प्रेषित 4
4
न्यायसभेपुढे पेत्र व योहान
1पेत्र व योहान लोकांशी बोलत असताना याजकगण, मंदिराच्या रक्षकांचा प्रमुख आणि काही सदूकी लोक त्यांच्याकडे आले. 2ते अत्यंत अस्वस्थ झाले, कारण प्रेषित शिक्षण देत होते व येशूंच्याद्वारे मृतांचे पुनरुत्थान होईल असे लोकांना जाहीरपणे सांगत होते. 3त्यांनी पेत्र व योहानाला अटक केली आणि संध्याकाळ झाल्यामुळे त्यांना दुसर्या दिवशीही कैदेतच ठेवले. 4त्यांच्यातील अनेकांनी संदेश ऐकला आणि विश्वास ठेवला; म्हणून विश्वास ठेवणार्या पुरुषांची संख्या सुमारे पाच हजारापर्यंत गेली.
5नंतर दुसर्या दिवशी असे झाले की शासक, वडीलजन आणि नियमशास्त्र शिक्षक यरुशलेममध्ये एकत्रित भेटले. 6महायाजक हन्ना तिथे होता, तसेच कयफा, योहान, आलेक्सांद्र आणि महायाजकांच्या कुटुंबातील इतर सर्वजण तिथे हजर होते. 7त्यांनी पेत्र व योहान यांना आपल्यासमोर बोलाविले व त्यांना प्रश्न विचारण्यास सुरुवात केली: “तुम्ही कोणत्या अधिकाराने किंवा कोणाच्या नावाने हे केले आहे?”
8नंतर पेत्र पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन त्यांना म्हणाला: “अधिकारी आणि वडीलजनांनो! 9या लंगड्या मनुष्याच्या बाबतीत दयाळूपणाचे जे कृत्य करण्यात आले व तो कसा बरा झाला याची जर आपण तपासणी करीत असाल, 10तर मला तुम्हाला आणि सर्व इस्राएली लोकांना सांगू द्या की, ज्या येशूंना तुम्ही क्रूसावर चढवून ठार मारले, परंतु परमेश्वराने त्यांना मरणातून पुनः उठविले, त्याच नासरेथकर येशू ख्रिस्ताच्या नावाने, हा मनुष्य येथे पूर्ण बरा होऊन तुमच्यासमोर उभा आहे.” 11धर्मशास्त्रात याच येशूंबद्दल असे लिहिले आहे,
“ ‘जो दगड बांधणार्यांनी नाकारला,
तोच इमारतीचा कोनशिला झाला आहे.’#4:11 स्तोत्र 118:22
12तारण दुसर्या कोणामध्येही सापडणार नाही, कारण ज्या नावाने आपले तारण होईल, असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मानवजातीमध्ये दिलेले नाही.”
13त्यांनी पेत्र व योहान यांचे धैर्य पाहिले तेव्हा त्याचे त्यांना नवल वाटले आणि त्यांना कळून आले की ती अशिक्षित व सर्वसामान्य माणसे असून ते येशूंच्या सहवासात राहत होते. 14आणि त्या बरे झालेल्या मनुष्याला त्यांच्याजवळ उभे असलेले पाहून, त्यांच्याने काही बोलवेना. 15त्यावेळी त्यांनी त्यांना न्यायसभेच्या बाहेर जाण्यास सांगितले आणि एकत्र चर्चा केली. 16“आपण या मनुष्यांचे काय करावे?” ते म्हणाले, “यरुशलेमकरांना माहीत आहे की त्यांनी हा असाधारण चमत्कार करून दाखविला आहे आणि आम्ही हे नाकारू शकत नाही. 17तरी या गोष्टी लोकांमध्ये अधिक पसरू नये म्हणून आपण त्यांना अशी धमकी द्यावी की यापुढे त्यांनी या नावाने कोणाबरोबर काहीही बोलू नये.”
18तेव्हा त्यांनी त्यांना परत आत बोलाविले आणि येशूंच्या नावाने पुन्हा बोलू नये किंवा शिक्षण देऊ नये, अशी ताकीद दिली. 19परंतु पेत्र व योहानाने उत्तर दिले, “परमेश्वराच्या दृष्टीने काय योग्य आहे याचा न्याय तुम्हीच करा! तुमचे ऐकावे की त्यांचे? 20ज्यागोष्टी आम्ही पाहिल्या आणि ऐकल्या आहेत, त्याबद्दल सांगण्याचे आम्ही थांबविणार नाही.”
21अशी धमकी दिल्यानंतर, त्यांनी त्यांना जाऊ दिले. त्यांना कशी शिक्षा करावी, याचा निर्णय ते घेऊ शकले नाही, कारण घडलेल्या गोष्टीमुळे सर्व लोक परमेश्वराचे गौरव करीत होते, 22जो मनुष्य आश्चर्यकारक रीतीने बरा झाला होता, त्याचे वय चाळीस वर्षांहून अधिक होते.
विश्वासणार्यांची प्रार्थना
23पेत्र व योहानाची सुटका झाल्याबरोबर, ते दुसर्या शिष्यांकडे गेले आणि मुख्य याजकगण आणि वडीलजन जे काही म्हणाले, ते सर्व त्यांना सांगितले. 24त्यांचे हे विवरण ऐकून सर्व विश्वासणार्यांनी मोठ्या स्वराने मिळून परमेश्वराकडे प्रार्थना केली: “सार्वभौम प्रभू, तुम्ही आकाश, पृथ्वी, सागर व त्यातील सर्वकाही निर्माण केले आहे. 25पवित्र आत्म्याद्वारे तुम्ही, तुमचा सेवक आणि आमचा पिता दावीदाच्या मुखातून बोलला आहात:
“ ‘राष्ट्रे कट का रचत आहेत
आणि लोक व्यर्थच कुटिल योजना का करीत आहेत?
26प्रभू आणि त्यांच्या अभिषिक्ताविरुद्ध#4:26 किंवा ख्रिस्त
पृथ्वीवरील राजे आणि अधिकारी एकत्र येऊन उठाव करीत आहेत.’
27खरोखर हेरोद राजा आणि राज्यपाल पंतय पिलात आणि सर्व गैरयहूदी आणि त्याचप्रमाणे या शहरात राहणारे इस्राएली लोक तुमचे पवित्र सेवक येशू, ज्यांचा तुम्ही अभिषेक केला आहे, त्यांच्याविरुद्ध कट कारस्थान करण्यास एकत्र आले. 28तुमच्या शक्तीने आणि इच्छेने जे घडावे असे तुम्ही योजले होते तेच त्यांनी केले. 29तर आता, हे प्रभू, त्यांच्या धमक्यांकडे लक्ष द्या आणि मोठ्या धैर्याने तुमचे वचन सांगण्यासाठी तुमच्या सेवकांना सामर्थ्य द्या. 30तुमचे पवित्र सेवक येशूंच्या नावामध्ये आजार बरे होण्यासाठी चिन्हे आणि आश्चर्यकारक गोष्टी करून दाखविण्यासाठी तुम्ही आपला हात लांब करा.”
31या प्रार्थनेनंतर ज्या ठिकाणी ते जमले होते, ती हादरली आणि ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन धैर्याने परमेश्वराचे वचन सांगू लागले.
विश्वासणारे त्यांची मालमत्ता एकमेकांना वाटून देतात
32त्यावेळी सर्व विश्वासणारे एक हृदयाचे आणि एकमनाचे होते. त्यांच्यापैकी कोणीही त्यांची संपत्ती स्वतःची आहे असे हक्काने सांगत नव्हते, परंतु त्यांच्याकडे असलेले सर्वकाही त्यांनी समाईक मानले होते. 33प्रभू येशूंच्या पुनरुत्थानाविषयी प्रेषित मोठ्या शक्तीने सतत साक्ष देत राहिले आणि त्या सर्वांवर परमेश्वराची विपुल कृपा शक्तीने कार्य करीत होती. 34त्यांच्यामध्ये गरजवंत असा कोणीही राहिला नव्हता. कारण घर व जमिनीचे जे मालक होते, ते त्यांची घरे व जमिनी विकून आलेले पैसे 35प्रेषितांच्या चरणी आणून ठेवीत होते आणि जे कोणी गरजवंत होते, त्यांना वाटून देत.
36योसेफ लेवी असून सायप्रसवासी होता ज्याला प्रेषितांनी बर्णबा म्हणजे, “उत्तेजनाचा पुत्र” असे नाव दिले होते, 37त्याने त्याच्या मालकीची शेतजमीन विकून मिळालेली रक्कम प्रेषितांच्या चरणी आणून ठेवली.
Jelenleg kiválasztva:
प्रेषित 4: MRCV
Kiemelés
Megosztás
Másolás
Szeretnéd, hogy a kiemeléseid minden eszközödön megjelenjenek? Regisztrálj vagy jelentkezz be
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.