YouVersion logo
Ikona pretraživanja

लूक 16

16
व्यवस्थापकाचा चतुरपणा
1नंतर येशूने आपल्या शिष्यांना एक दाखला सांगितला: ‘एक श्रीमंत मनुष्य होता व त्याचा एक व्यवस्थापक होता. हा व्यवस्थापक तुमच्या संपत्तीचा दुरुपयोग करतो, असा आरोप त्याच्या मालकाजवळ करण्यात आला. 2त्याने त्याला बोलावून म्हटले, ‘मी तुझ्याविषयी हे काय ऐकतो आहे? तू आपल्या कारभाराचा हिशेब दे, कारण ह्यापुढे तुला कारभार पाहायचा नाही.’ 3व्यवस्थापकाने आपल्या मनात म्हटले, ‘माझा धनी माझ्याकडून कारभार काढून घेणार आहे, तर मी आता काय करू? खणण्यासाठी मला शक्‍ती नाही, भीक मागण्याची मला लाज वाटते. 4तर कारभारावरून काढल्यावर लोकांनी मला त्यांच्या घरात घ्यावे म्हणून मी काय करावे, हे आत्ता मला कळते.’
5त्याने आपल्या धन्याच्या कर्जदारांना बोलावले आणि पहिल्याला विचारले, ‘माझ्या धन्याकडून तू किती कर्ज घेतले आहे?’ 6तो म्हणाला, ‘शंभर मण तेल.’ त्याने त्याला म्हटले, ‘हा तुझा रोखा घे आणि लवकर बसून ह्यावर पन्‍नास लिही.’ 7दुसऱ्याला म्हटले, ‘तू किती परतफेड करायची आहे?’ तो म्हणाला, ‘एक हजार पोती गहू.’ तो त्याला म्हणाला, ‘हा तुझा रोखा घे व आठशे पोती लिही.’
8अप्रामाणिक व्यवस्थापकाने चतुराई दाखवली. ह्यावरून धन्याने त्याची वाहवा केली; कारण ह्या युगाचे लोक त्यांच्या पिढीतल्या लोकांबरोबर व्यवहारात प्रकाशाच्या लोकांपेक्षा अधिक चतुर असतात.
9आणखी मी तुम्हांला सांगतो, अनीतिकारक धन नाहीसे होईल तेव्हा शाश्वत निवासस्थानी तुमचे स्वागत व्हावे म्हणून तुम्ही आपणासाठी अनीतिकारक धनाने मित्र जोडा. 10जो अगदी थोडक्याविषयी विश्वासू आहे तो पुष्कळाविषयीही विश्वासू आहे आणि जो अगदी थोडक्याविषयी अप्रामाणिक आहे तो पुष्कळाविषयीही अप्रामाणिक आहे. 11म्हणून जर तुम्ही अनीतिकारक धनाविषयी विश्वासू झाला नाही, तर जे खरे धन ते तुम्हांला कोण सोपवून देईल? 12तसेच जे दुसऱ्याचे त्याविषयी तुम्ही विश्वासू झाला नाही, तर जे तुमचे स्वतःचे आहे, ते तुम्हांला कोण देईल?
13कोणत्याही दासाला दोन धन्यांची सेवाचाकरी करता येत नाही. तो एकाचा द्वेष करील व दुसऱ्यावर प्रीती करील अथवा एकाला धरून राहील व दुसऱ्याला तुच्छ मानील. तुम्हांला देवाची व धनाची सेवाचाकरी करता येणार नाही.”
परुश्यांचा निषेध
14धनलोभी परुशी हे सर्व ऐकत होते व त्याला नाक मुरडत होते. 15त्याने त्यांना म्हटले, तुम्ही स्वतःला लोकांपुढे नीतिमान म्हणवून घेणारे आहात परंतु देव तुमची अंतःकरणे ओळखतो. माणसाला जे मौल्यवान वाटते ते देवाच्या दृष्टीने तिरस्करणीय आहे.
16योहानपर्यंत नियमशास्त्र व संदेष्ट्यांचे लेख अंमलात होते. तेव्हापासून देवाच्या राज्याची घोषणा केली जात आहे आणि प्रत्येक मनुष्य त्यात प्रवेश मिळविण्यासाठी आक्रमण करण्याचा प्रयत्न करतो. 17परंतु नियमशास्त्रातील एकही कानामात्रा रद्द होण्यापेक्षा आकाश व पृथ्वी नाहीशी होणे सोपे आहे.
18जो कोणी आपली पत्नी टाकून दुसरीबरोबर लग्न करतो तो व्यभिचार करतो आणि पतीने टाकलेल्या स्त्रीबरोबर जो लग्न करतो, तो व्यभिचार करतो.
श्रीमंत मनुष्य व गरीब लाजर
19एक श्रीमंत मनुष्य होता. तो जांभळी व तलम वस्त्रे घालून, दररोज थाटामाटाने चैन करत असे. 20त्याच्या फाटकाजवळ फोडांनी भरलेल्या लाजर नावाच्या एका गरीब माणसाला ठेवण्यात आले होते. 21त्या श्रीमंताच्या टेबलावरून खाली पडेल त्यावर आपले पोट भरावे, अशी त्याची इच्छा असे. तेथे कुत्रे येऊन त्याचे फोड चाटीत असत.
22पुढे असे झाले की, तो गरीब माणूस निधन पावला आणि देवदूतांनी त्याला अब्राहामच्या उराशी नेऊन ठेवले. श्रीमंतही मरण पावला व त्याची उत्तरक्रिया करण्यात आली. 23तो अधोलोकात यातना भोगत असताना, त्याने आपली दृष्टी वर करून अब्राहाम व त्याच्या उराशी असलेला लाजर ह्यांना दुरून पाहिले. 24तेव्हा त्याने हाक मारून म्हटले, ‘हे बापा अब्राहाम, लाजरने त्याच्या बोटाचे टोक पाण्यात बुडवून माझी जीभ थंड करावी म्हणून माझ्यावर दया करून त्याला माझ्याकडे पाठव, कारण ह्या ज्वालांत मी क्लेश भोगत आहे.’
25परंतु अब्राहाम म्हणाला, ‘मुला, तू तुझ्या आयुष्यात तुझे सुख उपभोगलेस तसे लाजरने दुःख भोगले, ह्याची आठवण कर. परंतु आता त्याला येथे समाधान मिळत आहे व तू क्लेश भोगत आहेस. 26एवढेच नव्हे, तर जे इकडून तुमच्याकडे पार जाऊ पाहतात त्यांना जाता येऊ नये व तिकडून कोणी आमच्याकडे येऊ नये म्हणून आमच्या व तुमच्यामध्ये मोठी दरी आहे.’ 27तो म्हणाला, ‘बापा, तर मग मी विनंती करतो, त्याला माझ्या बापाच्या घरी पाठव. 28तिथे मला पाच भाऊ आहेत, त्यांनी तरी ह्या यातनेच्या स्थळी येऊ नये म्हणून त्याने जाऊन त्यांना सावध करावे.’
29परंतु अब्राहामने त्याला म्हटले, ‘त्यांच्याजवळ मोशे व संदेष्टे आहेत. त्यांचे त्यांनी ऐकावे.’ 30तो म्हणाला, ‘हे बापा अब्राहाम, ते पुरे आहे असे नाही, मात्र मेलेल्यांमधून कोणी त्यांच्याकडे गेला, तर ते पश्चात्ताप करतील.’ 31तेव्हा त्याने त्याला म्हटले, ‘ते मोशेचे व संदेष्ट्यांचे ऐकत नसतील, तर मेलेल्यांमधूनसुद्धा कोणी उठला तरी त्यांची खातरी पटणार नाही.’”

Trenutno odabrano:

लूक 16: MACLBSI

Istaknuto

Podijeli

Kopiraj

None

Želiš li svoje istaknute stihove spremiti na sve svoje uređaje? Prijavi se ili registriraj