योहान 18
18
येशूला अटक
1ह्या प्रार्थनेनंतर येशू त्याच्या शिष्यांसह किद्रोन ओहोळाच्या पलीकडील बागेत गेला. 2ही जागा त्याचा विश्वासघात करणाऱ्या यहुदालाही ठाऊक होती. कारण येशू त्याच्या शिष्यांसह तेथे वारंवार जात असे. 3तेव्हा सैनिकांची तुकडी आणि मुख्य याजक व परुशी ह्यांच्याकडच्या रक्षकांसह यहुदा दिवे, मशाली व शस्त्रे घेऊन तेथे आला. 4त्याच्या बाबतीत घडणाऱ्या सर्व गोष्टी जाणून असल्यामुळे, येशू बाहेर आला आणि त्यांना म्हणाला, “तुम्ही कोणाला शोधत आहात?”
5त्यांनी त्याला उत्तर दिले, “नासरेथकर येशूला.” तो त्यांना म्हणाला, “तो मी आहे.” त्याला धरून देणारा यहुदा इस्कर्योत त्यांच्याबरोबर तेथे उभा होता. 6‘तो मी आहे’, असे येशूने म्हणताच ते मागे हटून जमिनीवर पडले. 7तेव्हा येशूने त्यांना पुन्हा विचारले, “तुम्ही कोणाला शोधत आहात?” ते म्हणाले, “नासरेथकर येशूला.”
8येशू म्हणाला, “तो मी आहे, असे मी तुम्हांला सांगितले. तुम्ही मला शोधत असाल तर ह्यांना जाऊ द्या.” 9‘तू मला दिले आहेत त्यांतून मी एकही हरवला नाही’, हे त्याचे वचन पूर्ण व्हावे, म्हणून तो हे बोलला.
10शिमोन पेत्राजवळ तलवार होती. ती त्याने उपसून उच्च याजकांच्या दासावर चालवली आणि त्याचा उजवा कान कापून टाकला. त्या दासाचे नाव मल्ख होते. 11येशू पेत्राला म्हणाला, “तलवार म्यानात घाल. पित्याने जो दुःखाचा प्याला मला दिला आहे, तो मी पिऊ नये काय?”
12त्यानंतर सैनिकांची तुकडी, तिचे अधिकारी व यहुदी अधिकाऱ्यांनी पाठवलेले रक्षक ह्यांनी येशूला धरून बांधले. 13त्यांनी त्याला प्रथम हन्नाकडे नेले. त्या वर्षी उच्च याजक असलेल्या कयफाचा हा सासरा होता. 14एका मनुष्याने लोकांसाठी मरावे, हे हिताचे आहे, असा ह्याच कयफाने यहुदी लोकांना स्रा दिला होता.
पेत्र येशूला नाकारतो
15शिमोन पेत्र व दुसरा एक शिष्य येशूच्या मागे गेले. तो शिष्य उच्च याजकांच्या ओळखीचा होता म्हणून तो येशूबरोबर उच्च याजकांच्या वाड्यात गेला. 16पेत्र दाराशी बाहेर उभा राहिला होता म्हणून जो दुसरा शिष्य उच्च याजकांच्या ओळखीचा होता त्याने बाहेर जाऊन व द्वारपालिकेला सांगून पेत्राला आत आणले. 17ती तरुण द्वारपालिका पेत्राला म्हणाली, “तू त्या माणसाच्या शिष्यांपैकी आहेस ना?” त्याने म्हटले, “मी नाही.”
18थंडी असल्यामुळे दास व रक्षक हे कोळशांचा विस्तव पेटवून शेकत उभे राहिले होते. त्यांच्याबरोबर पेत्रही शेकत उभा राहिला.
19उच्च याजकांनी येशूला त्याच्या शिष्यांविषयी व त्याच्या शिकवणीविषयी विचारले. 20येशूने त्यांना उत्तर दिले, “मी जगासमोर उघडपणे बोललो आहे. सभास्थानात व मंदिरात सर्व यहुदी लोक जमतात तेथे मी नेहमी प्रबोधन केले आहे. गुप्तपणे काही बोललो नाही. 21मला का विचारता? मी काय बोललो, हे ज्यांनी ऐकले आहे त्यांना विचारा. पाहा, मी जे बोललो ते त्यांना ठाऊक आहे.”
22त्याने असे म्हटल्याबरोबर जवळ उभ्या असलेल्या एका रक्षकाने येशूला चपराक मारून म्हटले, “तू उच्च याजकांना असा जबाब देतोस काय?”
23येशूने त्याला उत्तर दिले, “मी वाईट बोललो असलो, तर कसे वाईट बोललो ते सिद्ध कर. योग्य रीतीने बोललो असलो, तर मला का मारतोस?”
24तेव्हा हन्नाने त्याला उच्च याजक कयफा ह्यांच्याकडे बांधलेलेच पाठवले.
25शिमोन पेत्र अजूनही शेकत उभा राहिला होता. त्याच्याबरोबर शेकत उभ्या असलेल्या लोकांनी त्याला विचारले, “तूही त्याच्या शिष्यांतला आहेस काय?” परंतु तो म्हणाला, “मी नाही.”
26ज्याचा कान पेत्राने कापून टाकला होता, त्याचा एक नातलग उच्च याजकांच्या दासांपैकी होता. तो त्याला म्हणाला, “मी तुला त्याच्याबरोबर बागेत नाही का पाहिले?”
27पेत्राने पुन्हा नाकारले आणि लगेच कोंबडा आरवला!
पिलातसमोर येशू
28दुसऱ्या दिवशी भल्या पहाटेस त्यांनी येशूला कयफाकडून सरकारवाड्यात नेले. त्यांना विटाळ होऊ नये व त्यांना ओलांडण सणाचे भोजन करता यावे म्हणून ते स्वतः सरकारवाड्यात गेले नाहीत. 29पिलात स्वतः त्यांच्याकडे बाहेर येऊन म्हणाला, “तुम्ही ह्या माणसावर कोणता आरोप ठेवता?”
30त्यांनी त्याला उत्तर दिले, “हा गुन्हेगार नसता, तर आम्ही त्याला तुमच्या स्वाधीन केले नसते.”
31पिलात त्यांना म्हणाला, “त्याला नेऊन तुम्हीच तुमच्या नियमशास्त्राप्रमाणे त्याचा न्याय करा.” यहुदी त्याला म्हणाले, “आम्हांला कोणाचा जीव घेण्याचा अधिकार नाही.” 32कोणत्या प्रकारच्या मरणाने तो मरणार हे सुचवताना येशूने जे वचन सांगितले होते, ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले.
33पिलात पुन्हा सरकारवाड्यात गेला आणि येशूला बोलावून म्हणाला, “तू यहुदी लोकांचा राजा आहेस काय?”
34येशूने उत्तर दिले, “आपण स्वतःहून हे म्हणता की, दुसऱ्यांनी आपल्याला माझ्याविषयी हे सांगितले?”
35पिलातने उत्तर दिले, “मी यहुदी आहे काय? तुझ्याच लोकांनी व मुख्य याजकांनी तुला माझ्या स्वाधीन केले. तू काय केलेस?”
36येशूने उत्तर दिले, “माझे राज्य ह्या जगाचे नाही. माझे राज्य ह्या जगाचे असते, तर मी यहुद्यांच्या स्वाधीन केला जाऊ नये म्हणून माझ्या सेवकांनी लढाई केली असती. परंतु माझे राज्य येथले नाही.”
37तेव्हा पिलात त्याला म्हणाला, “तर तू राजा आहेस काय?” येशूने उत्तर दिले, “मी राजा आहे, असे आपण म्हणता. सत्याविषयी साक्ष द्यावी म्हणून माझा जन्म झाला आहे व ह्याकरता मी जगात आलो आहे. जो कोणी सत्याची बाजू घेतो तो माझी वाणी ऐकतो.”
38पिलातने त्याला विचारले, “सत्य काय आहे?” नंतर तो पुन्हा बाहेर जाऊन यहुदी लोकांना म्हणाला, “मला ह्याच्यात काहीच दोष सापडत नाही. 39पण ओलांडण सणात मी तुमच्यासाठी एका माणसाला सोडावे अशी तुमची रीत आहे तर मग मी तुमच्यासाठी यहुदी लोकांच्या राजाला सोडावे, अशी तुमची इच्छा आहे काय?” 40तेव्हा ते पुन्हा ओरडून म्हणाले, “ह्याला सोडू नका, बरब्बाला सोडा.” बरब्बा हा एक लुटारू होता.
Tällä hetkellä valittuna:
योहान 18: MACLBSI
Korostus
Jaa
Kopioi
Haluatko, että korostuksesi tallennetaan kaikille laitteillesi? Rekisteröidy tai kirjaudu sisään
Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र
Copyright © 2018 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.