Kisary famantarana ny YouVersion
Kisary fikarohana

योहान 3

3
निकदेमाबरोबर संभाषण
1परूश्यांपैकी निकदेम नावाचा एक मनुष्य होता; तो यहूद्यांचा एक अधिकारी होता.
2तो रात्रीचा येशूकडे येऊन त्याला म्हणाला, “गुरूजी, आपण देवापासून आलेले शिक्षक आहात, हे आम्हांला ठाऊक आहे; कारण ही जी चिन्हे आपण करता ती देव बरोबर असल्यावाचून कोणालाही करता येत नाहीत.”
3येशू त्याला म्हणाला, “मी तुम्हांला खचीत सांगतो, नव्याने जन्मल्यावाचून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही.”
4निकदेम त्याला म्हणाला, “म्हातारा झालेला मनुष्य कसा जन्म घेऊ शकेल? त्याला मातेच्या उदरात दुसर्‍यांदा जाणे व जन्म घेणे शक्य होईल काय?”
5येशूने उत्तर दिले की, “मी तुम्हांला खचीत सांगतो, पाण्यापासून व आत्म्यापासून जन्म घेतल्यावाचून कोणीही देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही.
6देहापासून जन्मलेले देह आहेत आणि आत्म्यापासून जन्मलेले आत्मा आहेत.
7‘तुम्हांला नव्याने जन्मले पाहिजे’ असे मी तुम्हांला सांगितले म्हणून आश्‍चर्य मानू नका.
8वारा पाहिजे तिकडे वाहतो आणि त्याचा आवाज तुम्ही ऐकता, तरी तो कोठून येतो व कोठे जातो हे तुम्हांला कळत नाही; जो कोणी आत्म्यापासून जन्मलेला आहे त्याचे असेच आहे.”
9निकदेम त्याला म्हणाला, “ह्या गोष्टी कशा होऊ शकतील?”
10येशूने त्याला उत्तर दिले, “तुम्ही इस्राएलाचे गुरू असूनही तुम्हांला ह्या गोष्टी समजत नाहीत काय?
11मी तुम्हांला खचीत खचीत सांगतो की, जे आम्हांला ठाऊक आहे ते आम्ही सांगतो, आणि आम्ही पाहिले आहे त्याविषयी साक्ष देतो; पण तुम्ही आमची साक्ष मानत नाही.
12मी पृथ्वीवरील गोष्टी तुम्हांला सांगितल्या असता तुम्ही विश्वास धरत नाही तर स्वर्गातल्या गोष्टी तुम्हांला सांगितल्यास विश्वास कसा धराल?
13स्वर्गातून उतरलेला [व स्वर्गात असलेला] जो मनुष्याचा पुत्र त्याच्यावाचून कोणीही स्वर्गात चढून गेला नाही.
14जसा मोशेने अरण्यात सर्प उंच केला होता तसे मनुष्याच्या पुत्रालाही उंच केले पाहिजे;
15ह्यासाठी की, जो कोणी विश्वास ठेवतो त्याला त्याच्या ठायी सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.1
16देवाने जगावर एवढी प्रीती केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.
17देवाने आपल्या पुत्राला जगाचा न्यायनिवाडा करण्यासाठी नव्हे, तर त्याच्या द्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठवले.
18जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याच्यावर न्याय-निवाड्याचा प्रसंग येत नाही. जो विश्वास ठेवत नाही त्याचा न्यायनिवाडा होऊन चुकला आहे; कारण त्याने देवाच्या एकुलत्या एक पुत्राच्या नावावर विश्वास ठेवला नाही.
19निवाडा हाच आहे की, जगात प्रकाश आला आहे आणि मनुष्यांनी प्रकाशापेक्षा अंधाराची आवड धरली; कारण त्यांची कृत्ये दुष्ट होती.
20कारण जो कोणी वाईट कृत्ये करतो तो प्रकाशाचा द्वेष करतो आणि आपली कृत्ये उघडकीस येऊ नयेत म्हणून प्रकाशाकडे येत नाही.
21परंतु जो सत्य आचरतो तो प्रकाशाकडे येतो ह्यासाठी की, आपली कृत्ये देवाच्या ठायी केलेली आहेत हे उघड व्हावे.”
बाप्तिस्मा करणार्‍या योहानाची येशूविषयी आणखी साक्ष
22ह्यानंतर येशू आणि त्याचे शिष्य यहूदीया प्रांतात आले आणि तेथे त्यांच्याबरोबर राहून तो बाप्तिस्मा करत होता.
23योहानही शालिमाजवळचे एनोन येथे बाप्तिस्मा करत होता, कारण तेथे पाणी मुबलक होते आणि लोक येऊन बाप्तिस्मा घेत असत.
24कारण योहान तोपर्यंत कैदेत पडला नव्हता.
25मग योहानाच्या शिष्यांचा एका यहूद्याबरोबर शुद्धीकरणाविषयी वादविवाद झाला.
26ते योहानाकडे येऊन त्याला म्हणाले, “गुरूजी, पाहा, यार्देनेच्या पलीकडे जो आपल्याबरोबर होता, ज्याच्याविषयी आपण साक्ष दिली आहे तो बाप्तिस्मा करतो, आणि सर्व लोक त्याच्याकडेच जातात.”
27योहानाने उत्तर दिले, “मनुष्याला स्वर्गातून दिल्यावाचून काहीच मिळू शकत नाही.
28मी ख्रिस्त नव्हे तर त्याच्यापुढे पाठवलेला आहे असे मी म्हणालो होतो, ह्याविषयी तुम्हीच माझे साक्षी आहात.
29वधू ज्याची आहे तोच वर आहे आणि उभा राहून त्याचे बोलणे जो ऐकतो तो वराचा मित्र आहे, त्याला वराच्या वाणीने अत्यानंद होतो; तसा हा माझा आनंद पूर्ण झाला आहे.
30त्याची वृद्धी व्हावी व माझा र्‍हास व्हावा हे अवश्य आहे.”
31जो वरून येतो तो सर्वांच्या वर आहे; जो पृथ्वीपासून आला तो पृथ्वीचा आहे व ऐहिक गोष्टी बोलतो; जो स्वर्गातून येतो तो सर्वांच्या वर आहे.
32जे त्याने पाहिले आहे व ऐकले आहे त्याविषयी तो साक्ष देतो; आणि त्याची साक्ष कोणी मानत नाही.
33ज्याने त्याची साक्ष मान्य केली आहे त्याने देव सत्य आहे ह्या गोष्टीवर शिक्कामोर्तब केले आहे.
34कारण ज्याला देवाने पाठवले तो देवाची वचने बोलतो; कारण देव तो आत्मा मोजूनमापून देत नाही.
35पिता पुत्रावर प्रीती करतो आणि त्याने सर्वकाही त्याच्या हाती दिले आहे.
36जो पुत्रावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे; परंतु जो पुत्रावर विश्‍वास ठेवीत नाही त्याच्या दृष्टीस जीवन पडणार नाही; पण देवाचा क्रोध त्याच्यावर राहतो.

Voafantina amin'izao fotoana izao:

योहान 3: MARVBSI

Asongadina

Hizara

Dika mitovy

None

Tianao hovoatahiry amin'ireo fitaovana ampiasainao rehetra ve ireo nasongadina? Hisoratra na Hiditra