प्रेषित 6

6
सात सेवकांची निवड
1त्या दिवसांमध्ये शिष्यांची संख्या वाढत असताना, त्यांच्यापैकी काही ग्रीक भाषिक यहूदी#6:1 ज्या यहूदी लोकांनी ग्रीक भाषा व संस्कृती स्वीकारली होती. लोकांनी इब्री भाषिक यहूदी लोकांविरुद्ध तक्रार केली की दररोजच्या भोजनाचे वाटप होत असताना त्यांच्या विधवांकडे दुर्लक्ष होत आहे. 2तेव्हा बारा प्रेषितांनी सर्व शिष्यांना एकत्रित बोलावून सांगितले, “आम्हास हे योग्य वाटत नाही की आम्ही परमेश्वराच्या वचनाच्या सेवेकडे दुर्लक्ष करून अन्न वाटपाची सेवा करावी. 3तर बंधूंनो आणि भगिनींनो, तुमच्यामधून जे आत्म्याने परिपूर्ण आणि सुज्ञ आहेत अशा सात माणसांची निवड करा म्हणजे आम्ही त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवून देऊ. 4आणि मग प्रार्थनेकडे व वचनाची सेवा करण्याकडे आम्हाला आमचे लक्ष लावता येईल.”
5गटातील सर्वांस हा प्रस्ताव योग्य वाटला. त्यांनी स्तेफनाची निवड केली, जो विश्वासाने आणि पवित्र आत्म्याने परिपूर्ण होता; फिलिप्प, प्रखर, नीकानुर, तीमोन, पर्मिना व नीकलाव हा अंत्युखियाचा असून यहूदी मतानुसार त्याचे परिवर्तन झालेले होते 6या पुरुषांना प्रेषितांपुढे सादर करण्यात आले. त्यांनी त्यांच्यासाठी प्रार्थना करून त्यांच्यावर आपले हात ठेवले.
7मग परमेश्वराच्या वचनाचा प्रसार झाला. यरुशलेममध्ये शिष्यांची संख्या मोठ्या वेगाने वाढली आणि अनेक याजकांनी देखील मोठ्या संख्येने विश्वासाचे आज्ञापालन केले.
स्तेफनाला पकडण्यात येते
8आता स्तेफन परमेश्वराच्या कृपेने आणि सामर्थ्याने परिपूर्ण असा मनुष्य होता आणि त्याने लोकांमध्ये मोठी आश्चर्यकृत्ये व चिन्हे केली होती. 9परंतु लिबेर्तिन (असे ज्यास म्हणत होते त्या) सभागृहातील काही सभासद, कुरेनेकर, आलेक्सांद्रेयकर आणि किलिकिया व आशिया प्रदेशातील यहूदी लोक स्तेफनाबरोबर वादविवाद करू लागले. 10परंतु स्तेफन जे आत्म्याच्या ज्ञानाद्वारे बोलला त्याला विरोध करण्यास ते समर्थ ठरले नाहीत.
11मग त्यांनी गुप्तपणे काही माणसांना फूस लावली व बोलण्यास भाग पाडले, “स्तेफनाला मोशे आणि परमेश्वर यांची निंदा करताना आम्ही ऐकले आहे.”
12अशा रीतीने त्यांनी लोकांना व तसेच वडिलांना आणि नियमशास्त्र शिक्षकांना चिथविले. त्यांनी स्तेफनाला जबरदस्तीने धरले व न्यायसभेपुढे आणले. 13त्यांनी खोट्या साक्षीदारांना प्रस्तुत केले व त्यांनी अशी साक्ष दिली, “तो सतत पवित्र ठिकाणाविरुद्ध व नियमांविरुद्ध बोलतो. 14ते आणखी म्हणाले, आम्ही याला असे म्हणताना ऐकले आहे की नासरेथकर येशू हे ठिकाण उद्ध्वस्त करतील आणि मोशेने आपल्याला लावून दिलेले नियमशास्त्र बदलून टाकतील.”
15आणि न्यायसभेत बसलेले सर्वजण त्याच्याकडे एकाग्रतेने पाहत असताना त्यांना स्तेफनाचा चेहरा देवदूताच्या चेहर्‍यासारखा दिसला.

Jelenleg kiválasztva:

प्रेषित 6: MRCV

Kiemelés

Megosztás

Másolás

None

Szeretnéd, hogy a kiemeléseid minden eszközödön megjelenjenek? Regisztrálj vagy jelentkezz be