मत्तय 17

17
येशूचे रूपांतर
1सहा दिवसांनंतर येशूने पेत्र, याकोब व त्याचा भाऊ योहान ह्यांना आपल्याबरोबर एका उंच डोंगरावर एकांती नेले. 2तेथे त्यांच्यादेखत त्याचे रूपांतर झाले. त्याचा चेहरा सूर्यासारखा तेजस्वी झाला आणि त्याची वस्त्रे प्रकाशासारखी शुभ्र झाली. 3तेव्हा पाहा, मोशे व एलिया हे त्याच्याबरोबर संभाषण करत असलेले त्यांच्या दृष्टीस पडले. 4पेत्र म्हणाला, “गुरुवर्य, आपण येथे आहोत, हे किती चांगले आहे! आपली इच्छा असल्यास मी येथे तीन मंडप उभारतो - आपणासाठी एक, मोशेसाठी एक व एलियासाठी एक.”
5तो बोलत असताना प्रकाशमान मेघाने त्यांच्यावर छाया धरली आणि मेघातून अशी वाणी झाली, “हा माझा प्रिय पुत्र आहे. ह्याच्याविषयी मी प्रसन्न आहे. ह्याचे तुम्ही ऐका.”
6हे ऐकून शिष्य इतके भयभीत झाले की, ते पालथे पडले. 7येशूने जवळ येऊन त्यांना स्पर्श करून म्हटले, “उठा, भिऊ नका.” 8त्यांनी दृष्टी वर करून पाहिले तेव्हा येशूशिवाय कोणी त्यांना दिसला नाही.
9ते डोंगरावरून खाली येताना येशूने त्यांना आदेश दिला, “तुम्ही जे पाहिले ते मनुष्याचा पुत्र मृतांमधून उठेपर्यंत कोणालाही सांगू नका.”
10त्यावर त्याच्या शिष्यांनी त्याला विचारले, “प्रथम एलिया आला पाहिजे, असे शास्त्री का म्हणतात?”
11त्याने उत्तर दिले, “एलिया प्रथम येऊन सर्व काही यथास्थित करतो, हे खरे आहे, 12पण मी तुम्हांला सांगतो, एलिया तर आला आहे आणि लोकांनी त्याला न ओळखता त्यांना वाटले तसे त्याचे केले. त्याप्रमाणे मनुष्याचा पुत्रही त्यांचे सोसणार आहे.”
13तेव्हा हा आपल्याला बाप्तिस्मा देणाऱ्या योहानविषयी सांगतो, हे शिष्यांच्या ध्यानात आले.
भूतग्रस्त मुलगा
14ते लोकसमुदायाजवळ आल्यावर एक मनुष्य येशूकडे येऊन गुडघे टेकून म्हणाला, 15“प्रभो, माझ्या मुलावर दया करा. तो फेफरेकरी असून त्याचे हाल होतात. तो वारंवार विस्तवात व पाण्यात पडतो. 16मी त्याला आपल्या शिष्यांकडे आणले परंतु त्यांना त्याला बरे करता आले नाही.”
17येशूने उत्तर दिले, “अहो विश्वासहीन व चुकलेल्या लोकांनो, मी कुठवर तुमच्याबरोबर असणार? कुठवर तुम्हांला समजून घेणार? त्याला येथे माझ्याजवळ आणा.” 18येशूने भुताला निघून जाण्याचा हुकूम सोडताच ते त्याच्यातून निघून गेले आणि त्याच घटकेपासून मुलगा बरा झाला.
19त्यानंतर ते एकटे असताना शिष्यांनी येशूला विचारले, “आम्हांला ते का काढता आले नाही?”
20तो त्यांना म्हणाला, “तुमच्या अल्पविश्वासामुळे. मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, जर तुमच्यामध्ये मोहरीच्या दाण्याएवढा विश्वास असला तर ह्या डोंगराला ‘इकडून तिकडे जा’, असे म्हटल्यास तो जाईल. तुम्हांला काहीच असाध्य होणार नाही. 21[तरी पण प्रार्थना व उपवास ह्यांवाचून असल्या प्रकारचे भूत निघत नाहीर्.]”
मृत्यूबद्दल दुसऱ्यांदा केलेले भाकीत
22त्याचे शिष्य गालीलमध्ये एकत्र जमले असताना येशू त्यांना म्हणाला, “मनुष्याचा पुत्र लोकांच्या हाती धरून दिला जाणार आहे.” 23ते त्याला ठार मारतील आणि तिसऱ्या दिवशी तो उठवला जाईल.” तेव्हा ते फार खिन्न झाले.
मंदिराचा कर
24येशू आणि त्याचे शिष्य कफर्णहूमात आल्यावर मंदिराचा कर वसूल करणारे पेत्राकडे येऊन म्हणाले, “तुमचे गुरू मंदिराचा कर भरतात का?”
25त्याने म्हटले, “हो भरतात.” मग पेत्र घरात आल्यावर तो काही बोलण्याच्या अगोदर येशू म्हणाला, “शिमोन, तुला काय वाटते? पृथ्वीवरील राजे जकात किंवा कर कोणाकडून घेतात? स्वतःच्या मुलांकडून की परक्यांकडून?”
26“परक्यांकडून”, असे त्याने म्हटल्यावर येशू त्याला म्हणाला, “तर मुले मोकळी आहेत. 27तरी पण आपण त्यांना अडखळण होऊ नये म्हणून तू जाऊन सरोवरात गळ टाक आणि पहिल्याने वर येईल तो मासा धरून त्याचे तोंड उघड. तुला जे नाणे सापडेल, ते नाणे माझ्यातर्फे व तुझ्यातर्फे कर म्हणून दे.”

Pati Souliye

Pataje

Kopye

None

Ou vle gen souliye ou yo sere sou tout aparèy ou yo? Enskri oswa konekte