YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लेवीय 22

22
अर्पणांचे पावित्र्य
1परमेश्वर मोशेला म्हणाला, 2“अहरोन व त्याचे मुलगे ह्यांना सांग की, इस्राएल लोक ज्या पवित्र वस्तू मला समर्पण करतात त्यांच्यापासून त्यांनी दूर राहावे आणि माझ्या पवित्र नावाला कलंक लावू नये; मी परमेश्वर आहे.
3तू त्यांना सांग, पुढील पिढ्यांमध्ये तुमच्या सर्व वंशांतील जो कोणी अशुद्ध असताना इस्राएल लोकांनी परमेश्वराला समर्पित केलेल्या पवित्र वस्तूंना हात लावील त्याचा माझ्यासमोरून उच्छेद व्हावा; मी परमेश्वर आहे.
4अहरोनाच्या वंशापैकी कोणी महारोगी अथवा स्राव होणारा असला तर त्याने शुद्ध होईपर्यंत पवित्र केलेले पदार्थ खाऊ नयेत. मृतामुळे अशुद्ध झालेल्या मनुष्याला किंवा वीर्यपात झालेल्या पुरुषाला जो कोणी स्पर्श करील, 5ज्याच्या स्पर्शाने लोक अशुद्ध होतात अशा रांगणार्‍या प्राण्याला अथवा ज्याच्या स्पर्शाने कोणत्याही प्रकारची अशुद्धता लागेल अशा मनुष्याला जो कोणी स्पर्श करील, 6म्हणजे जो मनुष्य ह्यांच्यापैकी कोणालाही स्पर्श करील त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे व पाण्याने स्नान करीपर्यंत पवित्र पदार्थ खाऊ नयेत.
7सूर्यास्त झाल्यावर तो शुद्ध ठरेल, त्यानंतर त्याने पवित्र पदार्थ खावेत, कारण ते त्याचे अन्न होय.
8मेलेले अथवा श्वापदांनी फाडलेले असे काही खाऊन त्याच्यामुळे अशुद्ध होऊ नये; मी परमेश्वर आहे.
9माझी आज्ञा त्यांनी पाळावी, नाहीतर त्या पापाबद्दल त्यांना शिक्षा भोगावी लागेल आणि आज्ञाभंग केल्यामुळे ते मरतील; त्यांना पवित्र करणारा मी परमेश्वर आहे.
10कोणा परक्याने पवित्र पदार्थ खाऊ नयेत; याजकाचा पाहुणा किंवा मजूर ह्यानेही पवित्र पदार्थ खाऊ नयेत.
11पण याजकाने मोल देऊन कोणी मनुष्य विकत घेतला असेल तर त्याने तो खावा. तसेच याजकाच्या घरी जन्मले असतील त्यांनीही त्यांतले पदार्थ खावेत.
12याजकाची मुलगी कोणा परक्याला दिली असेल तर समर्पण केलेले पवित्र पदार्थ तिने खाऊ नयेत.
13याजकाची मुलगी विधवा असली अथवा नवर्‍याने टाकलेली असली, आणि ती विनापत्य असून तरुणपणी होती तशीच आपल्या बापाच्या घरी परत येऊन राहत असली तर तिने आपल्या बापाचे अन्न खावे; पण कोणा परक्याने ते खाऊ नये.
14एखाद्या मनुष्याने चुकून पवित्र पदार्थ खाल्ला तर त्याने त्या पदार्थाच्या पाचव्या हिश्शाइतकी भर त्यात घालून याजकाला तो पवित्र पदार्थ द्यावा.
15ज्या पवित्र वस्तू इस्राएल लोक परमेश्वराला अर्पण करतात त्या याजकांनी भ्रष्ट करू देऊ नयेत;
16पवित्र पदार्थ खाल्ल्याच्या अपराधाबद्दल त्यांना दोषार्पण करावे लागेल; त्याला याजकांनी कारणीभूत होऊ नये; कारण त्यांना पवित्र करणारा मी परमेश्वर आहे.”
17परमेश्वर मोशेला म्हणाला,
18“अहरोन, त्याचे मुलगे व सर्व इस्राएल लोक ह्यांना सांग की, तुम्हा इस्राएल लोकांपैकी अथवा तुमच्यामध्ये राहणार्‍या उपर्‍या लोकांपैकी कोणी आपल्या नवसाच्या अथवा स्वखुशीच्या यज्ञबलीचा परमेश्वराप्रीत्यर्थ होम करील,
19तर तुमचा स्वीकार करण्यात यावा म्हणून गुरे, मेंढरे अथवा बकर्‍या ह्यांतील दोषहीन नर अर्पण करावा.
20सदोष असलेला कोणताही प्राणी अर्पू नये; कारण तो तुमच्याप्रीत्यर्थ स्वीकारला जाणार नाही.
21आपला नवस पुरा करण्यासाठी अथवा खुशीच्या अर्पणासाठी कोणी परमेश्वराप्रीत्यर्थ गुराढोरांतून किंवा शेरडामेंढरातून शांत्यर्पण करील तर ते मान्य होण्यासाठी दोषहीन असावे; त्यात काही दोष नसावा.
22आंधळा, तुटलेल्या अवयवाचा, लुळा अथवा अंगावर मस, चाई अथवा खरूज असलेला असा कोणताही प्राणी परमेश्वराला अर्पू नये किंवा वेदीवर हव्य म्हणून परमेश्वराप्रीत्यर्थ त्याचा होम करू नये.
23बैल किंवा मेंढरू ह्याचा एखादा अवयव कमीजास्त असला तर तो स्वखुशीच्या अर्पणाला चालेल, पण नवस फेडण्याच्या कामी त्याचा स्वीकार होणार नाही.
24ज्याचे अंड ठेचलेले, चिरडलेले, फाटलेले, अथवा कापलेले असतील असा प्राणी परमेश्वराला अर्पण करू नये; तू आपल्या देशात असला काही प्रकार करू नयेस.
25ह्यांतील कोणतेही प्राणी परक्याच्या हातून घेऊन तुम्ही आपल्या देवासाठी अन्न म्हणून अर्पण करू नयेत; कारण ते सव्यंग व सदोष आहेत, म्हणून ते तुमच्याप्रीत्यर्थ स्वीकारले जाणार नाहीत.”
26परमेश्वर मोशेला म्हणाला,
27“वासरू, कोकरू अथवा करडू जन्मल्यावर ते सात दिवस आपल्या आईजवळ असले पाहिजे; आठव्या दिवसापासून पुढे ते परमेश्वराला हव्य म्हणून अर्पण करण्यासाठी स्वीकारण्यास योग्य ठरेल.
28गाईचा अथवा मेंढीचा व तिच्या वत्साचा एकाच दिवशी वध करू नये.
29तुम्ही परमेश्वराप्रीत्यर्थ उपकारस्तुतीच्या बलीचा यज्ञ कराल, तेव्हा तुमचा स्वीकार होईल अशा प्रकारे तो करा.
30त्याच दिवशी तो खाण्यात यावा; त्यातील काही सकाळपर्यंत शिल्लक ठेवू नये; मी परमेश्वर आहे
31तुम्ही माझ्या आज्ञा मान्य करून त्या पाळाव्यात; मी परमेश्वर आहे.
32माझ्या पवित्र नावाला तुम्ही कलंक लावू नये; पण इस्राएल लोकांमध्ये मला पवित्र मानण्यात येईल; तुम्हांला पवित्र करणारा मी परमेश्वर आहे.
33तुमचा देव व्हावे म्हणून मी तुम्हांला मिसर देशातून बाहेर आणले; मी परमेश्वर आहे.”

सध्या निवडलेले:

लेवीय 22: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन