निर्गम 4
4
1तेव्हा मोशेने उत्तर दिले, “पण ते माझा विश्वास धरणार नाहीत. माझे म्हणणे ऐकणार नाहीत; ते म्हणतील, परमेश्वराने तुला दर्शन दिलेच नाही.”
2तेव्हा परमेश्वर त्याला म्हणाला, “तुझ्या हातात ते काय आहे?” तो म्हणाला, “काठी आहे.”
3त्याने म्हटले, “ती जमिनीवर टाक.” ती त्याने टाकताच तिचा साप झाला; त्याला पाहून मोशे पळाला, 4परमेश्वराने मोशेला सांगितले, “आपला हात पुढे करून त्याचे शेपूट धर - त्याने हात पुढे करून ते धरले, तेव्हा त्या सापाची त्याच्या हातात काठी झाली;
5“ह्यावरून ते विश्वास धरतील की त्यांच्या पूर्वजांचा देव, अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव व याकोबाचा देव परमेश्वर ह्याचे तुला दर्शन झाले आहे.”
6परमेश्वराने त्याला आणखी सांगितले, “आता आपला हात छातीवर ठेव.” त्याने हात छातीवर ठेवून बाजूला काढला तेव्हा तो कोडाने बर्फासारखा पांढरा झाला.
7मग त्याने त्याला सांगितले, “पुन्हा आपला हात छातीवर ठेव ” तेव्हा त्याने पुन्हा छातीवर हात ठेवला, आणि छातीवरून बाजूला काढला तेव्हा पूर्ववत तो त्याच्या शरीराच्या इतर भागांसारखा झाला.
8“त्यांनी तुझा विश्वास धरला नाही व पहिल्या चिन्हाची सूचना मानली नाही तर ते ह्या दुसर्या चिन्हाची सूचना खरी मानतील.
9पण जर त्यांनी ह्या दोन्ही चिन्हांवर विश्वास ठेवला नाही, तुझे ऐकले नाही, तर तू नदीचे पाणी घेऊन कोरड्या जमिनीवर ओत, म्हणजे तू नदीतून घेतलेल्या पाण्याचे कोरड्या भूमीवर रक्त होईल.”
10तेव्हा मोशे परमेश्वराला म्हणाला, “हे प्रभू, मी बोलका नाही; पूर्वीही नव्हतो, व तू आपल्या दासाशी बोललास तेव्हापासूनही नाही; मी तर मुखाचा जड व जिभेचाही जड आहे.”
11तेव्हा परमेश्वर त्याला म्हणाला, “मनुष्याचे तोंड कोणी केले आहे? मनुष्याला मुका, बहिरा, डोळस किंवा आंधळा कोण करतो? मी परमेश्वरच की नाही?
12तर आता जा, मी तुझ्या मुखास साहाय्य होईन आणि तू काय बोलायचे ते तुला शिकवीन.”
13तेव्हा तो म्हणाला, “हे प्रभू, तुझ्या मर्जीस येईल त्याच्या हस्ते त्यांना संदेश पाठव.”
14मग मोशेवर परमेश्वराचा राग भडकला, तो त्याला म्हणाला, “लेवी अहरोन हा तुझा भाऊ नाही काय? त्याला चांगले बोलता येते हे मला ठाऊक आहे. पाहा, तो तुला भेटायला येत आहे; तुला पाहून त्याला मनात आनंद होईल.
15तू त्याच्याशी बोलून त्याच्या मुखात शब्द घाल; मी त्याच्या व तुझ्या मुखाला साहाय्य होईन, आणि तुम्ही काय करायचे ते तुम्हांला शिकवीन.
16तो तुझ्यातर्फे लोकांशी बोलेल; तो तुझे मुख होईल आणि तू त्याला देवाच्या ठिकाणी होशील.
17तू आपल्या हातात ही काठी घे; हिने तू चिन्हे करून दाखवशील.”
मोशे मिसर देशास परत येतो
18मग मोशे तेथून निघून आपला सासरा इथ्रो ह्याच्याकडे गेला व त्याला म्हणाला, “मला मिसरातल्या माझ्या भाऊबंदांकडे परत जाऊ द्या आणि ते अजून जिवंत आहेत किंवा नाहीत ते मला पाहू द्या.” तेव्हा इथ्रो मोशेला म्हणाला, “सुखाने जा.”
19मिद्यान देशात परमेश्वर मोशेला म्हणाला, “चल, मिसर देशात परत जा; कारण तुझा जीव घेऊ पाहणारे सगळे मृत्यू पावले आहेत.”
20मग मोशे आपली बायको व मुलगे ह्यांना गाढवावर बसवून मिसर देशास परत जायला निघाला. तो देवाची काठी आपल्या हातात घेऊन चालला.
21परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू मिसरास परत जाशील तेव्हा पाहा, ज्या अद्भुत कृती मी तुझ्या हाती ठेवल्या आहेत त्या सर्व फारोपुढे करून दाखव; तरी मी त्याचे मन कठीण करीन आणि तो माझ्या लोकांना जाऊ देणार नाही.
22तू जाऊन फारोला सांग, ‘परमेश्वर म्हणतो, इस्राएल हा माझा पुत्र, माझा ज्येष्ठ पुत्र आहे.
23मी तुला सांगितले की, “माझ्या पुत्राला माझी सेवा करण्यास जाऊ दे”; पण तू त्याला जाऊ देण्याचे नाकारले, तर पाहा, मी तुझा पुत्र, तुझा ज्येष्ठ पुत्र जिवे मारीन.”’
24मग मोशे प्रवास करीत असता उतारशाळेत असे झाले की परमेश्वराने त्याला गाठून जिवे मारायला पाहिले.
25तेव्हा सिप्पोरा हिने एक धारेची गारगोटी घेऊन आपल्या मुलाची अग्रत्वचा कापली आणि ती मोशेच्या पायांजवळ ठेवून ती म्हणाली, “तू रक्ताने मिळवलेला माझा नवरा आहेस.”
26तेव्हा परमेश्वराने मोशेला पिडण्याचे सोडले. रक्ताने मिळवलेला नवरा असे तिने सुंतेला अनुलक्षून म्हटले.
27मग परमेश्वर अहरोनाला म्हणाला, “मोशेला भेटण्यास तू रानात जा.” तो गेला आणि देवाच्या डोंगरावर त्याला भेटून त्याने त्याचे चुंबन घेतले.
28मग परमेश्वराने त्याला जे काही सांगून पाठवले व जी चिन्हे करून दाखवण्याची आज्ञा केली ती सर्व मोशेने अहरोनाला सांगितली.
29नंतर मोशे व अहरोन ह्यांनी जाऊन इस्राएलवंशाचे सर्व वडील जन जमवले;
30आणि परमेश्वराने मोशेला जे काही सांगितले होते ते सर्व अहरोनाने लोकांना कळवले आणि त्यांना चिन्हे करून दाखवली.
31तेव्हा लोकांना विश्वास वाटला; परमेश्वराने इस्राएलवंशजांची भेट घेऊन त्यांची विपत्ती पाहिली हे त्यांनी ऐकले तेव्हा त्यांनी नमन करून त्याची आराधना केली.
सध्या निवडलेले:
निर्गम 4: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.