योहान 16

16
1“तुम्ही श्रद्धा सोडून बहकू नये म्हणून मी तुम्हांला ह्या गोष्टी सांगून ठेवल्या आहेत. 2तुम्हांला सभास्थानातून बहिष्कृत करण्यात येईल. इतकेच काय पण तुमचा जीव घेणाऱ्या प्रत्येकाला तो देवाची सेवा करत आहे, असे वाटेल, अशी वेळ येत आहे. 3लोकांनी पित्याला व मलाही ओळखले नसल्यामुळे ते असे करतील. 4परंतु मी तुम्हांला ह्या गोष्टी अशासाठी सांगून ठेवल्या आहेत की, त्यांची वेळ आली म्हणजे त्या मी सांगितल्याची तुम्हांला आठवण होईल. ह्या गोष्टी मी आधीपासूनच तुम्हांला सांगितल्या नाहीत, कारण आतापर्यंत मी तुमच्याबरोबर होतो.
5परंतु ज्याने मला तुमच्याकडे पाठवले त्याच्याकडे आता मी जात आहे. तरीही आपण कुठे जाता, असे तुमच्यापैकी कोणीही मला विचारत नाही. 6ह्या गोष्टी मी तुम्हांला सांगितल्यामुळे तुमचे अंतःकरण दुःखाने जड झाले आहे. 7तरीही मी तुम्हांला खरे ते सांगतो. मी जावे हे तुमच्या हिताचे आहे कारण मी गेलो नाही, तर कैवारी तुमच्याकडे येणार नाही. परंतु मी गेलो तर मी त्याला तुमच्याकडे पाठवीन. 8तो येऊन पापाविषयी, नीतिमत्वाविषयी व न्यायनिवाड्याविषयी जगाची खातरी पटवील. 9पापाविषयी, कारण ते माझ्यावर विश्वास ठेवत नाहीत; 10नीतिमत्वाविषयी, कारण मी पित्याकडे जातो आणि ह्यानंतर तुम्हांला मी दिसणार नाही 11आणि न्यायनिवाड्याविषयी, कारण ह्या जगाच्या सत्ताधीशाचा न्याय झाला आहे.
12मला अजून तुम्हांला पुष्कळ गोष्टी सांगायच्या आहेत. परंतु आताच तुमच्याने त्या सोसवणार नाहीत, 13तरी पण सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो तुम्हांला सर्व सत्याविषयी मार्गदर्शन करील. तो आपल्या स्वतःचे सांगणार नाही, तर जे काही तो ऐकेल, तेच सांगेल आणि पुढे येणाऱ्या गोष्टी तुम्हांला कळवील. 14तो माझा गौरव करील, कारण जे माझे आहे तेच तो तुम्हांला सांगेल. 15जे काही पित्याचे आहे, ते सर्व माझे आहे, म्हणून मी म्हटले, जे माझे आहे, तेच तो तुम्हांला सांगेल.
वियोगसमयीचे उद्‍गार
16थोडा वेळ मी तुम्हांला दिसणार नाही आणि पुन्हा थोड्या वेळाने तुम्ही मला पाहाल.”
17हे ऐकून त्याच्या शिष्यांपैकी काही एकमेकांना म्हणाले, “‘थोडा वेळ मी तुम्हांला दिसणार नाही आणि पुन्हा थोड्या वेळाने तुम्ही मला पाहाल, कारण मी पित्याकडे जात आहे’, असे जे तो म्हणाला त्याचा अर्थ काय?” 18ते विचारत होते, “‘थोडा वेळ’ असे जे हा म्हणतो ह्याचा अर्थ काय? तो काय म्हणतो, हे आम्हांला समजत नाही.”
19त्याला काही विचारावे असे त्यांच्या मनात आहे, हे ओळखून येशू त्यांना म्हणाला, “थोडा वेळ मी तुम्हांला दिसणार नाही आणि पुन्हा थोड्या वेळाने तुम्ही मला पाहाल, हे जे मी म्हणालो, त्याविषयी तुम्ही एकमेकांना विचारत आहात काय? 20मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, तुम्ही रडाल व शोक कराल परंतु जग आनंद करील; तुम्हांला दुःख होईल, परंतु तुमचे दुःख तुमचा आनंद होईल. 21स्त्री प्रसूत होत असताना तिला वेदना होतात कारण तिची प्रसूतीची घटका जवळ आलेली असते. परंतु बालक जन्मल्यावर, जगात एक मानव जन्मला आहे म्हणून तिला जो आनंद होतो, त्यामुळे तिला त्या वेदनांची आठवण होत नाही. 22ह्याप्रमाणे तुम्हांला आता दुःख झाले तरी मी तुम्हांला पुन्हा पाहीन आणि तुमचे अंतःकरण आनंदित होईल व तुमच्याकडून तुमचा आनंद कोणीही हिरावून घेणार नाही.
23त्या दिवशी तुम्ही माझ्याकडून काही मागणार नाही. मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, तुम्ही पित्याजवळ माझ्या नावाने काही मागाल तर तो ते तुम्हांला देईल. 24तुम्ही अजून माझ्या नावाने काही मागितले नाही. मागा म्हणजे तुम्हांला मिळेल, ह्यासाठी की, तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा.
25ह्या गोष्टी मी तुम्हांला अप्रत्यक्षपणे सांगितल्या आहेत. ह्यापुढे मी तुमच्याबरोबर अप्रत्यक्षपणे बोलणार नाही, तर तुम्हांला पित्याविषयी उघडपणे सांगण्याची घटका जवळ येत आहे. 26त्या दिवशी तुम्ही माझ्या नावाने मागाल आणि मी पित्याजवळ तुमच्यासाठी विनंती करीन, असे मी तुम्हांला म्हणत नाही. 27तुम्ही माझ्यावर प्रीती केली आहे आणि मी पित्याकडून आलो आहे, असा विश्वास तुम्ही बाळगला आहे म्हणून पिता स्वतः तुमच्यावर प्रीती करतो. 28मी पित्याकडून ह्या जगात आलो आहे व पुन्हा जग सोडून पित्याकडे जात आहे.”
29त्याचे शिष्य म्हणाले, “पाहा, आता आपण उघडपणे बोलता, अप्रत्यक्षपणे काही सांगत नाही. 30आता आम्हांला समजले आहे की, आपल्याला सर्व काही कळते आणि कोणी आपल्याला प्रश्न विचारावेत ह्याची गरज नाही, ह्यावरून आपण देवाकडून आला आहात, असा आम्ही विश्वास धरतो.”
31येशूने त्यांना उत्तर दिले, “आता तुम्ही विश्वास धरता काय? 32पाहा, अशी वेळ येत आहे, किंबहुना आलीच आहे की, तुमची दाणादाण होऊन तुम्ही सर्व आपापल्या घरी जाल व मला एकटे सोडाल. तरी मी एकटा नाही कारण पिता माझ्याबरोबर आहे. 33तुम्हांला माझ्या ठायी शांती मिळावी म्हणून मी तुम्हांला ह्या गोष्टी सांगितल्या आहेत. जगात तुम्हांला क्लेश होतील, तरी धीर धरा. मी जगावर विजय मिळवला आहे.”

Šiuo metu pasirinkta:

योहान 16: MACLBSI

Paryškinti

Dalintis

Kopijuoti

None

Norite, kad paryškinimai būtų įrašyti visuose jūsų įrenginiuose? Prisijunkite arba registruokitės