ईयोब 9
9
देवापुढे ईयोब निरुत्तर होतो
1तेव्हा ईयोब म्हणाला,
2“खरोखर हे असेच आहे हे मला ठाऊक आहे; पण मानव देवापुढे कसा नीतिमान ठरेल?
3तो देवाशी वाद करू लागला तर हजार गोष्टींतल्या एकीचेही उत्तर त्याला देता येणार नाही.
4तो मनाने सुज्ञ व सामर्थ्याने प्रबल आहे; त्याच्याशी विरोध करून कोण टिकला आहे?
5तो पर्वतांना नकळत अचानक हटवतो, तो आपल्या क्रोधाने त्यांना उलथून टाकतो.
6तो पृथ्वीस कापवून तिला स्थानभ्रष्ट करतो, तिचे आधारस्तंभ थरारतात.
7त्याची आज्ञा झाली असता सूर्य उगवत नाही; तो तार्यांना मोहोरबंद करतो,
8तोच आकाशमंडळ विस्तारतो, तो समुद्राच्या पर्वतप्राय लहरींवरून चालतो.
9त्यानेच सप्तऋषी, मृगशीर्ष, कृत्तिका व दक्षिणेकडील नक्षत्रमंडळे उत्पन्न केली.
10तो अतर्क्य महत्कृत्ये, अगणित अद्भुत कृत्ये करतो.
11पाहा, तो माझ्याजवळून जातो तरी मला दिसत नाही; तो निघून जातो तरी माझ्या दृष्टीस पडत नाही.
12तो हिसकावून घेऊ लागला तर त्याचा हात कोण धरील? ‘तू हे काय करतोस,’ असे त्याला कोण म्हणणार?
13देव आपला क्रोध आवरत नाही; राहाबाचे1 सहकारी त्याच्यापुढे दबून जातात.
14तर मी त्याला उत्तर द्यावे; आणि शब्दांची योग्य निवड करून त्याच्याशी वाद करावा, असा मी कोण आहे?
15मी निर्दोष असलो तरी त्याला मी उत्तर देणार नाही. त्या माझ्या प्रतिवाद्याची मी विनवणी करतो.
16मी धावा केला असता तर त्याने उत्तर दिले असते; तरी त्याने माझे ऐकलेच अशी माझी खातरी झाली नसती.
17कारण तो वादळाने माझा चुराडा करतो, विनाकारण मला घायावर घाय करतो.
18तो मला श्वासही घेऊ देत नाही, तो मला क्लेशाने व्यापून टाकतो.
19बलवान कोण? असा प्रश्न निघाल्यास तो म्हणतो, मी आहे. न्यायाचा प्रश्न निघाल्यास तो म्हणतो, मला न्यायसभेपुढे कोण आणील?
20मी निरपराध असलो तरी माझे तोंड मला अपराधीच ठरवील; मी निर्दोष असलो तरी तो मला दोषीच ठरवील.
21मी निर्दोष आहे तरी माझे मला काही कळत नाही; माझा जीव मला नकोसा झाला आहे.
22हे कसेही असो, एकूण एकच; म्हणून मी म्हणतो, देव निर्दोष्याचा तसाच दुष्टाचाही नाश करतो.
23अकस्मात अरिष्ट येऊन संहार होत असता ते निर्दोष्याच्या संकटाला हसते.
24पृथ्वी दुष्टाच्या हाती दिली आहे, देव तिच्या शास्त्यांची मुखे झाकतो; ही त्याची करणी नव्हे तर दुसर्या कोणाची?
25माझे दिवस जासुदाहून त्वरित जात आहेत; ते पळत आहेत, त्यांत काही कल्याण दिसत नाही.
26ते वेगवान तारवांसारखे,2 आपल्या भक्ष्यावर झडप घालणार्या गरुडासारखे निघून जात आहेत.
27विलाप करण्याचे मी विसरावे, मुखाची खिन्नता सोडून उल्लसित दिसावे, असे मी मनात आणले;
28तरी माझ्या ह्या सर्व दु:खांनी मी घाबरून जातो. तू मला निर्दोषी ठरवणार नाहीस हे मला ठाऊक आहे.
29मी दोषी ठरणारच; तर मग मी हा व्यर्थ खटाटोप का करू?
30माझे अंग बर्फाने धुतले, माझे हात खाराने स्वच्छ केले,
31तरी तू मला खाड्यात टाकशील, माझी वस्त्रेदेखील माझा धिक्कार करतील.
32मी त्याच्याशी वाद करावा, आम्ही एकमेकांत लढा माजवावा, असा तो माझ्यासारखा मानव नाही.
33आम्हा दोघांवर हात ठेवील, असा कोणी मध्यस्थ आम्हा उभयतांमध्ये नाही.
34तो माझ्यावरला सोटा दूर करो. त्याचा धाक मला घाबरे न करो.
35म्हणजे मी त्याच्याशी बोलेन, त्याला भिणार नाही, कारण मी आपणास तसा समजत नाही.”
सध्या निवडलेले:
ईयोब 9: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.