YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लेवीय 5

5
1साक्षीदाराने पाहिलेल्या किंवा त्याला माहीत असलेल्या बाबींविषयी त्याला प्रतिज्ञेवर विचारले असता त्याने ती न सांगण्याचे पाप केल्यास त्या अन्यायाबद्दल त्याने शिक्षा भोगावी.
2कोणी अशुद्ध वस्तूला म्हणजे अशुद्ध वनपशूच्या शवाला, अशुद्ध ग्रामपशूच्या शवाला अथवा सरपटणार्‍या अशुद्ध प्राण्याच्या शवाला नकळत शिवल्याने अशुद्ध झाला तर तो दोषी ठरेल.
3त्याचप्रमाणे मनुष्याशी संबंध असलेल्या एखाद्या अशुद्ध वस्तूला कोणी नकळत शिवला आणि आपण अशुद्ध झालो आहोत असे त्याला नंतर कळून आले तर तो दोषी समजावा; मग ती अशुद्ध करणारी वस्तू कोणत्याही प्रकारची असो.
4बरीवाईट गोष्ट करण्याविषयी एखाद्याने अविचाराने प्रतिज्ञा केली; आणि ती प्रतिज्ञा अज्ञानाने केली असली व हे त्याला कळून आले तर अशा प्रत्येक गोष्टीसंबंधाने तो दोषी समजावा; मग ती अविचाराने प्रतिज्ञा केलेली गोष्ट कोणतीही असो.
5तो अशा कोणत्याही गोष्टीविषयी दोषी ठरला तर ज्या बाबतीत त्याने पाप केले ती त्याने कबूल करावी, 6आणि केलेल्या पापाबद्दल परमेश्वराप्रीत्यर्थ त्याने दोषार्पण आणावे; त्याने कळपातील कोकरांची किंवा करडांची एक मादी पापार्पण म्हणून आणावी; आणि याजकाने त्याच्या पापाबद्दल त्याच्यासाठी प्रायश्‍चित्त करावे.
7त्याला कोकरू देण्याची ऐपत नसेल तर त्याने आपण केलेल्या पापाबद्दल दोषार्पण म्हणून दोन होले अथवा पारव्याची दोन पिले परमेश्वराजवळ आणावीत; त्यांपैकी एकाचे पापार्पण व दुसर्‍याचे होमार्पण करावे.
8त्याने ती याजकाकडे आणावीत, मग याजकाने ह्यांतील पापार्पण पहिल्याने अर्पावे; त्याची मुंडी त्याने मुरगळून मोडावी पण ती अलग करू नये;
9पापार्पणाचे थोडे रक्त वेदीच्या बाजूवर शिंपडावे व बाकीचे रक्त वेदीच्या पायथ्यावर निचरू द्यावे; हे पापार्पण होय.
10दुसर्‍या पक्ष्याचा त्याने विधिपूर्वक होम करावा; त्याने केलेल्या पापाबद्दल त्याच्यासाठी याजकाने प्रायश्‍चित्त करावे, म्हणजे त्याची क्षमा होईल.
11दोन होले अथवा पारव्याची दोन पिलेदेखील देण्याची त्याला ऐपत नसेल तर त्याने आपल्या पापाबद्दल एक दशमांश एफा सपीठ पापार्पण म्हणून आणावे; त्याच्यावर त्याने तेल घालू नये किंवा धूप ठेवू नये, कारण हे पापार्पण होय.
12त्याने ते याजकाकडे आणावे आणि याजकाने त्यातले मूठभर घेऊन स्मारकभाग म्हणून वेदीवरील हव्यांवर परमेश्वराप्रीत्यर्थ त्याचा होम करावा; हे पापार्पण होय.
13ह्या कोणत्याही गोष्टीसंबंधाने कोणी पाप केले तर त्याबद्दल याजकाने त्याच्यासाठी प्रायश्‍चित्त करावे म्हणजे त्याची क्षमा होईल; अन्नार्पणाप्रमाणे पापार्पणाचा उरलेला भाग याजकाचा समजावा.”
दोषार्पणे
14परमेश्वर मोशेला म्हणाला :
15“कोणी परमेश्वराच्या कोणत्याही पवित्र वस्तूंच्या बाबतीत अज्ञानाने विश्वासघात केल्याने पापी ठरला, तर त्याने परमेश्वराला दोषार्पण करण्यासाठी कळपातील एक दोषहीन मेंढा घेऊन यावे; तू ठरवशील तितक्या चांदीच्या शेकेलांचा तो असावा; हे शेकेल पवित्रस्थानातील चलनाप्रमाणे असावेत; हे दोषार्पण होय.
16ज्या पवित्र वस्तूच्या बाबतीत त्याने पाप केले असेल तिची भरपाई त्याने करावी, आणि तिच्या मोलाचा आणखी पाचवा हिस्सा तिच्यात घालून ती याजकाला द्यावी; याजकाने हा दोषार्पणाचा मेंढा अर्पून त्याच्यासाठी प्रायश्‍चित्त करावे म्हणजे त्याची क्षमा होईल.
17परमेश्वराने निषिद्ध ठरवलेले एखादे कृत्य केल्याचे पाप कोणाकडून घडले, जरी ते त्याने चुकून केले, तरी तो दोषी ठरेल व त्या अन्यायाबद्दल त्याने शिक्षा भोगावी.
18त्याने कळपातील एक दोषहीन मेंढा दोषार्पणासाठी याजकाकडे आणावा; तू ठरवशील तेवढ्या किंमतीचा तो असावा; त्याने अज्ञानाने जी चूक केली असेल तिच्याबद्दल याजकाने प्रायश्‍चित्त करावे म्हणजे त्याची क्षमा होईल.
19हे दोषार्पण होय; परमेश्वरासमोर तो निश्‍चित दोषी आहे.”

सध्या निवडलेले:

लेवीय 5: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन