YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लेवीय 4

4
पापार्पणे
1मग परमेश्वर मोशेला म्हणाला, 2“इस्राएल लोकांना असे सांग : परमेश्वराने निषिद्ध ठरवलेल्या कृत्यांपैकी एखादे कृत्य चुकून केल्याने कोणाकडून पाप घडले,
3म्हणजे लोकांवर दोष येईल अशा प्रकारचे पाप जर अभिषिक्त याजकाने केले तर त्याने आपल्या पातकाबद्दल पापबली म्हणून एक दोषहीन गोर्‍हा परमेश्वराला अर्पावा.
4तो गोर्‍हा परमेश्वरासमोर दर्शनमंडपाच्या दाराजवळ त्याने आणावा व त्याच्या डोक्यावर आपला हात ठेवावा आणि परमेश्वरासमोर त्याचा वध करावा.
5अभिषिक्त याजकाने गोर्‍ह्याचे थोडे रक्त घ्यावे व ते दर्शनमंडपात न्यावे;
6याजकाने आपले बोट त्या रक्तात बुडवावे आणि परमेश्वरासमोर, पवित्रस्थानाच्या अंतरपटासमोर ते सात वेळा शिंपडावे.
7आणि याजकाने त्यातले थोडे रक्त घेऊन दर्शनमंडपात परमेश्वरासमोर असलेल्या धूपवेदीच्या शिंगांना लावावे; मग त्या गोर्‍ह्याचे बाकीचे सगळे रक्त दर्शनमंडपाच्या दारापुढे असलेल्या होमवेदीच्या पायथ्यावर ओतावे.
8नंतर पापार्पणाच्या गोर्‍ह्याची सर्व चरबी काढावी म्हणजे आतड्यांवर असलेली चरबी, त्यांना लागून असलेली सर्व चरबी, 9दोन्ही गुरदे, त्यांच्यावरची कंबरेजवळची चरबी व गुरद्यांपर्यंतचा काळजावरील पडदा ही वेगळी काढून घ्यावीत;
10शांत्यर्पणाच्या यज्ञात जसे बैलाचे हे भाग काढून घेतात, तसे ते वेगळे काढून घ्यावेत व याजकाने त्यांचा होमवेदीवर होम करावा.
11गोर्‍ह्याचे कातडे, सर्व मांस, डोके, पाय, आतडी, शेण,
12असा सगळा गोर्‍हा त्याने छावणीबाहेर जेथे राख टाकतात तेथे एका स्वच्छ ठिकाणी न्यावा आणि तो लाकडांवर ठेवून विस्तवात जाळून टाकावा. राख टाकीत असतात तेथे तो जाळून टाकावा.
13इस्राएलाच्या सर्व मंडळीकडून चुकून काही पाप घडले आणि ते जनसभेच्या लक्षात आले नाही, म्हणजे परमेश्वराने निषिद्ध ठरवलेले एखादे कृत्य केल्याने ते दोषी ठरले,
14आणि मग त्यांनी केलेले पाप कळून आले, तर जनसभेने गोर्‍ह्याचा पापबली अर्पावा आणि तो दर्शनमंडपासमोर आणावा.
15मंडळीच्या वडिलांनी परमेश्वरासमोर त्या गोर्‍ह्याच्या डोक्यावर आपले हात ठेवावेत आणि त्याचा परमेश्वरासमोर वध करावा.
16अभिषिक्त याजकाने त्या गोर्‍ह्याचे थोडे रक्त घ्यावे व दर्शनमंडपात न्यावे.
17याजकाने त्या रक्तात आपले बोट बुडवावे आणि परमेश्वरासमोर, अंतरपटासमोर, ते सात वेळा शिंपडावे.
18मग दर्शनमंडपात परमेश्वरासमोर असलेल्या वेदीच्या शिंगांना थोडे रक्त लावावे; आणि बाकीचे सर्व रक्त घेऊन दर्शनमंडपाच्या दारापुढे असलेल्या होमवेदीच्या पायथ्यावर ओतावे.
19त्या गोर्‍ह्याची सर्व चरबी काढून वेदीवर तिचा होम करावा.
20पापार्पणाच्या गोर्‍ह्याचे जसे करायचे तसेच ह्याचेही करावे; ह्या प्रकारे याजकाने इस्राएल लोकांसाठी प्रायश्‍चित्त करावे म्हणजे त्यांची क्षमा होईल.
21पहिला गोर्‍हा जाळून टाकायचा तसाच हाही गोर्‍हा छावणीच्या बाहेर नेऊन जाळून टाकावा. हे मंडळीसाठी पापार्पण होय.
22आपला देव परमेश्वर ह्याने निषिद्ध ठरवलेले कोणतेही कृत्य चुकून केल्यामुळे पाप घडून एखादा अधिपती दोषी ठरला,
23आणि त्याने केलेले पाप त्याला कळून आले, तर त्याने एक दोषहीन बकरा बली देण्यासाठी आणावा;
24त्याने त्या बकर्‍याच्या डोक्यावर आपला हात ठेवावा आणि परमेश्वरासमोर जेथे यज्ञपशूचा वध करतात तेथे त्याचा वध करावा. हे पापार्पण होय.
25मग याजकाने आपल्या बोटाने त्या पापार्पणाचे थोडे रक्त घेऊन होमवेदीच्या शिंगांना लावावे आणि बाकीचे रक्त होमवेदीच्या पायथ्यावर ओतावे.
26शांत्यर्पणाच्या यज्ञपशूंच्या चरबीप्रमाणे ह्याच्याही सर्व चरबीचा वेदीवर होम करावा; ह्या प्रकारे त्याच्या पापाबद्दल याजकाने प्रायश्‍चित्त करावे म्हणजे त्याची क्षमा होईल.
27परमेश्वराने निषिद्ध ठरवलेले एखादे कृत्य चुकून केल्यामुळे पाप घडून सामान्य लोकांपैकी कोणी दोषी ठरला,
28आणि त्याने केलेले पाप त्याला कळून आले, तर त्याने त्या पापाबद्दल अर्पण करण्यासाठी एक दोषहीन बकरी आणावी.
29त्याने त्या पापबलीच्या डोक्यावर आपला हात ठेवावा आणि होमबलीचा वध करतात त्या ठिकाणी त्याचा वध करावा.
30मग याजकाने त्याचे थोडे रक्त बोटाने घेऊन ते होमवेदीच्या शिंगांना लावावे व बाकीचे सर्व रक्त होमवेदीच्या पायथ्यावर ओतावे.
31आणि शांत्यर्पणाच्या यज्ञपशूच्या चरबीप्रमाणे ह्याचीही सर्व चरबी वेगळी काढून घ्यावी व ती परमेश्वराप्रीत्यर्थ सुवासिक हव्य म्हणून याजकाने तिचा वेदीवर होम करावा; याजकाने त्याच्यासाठी प्रायश्‍चित्त करावे म्हणजे त्याची क्षमा होईल.
32त्याने आपल्या अर्पणासाठी पापबली म्हणून कोकरू आणले तर ती दोषहीन मादी असावी.
33त्याने पापबलीच्या डोक्यावर आपला हात ठेवावा व जेथे होमबलीचा वध करतात तेथे पापार्पणासाठी त्याचा वध करावा.
34याजकाने आपल्या बोटाने पापबलीचे थोडे रक्त घेऊन होमवेदीच्या शिंगांना लावावे आणि बाकीचे रक्त होमवेदीच्या पायथ्यावर ओतावे.
35आणि शांत्यर्पणाच्या कोकराच्या चरबीप्रमाणे त्याची सर्व चरबी काढून घ्यावी आणि वेदीवर असलेल्या हव्यावर परमेश्वराप्रीत्यर्थ तिचा होम करावा; ह्या प्रकारे त्याने केलेल्या पापाबद्दल याजकाने प्रायश्‍चित्त करावे म्हणजे त्याची क्षमा होईल.

सध्या निवडलेले:

लेवीय 4: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन

YouVersion तुमच्या अनुभवाला वैयक्तिकृत करण्यासाठी कुकीज वापरते. आमची वेबसाइट वापरून, तुम्ही आमच्या कुकीजचा वापर करता आमच्या गोपनीयता धोरणात वर्णन केल्याप्रमाणे