YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लेवीय 21

21
याजकांचे पावित्र्य
1परमेश्वर मोशेला म्हणाला, “अहरोनाचे मुलगे जे याजक, त्यांना असे सांग की, तुमच्या कुळातील कोणी मृत झाले तर तुमच्यापैकी कोणीही त्याचे सुतक धरू नये;
2आपले जवळचे आप्त म्हणजे आपली आई, बाप, मुलगा, मुलगी, भाऊ,
3आणि आपल्या जवळ असलेली अविवाहित बहीण ह्यांचे मात्र सुतक धरावे.
4तो आपल्या लोकांमध्ये प्रमुख असल्यामुळे त्याने सुतक धरून स्वतःला अपवित्र करू नये.
5त्यांनी आपल्या डोक्याचे मुंडण करू नये; आपल्या दाढीचे कोपरे छाटू नयेत, किंवा आपल्या शरीरावर घाव करू नयेत.
6त्यांनी आपल्या देवाप्रीत्यर्थ पवित्र राहावे आणि आपल्या देवाच्या नावाला कलंक लावू नये; ते परमेश्वराप्रीत्यर्थ हव्य म्हणजे आपल्या देवाप्रीत्यर्थ अन्न अर्पण करीत असतात; म्हणून त्यांनी पवित्र राहावे.
7त्यांनी वेश्येला किंवा भ्रष्ट झालेल्या स्त्रीला आपली बायको करून घेऊ नये, आणि नवर्‍याने टाकलेल्या स्त्रीशी लग्न करू नये, कारण याजक आपल्या देवाप्रीत्यर्थ पवित्र आहे.
8तू त्याला पवित्र मानावे कारण तो तुझ्या देवासाठी अन्न अर्पण करतो; त्याला तू पवित्र लेखावे, कारण तुम्हांला पवित्र करणारा मी परमेश्वर पवित्र आहे.
9एखाद्या याजकाची मुलगी वेश्याकर्म करून भ्रष्ट झाली तर तिने आपल्या बापालाही भ्रष्ट केले असे होईल; तिला अग्नीत जाळून टाकावे.
10आपल्या भावांमध्ये जो मुख्य याजक आहे, ज्याच्या मस्तकाला अभिषेकाच्या तेलाचा अभ्यंग झाला आहे आणि पवित्र वस्त्रे परिधान करण्यासाठी ज्याच्यावर संस्कार झाला आहे, त्याने आपल्या डोक्याचे केस सोडू नयेत व आपली वस्त्रे फाडू नयेत;
11त्याने कोणाच्या शवाजवळ जाऊ नये; आपल्या बापाचे किंवा आईचे सुतक धरू नये;
12त्याने पवित्रस्थानाबाहेर जाऊ नये; आपल्या देवाचे पवित्रस्थान भ्रष्ट करू नये, कारण त्याच्या देवाच्या तैलाभिषेकाने त्याच्यावर संस्कार झाला आहे; मी परमेश्वर आहे.
13त्याने कुमारिकेशीच विवाह करावा.
14विधवा, टाकलेली स्त्री, भ्रष्ट झालेली स्त्री अथवा वेश्या ह्यांच्यापैकी कोणालाही त्याने बायको करून घेऊ नये, तर त्याने आपल्या स्वजनातील एखाद्या कुमारिकेशीच विवाह करावा.
15त्याने स्वजनांमध्ये आपली संतती भ्रष्ट होऊ देऊ नये, कारण त्याला पवित्र करणारा मी परमेश्वर आहे.”
16परमेश्वर मोशेला म्हणाला,
17“अहरोनाला असे सांग की, पुढील पिढ्यांमध्ये तुझ्या वंशात जर कोणाला काही व्यंग निघाले तर त्याने आपल्या देवाप्रीत्यर्थ अन्न अर्पण करण्यासाठी जवळ येऊ नये.
18त्याला कोणतेही व्यंग असले तरी त्याने जवळ येऊ नये; मग तो आंधळा असो, लंगडा असो, बसक्या नाकाचा असो, एखादा अवयव अधिक लांब असलेला असो,
19मोडक्या पायाचा असो अथवा थोटा असो,
20कुबडा असो, खुजा असो, नेत्रदोषी असो, किंवा चाई, खरूज झालेला असो अथवा भग्नांड असो;
21अहरोन याजकाच्या वंशापैकी कोणात असे एखादे व्यंग असले तर त्याने परमेश्वराला हव्य अर्पण करण्यासाठी जवळ येऊ नये; त्याच्यात व्यंग आहे; त्याने आपल्या देवाला अन्न अर्पण करण्यासाठी जवळ येऊ नये.
22त्याने आपल्या देवाचे अन्न म्हणजे परमपवित्र-स्थानातील अन्न व पवित्र पदार्थ खावेत;
23पण त्याला व्यंग असल्यामुळे त्याने अंतरपटाच्या आत आणि वेदीजवळ जाऊ नये व माझी पवित्रस्थाने भ्रष्ट करू नयेत, कारण त्यांना पावन करणारा मी परमेश्वर आहे.”
24मोशेने अहरोन, त्याचे मुलगे व सगळे इस्राएल लोक ह्यांना हे सांगितले.

सध्या निवडलेले:

लेवीय 21: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन