योहा. 3
3
निकदेमाबरोबर संभाषण
1परूश्यांपैकी निकदेम नावाचा एक मनुष्य होता, तो यहूद्यांचा एक अधिकारी होता. 2तो रात्रीचा त्याच्याकडे येऊन म्हणाला, “रब्बी, आपण देवाकडून आलेले शिक्षक आहात हे आम्ही जाणतो; कारण आपण जी चिन्हे करीत आहात ती कोणीही मनुष्य, त्याच्याबरोबर देव असल्याशिवाय करू शकणार नाही.” 3येशू त्यास म्हणाला, “मी तुम्हास खरे खरे सांगतो, पुन्हा जन्मल्यावांचून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही.” 4निकदेम त्यास म्हणाला, “म्हातारा झालेला मनुष्य कसा जन्म घेऊ शकेल? त्यास आपल्या आईच्या उदरात दुसऱ्यांदा जाणे व जन्म घेणे शक्य होईल काय?” 5येशूने त्यास उत्तर दिले, “मी तुम्हास खरे खरे सांगतो, पाण्यापासून व आत्म्यापासून जन्म घेतल्यावांचून कोणीही देवाच्या राज्यांत प्रवेश करू शकत नाही. 6देहापासून जन्मलेले देह आहे आणि आत्म्यापासून जन्मलेले आत्मा आहे. 7तुम्ही पुन्हा जन्मले पाहिजे, असे मी तुम्हास सांगितले याचे आश्चर्य मानू नका. 8वारा पाहिजे तिकडे वाहतो आणि त्याचा आवाज तुम्ही ऐकता, पण तो कोठून येतो आणि कोठे जातो हे तुम्हास कळत नाही. जो कोणी आत्म्यापासून जन्मलेला आहे त्याचे असेच आहे.” 9निकदेमाने त्यास उत्तर देऊन म्हटले, “या गोष्टी कशा होऊ शकतील?” 10येशूने त्यास उत्तर देऊन म्हटले, “तू इस्राएलाचे गुरू असूनही तुम्हास या गोष्टी समजत नाही काय? 11मी तुम्हास खरे खरे सांगतो, जे आम्हास ठाऊक आहे ते आम्ही सांगतो आणि आम्ही जे पाहिले आहे त्याची साक्ष देतो; पण तुम्ही आमची साक्ष मानत नाही. 12मी पृथ्वीवरच्या गोष्टी तुम्हास सांगितल्या असता तुम्ही विश्वास ठेवत नाही; मग, मी स्वर्गातील गोष्टी जर तुम्हास सांगितल्या तर तुम्ही कसा विश्वास ठेवाल? 13स्वर्गातून उतरलेला व स्वर्गात असलेला जो मनुष्याचा पुत्र त्याच्यावाचून कोणीही स्वर्गात चढून गेला नाही. 14जसा मोशेने अरण्यात पितळेचा सर्प उंच केला होता तसे मनुष्याच्या पुत्रालाही उंच केले पाहिजे, 15यासाठी की, जो कोणी विश्वास ठेवतो त्यास त्याच्याठायी सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.
16 कारण देवाने जगावर एवढी प्रीती केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला यासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्यास सार्वकालिक जीवन मिळावे. 17कारण देवाने पुत्राला जगात पाठवले ते जगाचा न्याय करायला नाही, पण त्याच्याद्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठवले. 18जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा न्याय होणार नाही, पण जो विश्वास ठेवत नाही त्याचा न्याय झालेलाच आहे; कारण, त्याने देवाच्या एकुलत्या एक पुत्राच्या नावावर विश्वास ठेवला नाही. 19आणि न्याय हाच आहे की, जगात प्रकाश आला आहे; पण मनुष्यांनी प्रकाशापेक्षा अंधाराची आवड धरली, कारण त्यांची कृत्ये वाईट होती; 20कारण जो कोणी वाईट कृत्ये करतो तो प्रकाशाचा द्वेष करतो आणि आपली कृत्ये उघडकीस येऊ नयेत म्हणून प्रकाशाकडे येत नाही. 21पण जो सत्य आचरतो तो प्रकाशाकडे येतो यासाठी की, आपली कृत्ये देवाच्या ठायी केलेली आहेत हे उघड व्हावे.”
22यानंतर येशू व त्याचे शिष्य यहूदियाच्या प्रांतात आले आणि तेथे त्यांच्याबरोबर राहून तो बाप्तिस्मा करत होता. 23आणि योहानदेखील शालिमाजवळ, एनोन येथे बाप्तिस्मा करीत होता; कारण तेथे पाणी पुष्कळ होते आणि लोक तेथे येऊन बाप्तिस्मा घेत असत. 24तोपर्यंत योहान तुरुंगात टाकला गेला नव्हता.
25मग योहानाच्या शिष्यांचा एका यहूद्याबरोबर शुद्धीकरणाविषयी वादविवाद झाला. 26ते योहानाकडे येऊन त्यास म्हणाले, “रब्बी, यार्देनेच्या पलीकडे जो आपल्याबरोबर होता आणि आपण ज्याच्याविषयी साक्ष दिली तो बाप्तिस्मा करीत आहे आणि त्याच्याकडे सगळे जात आहेत.” 27योहानाने उत्तर दिले, “मनुष्यास स्वर्गातून दिल्यावाचून काहीच मिळू शकत नाही. 28मी ख्रिस्त नाही, तर मी त्याच्यापुढे पाठविलेला आहे, याविषयी तुम्हीच माझे साक्षी आहात. 29ज्याला वधू आहे तो वर आणि जो वराचा मित्र उभा राहून त्याचे बोलणे ऐकतो, त्यास वराच्या वाणीने अत्यानंद होतो. तसा हा माझा आनंद पूर्ण झाला आहे. 30त्याची वृद्धी व्हावी व माझा ऱ्हास व्हावा हे अवश्य आहे.
31जो वरून येतो तो सर्वांच्या वर आहे. जो पृथ्वीवरचा आहे तो पृथ्वीचा आहे आणि पृथ्वीवरचे बोलतो. जो स्वर्गातून येतो तो सर्वांच्या वर आहे. 32जे त्याने पाहिले आहे व ऐकले आहे त्याविषयी तो साक्ष देतो आणि त्याची साक्ष कोणी मानत नाही. 33ज्याने त्याची साक्ष स्वीकारली आहे त्याने ‘देव खरा आहे’ यावर आपला शिक्का लावला आहे. 34कारण ज्याला देवाने पाठवले आहे तो देवाची वचने बोलतो कारण तो आत्मा मोजून मापून देत नाही. 35पिता पुत्रावर प्रीती करतो आणि त्याने सर्वकाही त्याच्या हाती दिले आहे. 36जो पुत्रावर विश्वास ठेवतो त्यास सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे; परंतु जो पुत्राचे ऐकत नाही त्याच्या दृष्टीस जीवन पडणार नाही, पण देवाचा क्रोध त्याच्यावर राहतो.”
Одоогоор Сонгогдсон:
योहा. 3: IRVMar
Тодруулга
Хуваалцах
Хувилах
Тодруулсан зүйлсээ бүх төхөөрөмждөө хадгалмаар байна уу? Бүртгүүлэх эсвэл нэвтэрнэ үү
MAR-IRV
Creative Commons License
Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.