लेवीय 6
6
1परमेश्वर मोशेला म्हणाला, 2“कोणी परमेश्वराविरुद्ध विश्वासघात करून पाप केले, म्हणजे ठेव किंवा गहाण ह्यांच्या बाबतीत आपल्या शेजार्याला फसवले किंवा त्याच्यावर जुलूम केला,
3किंवा कोणाची हरवलेली वस्तू सापडली असता तिच्याविषयी त्याने लबाडी करून खोटी शपथ वाहिली, अशा ज्या गोष्टी करून लोक पाप करतात त्यांपैकी एखादी करून कोणी अपराधी ठरला, 4म्हणजे असले पाप करून दोषी झाला तर त्याने लूट करून किंवा जुलूम करून जे घेतले असेल ते, किंवा आपल्याजवळची कोणाची ठेव बुडवली असेल ती, किंवा कोणाची हरवलेली वस्तू त्याला सापडली असून त्याने परत केली नसेल ती, 5किंवा ज्या एखाद्या वस्तूच्या बाबतीत त्याने खोटी शपथ वाहिली असेल ती त्याने पुरी भरून द्यावी. ज्या वस्तूचा त्याने अपहार केला असेल तिची पुरी भरपाई आपल्या दोषार्पणाच्या दिवशी करून देऊन वर आणखी तिचा एक पंचमांश भाग त्याने द्यावा.
6त्याने परमेश्वराप्रीत्यर्थ आपले दोषार्पण आणावे; तू ठरवशील तेवढ्या किंमतीचा कळपातील एक दोषहीन मेंढा दोषार्पणासाठी त्याने याजकाकडे न्यावा;
7याजकाने तो घेऊन परमेश्वरासमोर त्याच्यासाठी प्रायश्चित्त करावे, म्हणजे ज्या कृत्यामुळे तो दोषी ठरला असेल त्याची क्षमा होईल.”
होमार्पणाचा विधी
8परमेश्वर मोशेला म्हणाला, 9“अहरोन व त्याचे मुलगे ह्यांना आज्ञा कर की, होमार्पणाचा विधी असा : होमबली वेदीवरील अग्निकुंडावर रात्रभर ठेवून तो सकाळपर्यंत असू द्यावा, आणि वेदीवरील अग्नी तिच्यावर जळतच ठेवावा.
10मग याजकाने आपला सणाचा झगा आणि चोळणा अंगात घालून होमबली अग्नीत भस्म झाल्यावर त्याची जी राख वेदीवर राहील ती काढून वेदीशेजारी ठेवावी.
11मग त्याने आपली वस्त्रे उतरवून दुसरी घालावीत आणि ती राख छावणीबाहेर एखाद्या स्वच्छ ठिकाणी न्यावी.
12वेदीवरील अग्नी तिच्यावर जळतच ठेवावा, तो विझू देऊ नये; याजकाने त्याच्यावर रोज सकाळी लाकडे घालून तो पेटता ठेवावा आणि त्याच्यावर होमबली रचून शांत्यर्पणांच्या चरबीचा होम करावा.
13वेदीवर अग्नी सतत जळतच ठेवावा, तो विझू देऊ नये.
अन्नार्पणाचा विधी
14अन्नार्पणाचा विधी असा : अहरोनाच्या मुलांनी परमेश्वरासमोर वेदीपुढे ते अर्पावे;
15त्या अन्नार्पणातून मूठभर सपीठ, थोडे तेल व त्यावरील सगळा धूप घेऊन अन्नार्पणाचा स्मारकभाग म्हणून परमेश्वराप्रीत्यर्थ सुवास व्हावा म्हणून त्यांचा वेदीवर होम करावा.
16त्यातून जे उरेल ते अहरोनाने व त्याच्या मुलांनी खावे, ते त्यांनी दर्शनमंडपाच्या अंगणात पवित्र स्थळी खमिरावाचून खावे.
17खमीर घालून ते भाजू नये. माझ्या हव्यातून त्यांचा वाटा म्हणून मी ते त्यांना दिले आहे; पापार्पण अथवा दोषार्पण जसे परमपवित्र आहे तसेच हेही आहे;
18खाण्याचा हक्क अहरोनाच्या संतानांतील प्रत्येक पुरुषाला आहे; परमेश्वराच्या हव्यातून हा त्यांचा वाटा पिढ्यानपिढ्या निरंतर चालू राहावा; ह्या हव्यास जो कोणी स्पर्श करील तो पवित्र आहे.”
19परमेश्वर मोशेला म्हणाला,
20“अहरोनाला अभिषेक होईल त्या दिवशी त्याने आपल्या मुलांसह परमेश्वराला जे अर्पण करायचे ते हे : एक दशांश एफा सपीठ नित्याचे अन्नार्पण म्हणून द्यावे व त्यापैकी अर्धे सकाळी व अर्धे संध्याकाळी अर्पावे.
21ते तव्यावर तेलात परतावे, त्यात तेल चांगले मुरल्यावर ते आत आणावे व त्या परतलेल्या अन्नार्पणाचे तुकडे करून ते परमेश्वराप्रीत्यर्थ सुवास म्हणून अर्पावे.
22त्याच्या मुलांपैकी जो त्याच्या जागी अभिषिक्त याजक होईल त्यानेही असेच अर्पण करावे; निरंतरचा विधी म्हणून परमेश्वराप्रीत्यर्थ त्याचा संपूर्ण होम करावा.
23याजकाच्या प्रत्येक अन्नार्पणाचा संपूर्ण होम करावा; ते खाऊ नये.”
पापार्पणाचा विधी
24परमेश्वर मोशेला म्हणाला,
25“अहरोन व त्याचे मुलगे ह्यांना सांग की, पापार्पणाचा विधी असा : ज्या ठिकाणी होमबलीचा वध करतात तेथेच परमेश्वरासमोर पापबलीचाही वध करावा; तो परमपवित्र होय.
26जो याजक पापबली अर्पण करील त्याने तो खावा. दर्शनमंडपाच्या अंगणात पवित्र स्थळी तो खावा.
27ज्याला त्याच्या मांसाचा स्पर्श होईल तो पवित्र आहे; आणि त्याचे रक्त एखाद्या वस्त्रावर उडाले तर असे वस्त्र पवित्र स्थळी धुवावे.
28ते मांस मडक्यात शिजवले असेल तर ते मडके फोडून टाकावे; पण पितळेच्या पात्रात ते शिजवले असेल तर ते पात्र घासून पाण्याने धुवावे.
29ते खाण्याचा हक्क याजकवर्गातील प्रत्येक पुरुषाला आहे; ते परमपवित्र होय.
30पण ज्या पापबलीचे काही रक्त दर्शनमंडपात पवित्रस्थानी प्रायश्चित्तासाठी आणतील त्याचे मांस खाऊ नये; ते अग्नीत जाळावे.
सध्या निवडलेले:
लेवीय 6: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.