसरा ठेवला जाईल. 41जात्यावर दळीत बसलेल्या दोन स्त्रियांपैकी एकीला घेतले जाईल व दुसरीला ठेवले जाईल.
42“यास्तव तुम्ही जागृत राहा, कारण तुमच्या प्रभुच्या आगमनाचा दिवस कोणता, हे तुम्हाला ठाऊक नाही. 43पण एक गोष्ट नीट समजून घ्या; चोर अमूक प्रहरी येणार आहे हे घरधन्याला अगोदरच समजले असते, तर तो जागा राहिला असता आणि आपले घर त्याने चोराला फोडू दिले नसते. 44म्हणून तुम्ही सदैव तयारीत राहा. कारण मानवपुत्र तुम्हाला कल्पना नसेल अशा घटकेला येईल.
45“तुमच्यामध्ये प्रामाणिक व सुज्ञ कारभारी कोण आहे? ज्याच्यावर घरधनी त्याच्या कुटुंबियांची देखभाल करण्याचे व अन्नधान्याचे वेळच्या वेळी वाटप करण्याचे काम सोपवितो. 46धनी येईल, तेव्हा जो दास आपली कामगिरी बजावीत असताना त्याला आढळेल, तो धन्य होय. 47मी तुम्हाला सत्य सांगतो की तो धनी आपल्या सर्व मालमत्तेवर त्याची नेमणूक करील. 48परंतु समजा तो दास दुष्ट आपल्या मनात म्हणेल, ‘माझा धनी येण्यास पुष्कळ विलंब होत आहे,’ 49आणि तो सोबतीच्या दासांना मारहाण करू लागेल आणि पिणार्‍यांबरोबर खाऊ आणि पिऊ लागेल. 50तर त्या दासाचा धनी, तो अपेक्षा करीत नाही त्या दिवशी आणि तो जाणत नाही त्या घडीला येईल. 51तो त्या दासाला चाबकाने फोडून काढील व ढोंग्याबरोबर ज्या ठिकाणी रडारड आणि दातखाणे चालेल तेथे त्याला वाटा मिळेल.

Dewis Presennol:

मत्तय 24: MRCV

Uwcholeuo

Rhanna

Copi

None

Eisiau i'th uchafbwyntiau gael eu cadw ar draws dy holl ddyfeisiau? Cofrestra neu mewngofnoda