प्रेषित 5
5
हनन्याह व सप्पीरा
1आता हनन्याह नावाचा मनुष्य आणि त्याची पत्नी सप्पीरा या दोघांनी मिळून आपल्या संपत्तीचा एक भाग विकला. 2मिळालेल्या पैशातून काही पैसे त्याने त्याच्या पत्नीच्या पूर्ण संमतीने स्वतःसाठी ठेवले व बाकीचे पैसे आणून प्रेषितांच्या चरणी ठेवले.
3परंतु पेत्र म्हणाला, “हनन्याह, सैतानाने तुझे हृदय एवढे कसे भरले की तू पवित्र आत्म्याशी लबाडी केलीस व मालमत्ता विकून आलेल्या पैशातून काही पैसे तुझ्या स्वतःसाठी ठेवून घेतलेस? 4संपत्ती विकण्यापूर्वी ती तुझ्या मालकीची नव्हती का आणि ती विकल्यानंतर, त्या पैशाचा वापर कसा करावा हे देखील तुझ्या अधिकारात नव्हते का? तर मग असे करण्याचे तुझ्या मनात कसे आले? तू केवळ मनुष्याबरोबर नाही तर परमेश्वराबरोबर लबाडी केली आहेस.”
5हे शब्द ऐकताच हनन्याह खाली कोसळला आणि मरण पावला. घडलेल्या गोष्टी ऐकून सर्वजण भयभीत झाले. 6नंतर काही तरुण पुरुष पुढे आले आणि त्यांनी त्याचा मृतदेह गुंडाळला व बाहेर नेऊन पुरून टाकला.
7सुमारे तीन तासानंतर त्याची पत्नी आत आली, काय घडले होते याची तिला कल्पना नव्हती. 8पेत्राने तिला विचारले, मला सांग “तुला व हनन्याला जमिनीची इतकीच किंमत मिळाली काय?”
तिने उत्तर दिले, “होय, तितकीच किंमत.”
9मग पेत्र तिला म्हणाला, “प्रभूच्या आत्म्याची परीक्षा पाहण्यासाठी तुम्ही कट का केला? ऐक, ज्या पुरुषांनी तुझ्या पतीला नुकतेच पुरले आहे त्यांचे पाय दारातच आहेत आणि ते तुलादेखील उचलून बाहेर नेतील.”
10त्याच क्षणी ती त्याच्या पायावर कोसळली आणि मरण पावली आणि ते तरुण आत आले व तिचा मृत्यू झाल्याचे पाहून तिला बाहेर नेऊन तिच्या नवर्याजवळ पुरले. 11सर्व मंडळी आणि ज्या सर्वांनी हे ऐकले ते सारे भयभीत झाले.
प्रेषित अनेकांना बरे करतात
12प्रेषित लोकांमध्ये अनेक चिन्हे व अद्भुत कृत्ये करीत होते आणि सर्व विश्वासणारे एकत्रितपणे शलोमोनाच्या देवडीत जमत असत, 13त्यांच्याबद्दल लोकांच्या मनात अत्यंत सन्मान होता, परंतु त्यांच्यात सामील होण्याचे धैर्य कोणाला झाले नाही. 14तरी देखील अधिकाधिक पुरुषांनी व स्त्रियांनी प्रभूवर विश्वास ठेवला आणि त्यांच्या संख्येत वाढ झाली. 15याचा परिणाम असा झाला की, पेत्र जवळून जात असताना निदान त्याची छाया तरी त्यांच्यातील काही जणांवर पडावी म्हणून आजारी लोकांना बाहेर रस्त्यावर आणून खाटांवर आणि अंथरुणावर ठेवीत असत. 16यरुशलेमच्या आसपासच्या गावातून लोकसमुदाय येताना त्यांच्याबरोबर आजारी व अशुद्ध आत्म्यांनी पीडलेल्यांना आणत होते आणि ते सर्वजण बरे होऊन जात.
प्रेषितांचा छळ होतो
17नंतर महायाजक आणि त्यांचे सहकारी जे सर्व सदूकी पंथाचे सभासद होते, ते मत्सराने भरून गेले. 18त्यांनी प्रेषितांना अटक करून सार्वजनिक तुरुंगात डांबले. 19परंतु रात्रीच्या समयी प्रभूच्या देवदूताने तुरुंगाचे दरवाजे उघडून त्यांना बाहेर काढले. 20तो म्हणाला, “मंदिराच्या आवारात जा आणि या नवजीवनाबद्दल लोकांना सांगा.”
21ते पहाटेच मंदिराच्या आवारात गेले आणि त्यांना सांगितल्याप्रमाणे लगेच त्यांनी शिक्षण देण्यास सुरुवात केली.
जेव्हा महायाजक व त्यांचे सहकारी आले, तेव्हा त्यांनी न्यायसभा व यहूदी वडीलमंडळीला एकत्र बोलाविले आणि प्रेषितांना तुरुंगातून चौकशीसाठी घेऊन यावे अशी आज्ञा केली. 22तुरुंगामध्ये गेल्यानंतर, अधिकार्यांना तिथे प्रेषित आढळले नाहीत म्हणून ते परतले आणि त्यांना सांगितले की, 23“तुरुंगाचे दरवाजे व्यवस्थित बंद केलेले होते आणि पहारेकरी दाराबाहेर उभे होते. परंतु आम्ही दरवाजे उघडले, तेव्हा आम्हाला कोणीही आढळले नाही.” 24मंदिराच्या सुरक्षा अधिकार्याने व मुख्य याजकांनी हे ऐकले, तेव्हा पुढे काय घडेल याबद्दल ते घोटाळ्यात पडले.
25इतक्यात कोणीतरी येऊन सांगितले, “पाहा! ज्यांना तुम्ही तुरुंगात ठेवले होते ती माणसे मंदिराच्या आवारात उभे राहून लोकांना शिक्षण देत आहेत.” 26तेव्हा सुरक्षा अधिकारी आपल्याबरोबर काही शिपाई घेऊन गेला आणि त्याने प्रेषितांना जुलूम न करता आणले, कारण लोक आपल्याला धोंडमार करतील, अशी त्यांना भीती वाटत होती.
27प्रेषितांना घेऊन आल्यानंतर, महायाजकाने त्यांना प्रश्न विचारावे म्हणून न्यायसभेपुढे आणून उभे केले. 28ते म्हणाले, “या नावाने शिकवू नका, असे आम्ही तुम्हाला कडक शब्दात सांगितले होते तरी पाहा, तुम्ही तुमच्या शिक्षणाने सारे यरुशलेम भरून टाकले आहे आणि या मनुष्याच्या रक्ताचा दोष आम्हावर लावण्याचा निश्चय केला आहे.”
29परंतु पेत्र व इतर प्रेषितांनी उत्तर दिले, “आम्ही मनुष्यापेक्षा परमेश्वराची आज्ञा पाळलीच पाहिजे. 30तुम्ही येशूंना क्रूसावर टांगून मारल्यानंतर आमच्या पूर्वजांच्या परमेश्वराने येशूंना मरणातून पुन्हा जिवंत केले. 31आता परमेश्वराने त्यांना उच्च केले व राजपुत्र आणि तारणारा म्हणून स्वतःच्या उजवीकडे बसविले आहे, ते यासाठी की इस्राएली लोकांना पश्चात्ताप व पापक्षमेचा लाभ व्हावा. 32या गोष्टींचे आम्ही साक्षी आहोत आणि पवित्र आत्मा, ज्याला परमेश्वराने जे त्यांची आज्ञा पाळतात त्यांना दिला आहे तोही साक्षी आहे.”
33हे ऐकल्यावर ते अतिशय संतापले व त्यांना मारून टाकण्याचे त्यांनी ठरविले. 34परंतु गमालियेल नावाचा एक परूशी, जो शास्त्राध्यापक व सर्व लोकांमध्ये सन्मान्य मानलेला, न्यायसभेपुढे उभा राहिला आणि त्याने या माणसांना थोडा वेळ बाहेर न्यावे, अशी आज्ञा केली. 35मग तो न्यायसभेला उद्देशून म्हणाला, “अहो इस्राएली लोकहो, या मनुष्यांच्या बाबतीत काही करण्याच्या तुमच्या उद्देशाचा काळजीपूर्वक विचार करा. 36काही काळापूर्वी थुदास नावाचा मनुष्य पुढे येऊन मी कोणीतरी आहे असे म्हणू लागला, त्याला सुमारे चारशे अनुयायी मिळाले. त्याचा वध करण्यात येऊन सर्व अनुयायांची पांगापांग झाली व सर्वकाही नष्ट झाले. 37त्याच्यानंतर शिरगणतीच्या वेळी, गालीलकर यहूदाह पुढे आला आणि त्याने एका टोळीस बंडास प्रवृत्त केले. परंतु तो सुद्धा मारला गेला आणि त्याच्या अनुयायांचीही पांगापांग झाली. 38म्हणून मी तुम्हाला या सद्य परिस्थितीत असा सल्ला देत आहे की या माणसांना सोडून द्या. त्यांना जाऊ द्या, कारण हा बेत किंवा कार्य मनुष्यांचे असेल, तर ते नष्ट होईल. 39परंतु जर हे परमेश्वराचे असेल, तर तुम्ही या माणसांना थांबविण्यास समर्थ होणार नाही आणि तुम्ही केवळ परमेश्वराविरुद्ध लढत आहात, असे तुम्हाला आढळून येईल.”
40त्याच्या भाषणामुळे त्यांचे मन वळाले; त्यांनी प्रेषितांना आत बोलावून फटके मारविले आणि येशूंच्या नावाने पुन्हा कधीही बोलू नका, अशी ताकीद देऊन त्यांना सोडून दिले.
41प्रेषित तर न्यायसभेतून आनंद करीत बाहेर पडले. कारण येशूंच्या नावाकरिता अप्रतिष्ठा सहन करण्यासाठी ते पात्र ठरविले गेले होते. 42आणि प्रत्येक दिवशी मंदिराच्या आवारात व घरोघरी जाऊन “येशू हेच ख्रिस्त आहेत” याबद्दलचे शिक्षण देण्याचे व शुभवार्तेची घोषणा करण्याचे त्यांनी थांबविले नाही.
Jelenleg kiválasztva:
प्रेषित 5: MRCV
Kiemelés
Megosztás
Másolás
Szeretnéd, hogy a kiemeléseid minden eszközödön megjelenjenek? Regisztrálj vagy jelentkezz be
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.