YouVersion लोगो
सर्च आयकॉन

ईयोब 28

28
मानवाचा ज्ञानासाठी शोध
1“खरोखर रुप्याची खाण असते; लोक जे सोने शुद्ध करतात त्याचेही ठिकाण असते.
2लोखंड मातीतून काढतात, पाषाण वितळवून तांबे काढतात.
3मनुष्य अंधकाराचे निवारण करतो, अगदी शेवटापर्यंत जाऊन निबिड अंधकारातील व मृत्युच्छायेतील पाषाणांचा तो शोध करीत असतो.
4तो लोकवस्तीपासून दूर खाण खणतो; तेथे जमिनीवर चालणार्‍यांच्या गावीही नसता त्याच्यापासून दूर खाली ते लटकत व लोंबकळत असतात.
5ही पृथ्वी पाहा; हिच्यापासून भाकर मिळते; पण खाली पाहावे तर अग्नीने जशी काय तिची उलटापालट होते.
6तिच्यातले पाषाण म्हणजे नीलमण्यांचे घर होत; तिच्यात सोन्याची मातीही असते.
7ती वाट कोणा हिंस्र पक्ष्यास ठाऊक नाही; कोणा घारीचीही दृष्टी तिच्यावर गेली नाही.
8तिच्यावर कोणा उन्मत्त पशूने पाय ठेवला नाही; तिच्यावरून उग्र सिंह कधी चालला नाही.
9मनुष्य गारेच्या पाषाणाला हात घालतो; तो पर्वत समूळ उलथून टाकतो;
10तो खडकांतून भुयारे खोदून काढतो; सर्व प्रकारच्या मोलवान वस्तू त्याच्या नजरेस पडतात.
11झरे बंद करून त्यांचे पाणी तो बाहेर झिरपू देत नाही, गुप्त आहे ते तो उजेडात आणतो.
12तरीपण ज्ञान कोठून मिळेल? बुद्धीचे स्थान कोणते?
13त्याचे मोल मानवाला कळत नाही; ते जिवंताच्या भूमीत सापडत नाही.
14अगाध जलाशय म्हणतो, ‘ते माझ्या ठायी नाही;’ समुद्रही म्हणतो, ‘ते माझ्याजवळ नाही.’
15उत्कृष्ट सुवर्ण देऊन ते मिळत नाही; चांदी तोलून देऊन त्याचे मोल होत नाही.
16ओफीरचे सोने, गोमेद व नीलमणी ही भारंभार देऊनही त्याचे मोल होत नाही.
17सोने व काचमणी ही त्याच्या बरोबरीची नाहीत; उंची सोन्याच्या नगांनी त्याचा मोबदला होत नाही.
18प्रवाळ व स्फटिक ह्यांची काय कथा? ज्ञानाचे मोल मोत्यांहून अधिक आहे.
19कूश देशाचा पुष्कराज त्याच्या तोडीचा नाही; बावनकशी सोने त्याच्याशी तुल्य नाही.
20तर मग ज्ञान कोठून येते? बुद्धीचे स्थान कोणते?
21ते सर्व जिवंतांच्या नेत्रांना अगोचर आहे; आकाशातील पक्ष्यांना ते गुप्त आहे.
22विनाशस्थान1 व मृत्यू म्हणतात, आमच्या कानी त्याची केवळ वार्ता आली आहे.
23देवच त्याचा मार्ग जाणतो; त्याचे स्थान त्यालाच ठाऊक आहे.
24कारण त्याची दृष्टी पृथ्वीच्या दिगंतांना पोचते; तो आकाशमंडळाखालचे सर्वकाही पाहतो.
25त्याने वायूचे वजन ठरवले व जल मापून दिले;
26त्याने पर्जन्यास नियम लावून दिला; गर्जणार्‍या विद्युल्लतेस मार्ग नेमून दिला;
27तेव्हा त्याने ज्ञान पाहून त्याचे वर्णन केले; त्याने ते स्थापित केले व त्याचे रहस्य जाणले.
28तो मानवाला म्हणाला, ‘पाहा, प्रभूचे भय धरणे हेच ज्ञान होय; दुष्टतेपासून दूर राहणे हेच सुज्ञान होय.”’

सध्या निवडलेले:

ईयोब 28: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन