ईयोब 27
27
दुष्टाला मिळणार्या प्रतिफळाचे ईयोब वर्णन करतो
1ईयोब आपला वाद पुढे चालवून म्हणाला,
2“ज्या देवाने मला न्यायास मुकवले, ज्या सर्वसमर्थाने माझ्या जिवास क्लेश दिला, त्याच्या जीविताची शपथ;
3(अद्यापि माझा श्वासोच्छ्वास बरोबर चालत आहे, देवाने घातलेला श्वास माझ्या नाकपुड्यांत आहे;)
4माझे तोंड कुटिल भाषण करीत नाही; माझी जिव्हा कपटाचे बोल बोलत नाही.
5तुमचा वाद खरा आहे असे मी कदापि मान्य करणार नाही; माझा प्राण जाईतोवर मी आपले सत्त्वसमर्थन सोडणार नाही.
6मी नीतिमान आहे हे माझे म्हणणे मी धरून राहणार; ते मी सोडणार नाही; माझ्या आयुष्यातील कोणत्याही दिवसाविषयी माझे मन मला खात नाही;3
7माझा शत्रू दुष्टासमान, माझा विरोधी अनीतिमानासमान ठरो.
8देव अनीतिमानाचा उच्छेद करून प्राण हरण करील, तेव्हा त्याची काय आशा राहणार?
9त्याच्यावर संकट येईल, तेव्हा त्याची आरोळी देव ऐकेल काय?
10तो सर्वसमर्थाच्या ठायी आनंद पावेल काय? तो सर्व प्रसंगी देवाचा धावा करील काय?
11देवाच्या करणीविषयी मी तुम्हांला बोध करीन; सर्वसमर्थाचे रहस्य मी छपवून ठेवणार नाही.
12पाहा, तुम्ही सर्व हे पाहून चुकला आहात; तर तुम्ही अशा पोकळ गोष्टी का बोलून दाखवता?
13दुष्ट मनुष्याला देवाकडून मिळणारा वाटा हाच; जुलम्याला सर्वसमर्थाकडून वतन मिळते ते हेच;
14त्याची संतती वाढली तर ती तलवारीला बळी पडायची; त्याच्या संतानास पोटभर भाकर मिळणार नाही.
15त्याच्या मागे राहिलेले मरीच्या तडाख्याने मातीआड होतील; त्याच्या विधवा विलाप करणार नाहीत.
16त्याने रुप्याचा संचय धुळीसारखा केला, वस्त्रे चिखलासारखी विपुल केली;
17तरी तो वस्त्रे करील ती नीतिमान अंगावर घालील. निर्दोषी त्याचे रुपे वाटून घेईल.
18तो आपले घर कोळ्याच्या जाळ्यासारखे बांधतो; ते जागल्याने बांधलेल्या खोपटीसारखे असते.
19तो संपन्न स्थितीत अंग टाकतो, पण त्याला पुरण्यात येणार नाही. तो डोळे उघडतो आणि तो आटोपेल
20घोर संकटे पुराप्रमाणे त्याच्यावर गुदरतात; रात्रीच्या समयी तुफान त्याला उडवून नेते.
21पूर्वेचा वारा त्याला उडवून नेतो. आणि तो नाहीसा होतो. त्याचा सपाटा त्याला त्याच्या स्थानावरून काढून टाकतो.
22कारण देव त्याच्यावर मारा करील. त्याची गय करणार नाही; तो त्याच्या हातून निसटून जाण्यास पाहील.
23लोक टाळ्या पिटून त्याची छीथू करतील, त्याच्या स्थानातून त्याला हुसकून लावतील.”
सध्या निवडलेले:
ईयोब 27: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.