प्रेषित 7

7
स्तेफनाचे भाषण
1तेव्हा महायाजकाने स्तेफनाला विचारले, “हे आरोप खरे आहेत काय?”
2स्तेफनाने त्यावर असे उत्तर दिले: “बंधुजनहो व वडिलांनो, माझे ऐका! आपला पिता अब्राहाम हारानात जाऊन राहण्यापूर्वी मेसोपोटामिया देशात असताना गौरवशाली परमेश्वर त्याला प्रकट झाले. 3परमेश्वर त्याला म्हणाले, ‘तू आपला देश व आपले लोक सोड आणि मी दाखवेन त्या देशात जा.’#7:3 उत्प 12:1
4“तेव्हा त्याने खाल्डियनांचा देश सोडला आणि तो हारान येथे राहिला. त्याच्या पित्याच्या मृत्यूनंतर, परमेश्वराने त्याला तुम्ही सध्या राहत आहात त्या भूमीत पाठविले. 5परमेश्वराने त्याला येथेही वतन दिले नाही, पाऊल पडेल एवढी जमीनदेखील दिली नाही. परंतु त्यावेळी अब्राहामाला मूलबाळ नव्हते, तरी परमेश्वराने त्याला असे अभिवचन दिले की, हा देश त्याला आणि त्याच्या नंतरच्या संततीला वतन म्हणून दिला जाईल. 6परमेश्वर त्याच्याशी अशा रीतीने बोलले: ‘तुझे वंशज, जो देश त्यांचा स्वतःचा नाही अशा देशात परके गुलाम म्हणून राहतील व त्यांना चारशे वर्षे बंदिस्त करून अन्यायाने वागविले जाईल. 7परंतु ज्या राष्ट्रात त्यांनी गुलाम म्हणून सेवा केली त्याला मी शिक्षा करेन,’ असे परमेश्वराने म्हटले, ‘आणि शेवटी त्या देशातून ते बाहेर येतील आणि या ठिकाणी माझी उपासना करतील.’#7:7 उत्प 15:13, 14 8नंतर परमेश्वराने अब्राहामाला, सुंतेचा करार दिला आणि अब्राहाम इसहाकाचा पिता झाला आणि तो आठ दिवसांचा असतानाच त्याची सुंता झाली. पुढे इसहाक हा याकोबाचा पिता झाला आणि याकोब हा बारा पूर्वजांचा पिता झाला.
9“कारण पूर्वज योसेफाचा मत्सर करीत होते, म्हणून त्यांनी त्याला इजिप्तमध्ये गुलाम म्हणून विकले. परंतु परमेश्वर त्याच्याबरोबर होते, 10आणि त्यांनी योसेफाला त्याच्या सर्व संकटातून सोडविले. परमेश्वराने योसेफाला ज्ञान दिले आणि इजिप्तचा राजा फारोहची त्याच्यावर कृपादृष्टी होईल असे केले. म्हणून फारोहने त्याची इजिप्तवर शासक आणि त्याच्या राजवाड्यातील सर्व कार्यभार पाहण्यासाठी नेमणूक केली.
11“तेव्हा इजिप्त आणि कनान देशामध्ये दुष्काळ पडला आणि सर्वठिकाणी हाहाकार माजला, तेव्हा आपल्या पूर्वजांना अन्न मिळेना. 12जेव्हा याकोबाने ऐकले की इजिप्त देशामध्ये धान्य आहे, तेव्हा त्याने आपल्या पूर्वजांना प्रथम भेटीसाठी त्या देशात पाठविले. 13त्यांच्या दुसर्‍या भेटीच्या वेळी योसेफाने आपण कोण आहोत याची ओळख आपल्या भावांना करून दिली व योसेफाच्या घराण्याविषयी फारोह राजाला सर्वकाही कळले. 14यानंतर, योसेफाने त्याचा पिता याकोबाला आणि त्याच्या सर्व कुटुंबीयांनी बोलावून घेतले. ते सर्वजण मिळून पंचाहत्तर लोक होते. 15नंतर याकोब खाली इजिप्तमध्ये आला आणि तिथेच तो आणि आपले पूर्वज मरण पावले. 16त्यांचे मृतदेह शेखेमात आणण्यात आले व अब्राहामाने हमोराच्या पुत्रांना पैसे देऊन विकत घेतलेल्या कबरेत पुरण्यात आले.
17“अब्राहामाला दिलेले परमेश्वराचे वचन पूर्ण करण्याचा काळ जवळ आला, त्यावेळेस इजिप्तमध्ये आपल्या लोकांची संख्या खूपच झपाट्याने वाढलेली होती. 18नंतर ‘एक नवीन राजा इजिप्तच्या गादीवर आला. त्याच्या दृष्टीने योसेफ कोणीही नव्हता.’#7:18 निर्ग 1:8 19हा राजा आपल्या लोकांशी दगाबाजीने व निष्ठुरपणाने वागला व त्याने त्यांची नवजात बालके जगू नयेत, म्हणून त्यांना बाहेर फेकण्यास भाग पाडले.
20“याच सुमारास मोशेचा जन्म झाला आणि तो असाधारण बालक होता. तीन महिने त्याच्या घरातील लोकांनी त्याची काळजी घेतली, 21त्याला बाहेर ठेवले असताना, फारोहच्या कन्येने त्याला घेतले आणि स्वतःचा पुत्र म्हणून त्याचे पालनपोषण करून त्याला वाढवले. 22मोशेला इजिप्तमधील सर्व विद्यांचे शिक्षण मिळाले व तो एक प्रभावी वक्ता आणि कृतीतही प्रभावी झाला.
23“जेव्हा मोशे चाळीस वर्षाचा झाला, त्यावेळी त्याने आपल्या इस्राएली बांधवांना भेटण्याचे मनात ठरविले. 24तिथे त्याने पाहिले की, एका इस्राएली मनुष्यास इजिप्तचा मनुष्य अन्यायाने वागवित आहे, म्हणून मोशेने त्याचे रक्षण करण्यास त्या इजिप्तच्या माणसाची हत्या करून त्याचा सूड घेतला. 25मोशेला वाटले की त्याच्या बांधवांस समजेल की परमेश्वर त्यांची सुटका करण्यासाठी त्याचा उपयोग करून घेत आहे, परंतु ते त्यांना समजले नाही. 26दुसर्‍या दिवशी मोशेला दोन इस्राएली माणसे एकमेकांशी भांडताना दिसले. त्यांचा समेट करीत तो त्यांना म्हणाला, ‘गृहस्थांनो, तुम्ही भाऊबंद आहात; तुम्ही एकमेकांबरोबर का भांडत आहात?’
27“परंतु जो मनुष्य दुसर्‍यावर अन्याय करीत होता, त्याने मोशेला बाजूला होण्यास सांगितले. ‘तुला आमच्यावर अधिकारी व न्यायाधीश कोणी नेमले? 28काल जसे तू इजिप्त देशाच्या मनुष्याला मारून टाकलेस, तसे मलाही ठार करणार आहेस काय?’#7:28 निर्ग 2:14 29जेव्हा मोशेने हे ऐकले तेव्हा तो मिद्यानी लोकांच्या देशात पळून गेला व तिथे तो परकीय म्हणून राहिला आणि तिथे त्याला दोन पुत्र झाले.
30“चाळीस वर्षे झाल्यानंतर सीनाय पर्वताजवळ असलेल्या जंगलामध्ये एक दूत मोशेला जळत्या ज्वालाच्या झुडूपामधून प्रकट झाला. 31मोशेने ते दृश्य पाहिले, तेव्हा त्याने आश्चर्य केले. ते नीट पाहण्याकरिता तो जवळ गेला, तेव्हा त्याने प्रभूची वाणी बोलताना ऐकली: 32‘मी तुझ्या पूर्वजांचा म्हणजे अब्राहाम, इसहाक आणि याकोबाचा परमेश्वर आहे.’#7:32 निर्ग 3:6 हे ऐकताच मोशे भीतीने कापू लागला आणि त्याला तिथे पाहण्याचे धैर्य झाले नाही.
33“मग प्रभूने त्याला म्हटले, ‘तुझी पायतणे काढ, कारण ज्या भूमीवर तू उभा आहेस ती पवित्र भूमी आहे. 34इजिप्तमध्ये असलेल्या माझ्या लोकांचे अत्याचार मी खरोखरच पाहिले आहेत. त्यांचे कळवळणे मी ऐकले आहे आणि त्यांना त्यांच्या त्रासातून सोडविण्यासाठी मी खाली आलो आहे. आता ये, मी तुला परत इजिप्तकडे पाठवितो.’#7:34 निर्ग 3:5, 7, 8, 10
35“त्याच मोशेला, ‘तुला आमच्यावर अधिकारी व न्यायाधीश असे कोणी नेमले?’ असे विचारून पूर्वी झिडकारीले होते, त्याला परमेश्वराने स्वतः शासक व मुक्त करणारा म्हणून झुडूपात प्रकट झालेल्या दूताच्या द्वारे त्यांच्याकडे परत पाठविले. 36आणि अनेक अद्भुत कृत्ये व चिन्हे करून त्याने त्यांना इजिप्त देशामधून, तांबड्या समुद्रातून आणि चाळीस वर्षे रानातून बाहेर काढले.
37“तोच मोशे ज्याने इस्राएल लोकांना सांगितले होते, ‘परमेश्वर, तुमच्या लोकांतून तुमच्यासाठी माझ्यासारखा एक संदेष्टा उभा करतील.’#7:37 अनु 18:15 38तो अरण्यात लोकसमुदायाबरोबर होता आणि सीनाय पर्वतावर परमेश्वराचा दूत जो त्याच्याशी आणि आपल्या पूर्वजांशी बोलला आणि आपल्याला देण्याकरिता जिवंत वचने त्याला मिळाली.
39“परंतु आपले पूर्वज त्याचे ऐकावयास तयार नव्हते. याव्यतिरिक्त, त्यांनी त्यास स्वीकारले नाही, कारण इजिप्तकडे परत जाण्याची इच्छा त्यांच्या मनात उत्पन्न झाली. 40त्यांनी अहरोनाला सांगितले, ‘आमच्यापुढे जातील अशी दैवते आमच्यासाठी बनव—ज्याने आम्हाला इजिप्तच्या बाहेर आणले, त्या मोशेचे काय झाले हे आम्हाला माहीत नाही!’#7:40 निर्ग 32:1 41त्याचवेळेस त्यांनी वासराच्या प्रतिरूपाची मूर्ती तयार केली. त्यांनी तिच्यासाठी बलिदान व अर्पणे आणली, स्वतःच्या हातांनी तयार केलेल्या कृती समोर ते मौज करू लागले. 42म्हणून परमेश्वराने त्यांच्याकडे पाठ फिरवून त्यांना आकाशातील सूर्य, चंद्र व ताऱ्यांची पूजा करू दिली. संदेष्ट्याच्या पुस्तकामध्ये लिहिल्याप्रमाणे:
“ ‘अहो इस्राएली लोकहो, रानात असताना
चाळीस वर्षे तुम्ही मला अर्पणे व यज्ञे आणली काय?
43तुम्ही मोलेख दैवताचा मंडप
आणि शक्कुथ व तार्‍यांचे दैवत रेफान,
उपासना करण्यासाठी या मूर्ती तुम्ही घडविल्या.
म्हणून मी तुम्हाला बाबेलच्या पलीकडे बंदिवासात पाठवेन.’#7:43 आमो 5:25‑27
44“आपले पूर्वज रानातून जाताना त्यांच्याबरोबर कराराच्या साक्षीचा निवासमंडप होता. परमेश्वराने मोशेला दिलेल्या निर्देशानुसार व नमुन्याप्रमाणे त्याची रचना करण्यात आली होती. 45जेव्हा परमेश्वराने इतर राष्ट्रांना त्यांच्या समोरून हाकलून दिले तेव्हा त्यांनी त्यांची जमीन ताब्यात घेतली आणि आपल्या पूर्वजांनी यहोशुआच्या नेतृत्वाखाली जो निवासमंडप त्यांच्याबरोबर आणला तो त्या जमिनीवर दावीद राजाच्या काळापर्यंत तिथेच राहिला. 46दावीदाने परमेश्वराची कृपादृष्टी अनुभवली आणि त्याने याकोबाच्या परमेश्वरासाठी निवासस्थान बांधता येईल का अशी विचारपूस केली. 47परंतु तो शलोमोन होता ज्याने परमेश्वरासाठी भवन बांधले.
48“तथापि, सर्वोच्च परमेश्वर मानवी हातांनी बांधलेल्या घरांमध्ये राहत नाहीत. ज्याप्रमाणे संदेष्टा असे म्हणतो:
49“ ‘स्वर्ग माझे सिंहासन आहे,
आणि पृथ्वी माझे पादासन आहे.
तर तुम्ही माझ्यासाठी कशाप्रकारचे घर बांधणार?
असे प्रभू म्हणतात.
माझे विश्रांतिस्थान कुठे असणार?
50माझ्या हाताने हे सर्व घडवले नाही काय?’#7:50 यश 66:1‑2
51“अहो ताठ मानेच्या लोकांनो! तुमची अंतःकरणे व कानांची सुंता अजूनही झालेली नाही. तुम्ही अगदी तुमच्या पूर्वजांसारखे आहात: तुम्ही नेहमी पवित्र आत्म्याला विरोध करता! 52तुमच्या पूर्वजांनी ज्याचा छळ केला नाही, असा एक तरी संदेष्टा आहे का? जो नीतिमान आहे व त्यांच्या आगमनाचे भविष्य वर्तविणार्‍यांना देखील तुम्ही जिवे मारले आणि आता तुम्ही त्यांचा विश्वासघात करून त्यांनाच जिवे मारले 53आणि देवदूतांद्वारे मिळालेल्या परमेश्वराच्या नियमांचाही तुम्ही जाणूनबुजून भंग केला.”
स्तेफनावर दगडफेक
54सभागृहातील यहूदी पुढार्‍यांनी हे ऐकले तेव्हा ते भयंकर संतापले आणि त्याच्यावर दात खाऊ लागले. 55परंतु स्तेफन, पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाला व त्याने वर स्वर्गाकडे पाहून परमेश्वराचे गौरव बघितले आणि येशू परमेश्वराच्या उजवीकडे उभे आहेत असे त्याला दिसले. 56तो म्हणाला, “पाहा, मी स्वर्ग उघडलेला आणि मानवपुत्र परमेश्वराच्या उजवीकडे उभे असलेले मला दिसत आहे.”
57मग त्यांनी त्यांचे हात त्यांच्या कानांवर ठेऊन मोठ्याने आरोळ्या मारल्या आणि त्याच्या अंगावर तुटून पडले, 58त्यांनी स्तेफनाला शहराबाहेर ओढीत नेले आणि त्याला धोंडमार करू लागले. त्याचवेळी, इकडे साक्षीदारांनी काढून ठेवलेले त्यांचे अंगरखे शौल म्हटलेल्या एका तरुण माणसाच्या पायाजवळ ठेवले होते.
59ते स्तेफनाला दगडमार करीत असताना, स्तेफनाने प्रार्थना केली, “प्रभू येशू, माझ्या आत्म्याचा स्वीकार करा.” 60आणि मग गुडघ्यावर टेकून मोठ्याने ओरडून म्हणाला, “हे प्रभू, हे पाप त्यांच्या हिशेबी धरू नका.” असे बोलल्यानंतर तो मरण पावला.

Jelenleg kiválasztva:

प्रेषित 7: MRCV

Kiemelés

Megosztás

Másolás

None

Szeretnéd, hogy a kiemeléseid minden eszközödön megjelenjenek? Regisztrálj vagy jelentkezz be