आमो. 5
5
पश्चात्तापासाठी आवाहन
1इस्राएलाचे घराणे हो, हे वचन जे विलापासारखे आहे, असे तुमच्याकडे आणतो ते ऐका.
2इस्राएलाची कुमारिका पडली आहे;
ती पुन्हा कधीही उठणार नाही;
तिला एकटीलाच सोडून दिले आहे,
तिला उठवणारा कोणीही नाही.
3परमेश्वर असे म्हणतो,
“ज्या शहरातून हजार निघाले त्यामध्ये फक्त शंभर उरतील
आणि ज्यातून शंभर असत त्यामध्ये इस्राएलाच्या घराण्याला दहा उरतील.”
4परमेश्वर इस्राएलाच्या घराण्याला असे म्हणतो,
“मला शोधा म्हणजे तुम्ही जिवंत रहाल.”
5पण बेथेलास शरण जाऊ नका;
गिल्गालला जाऊ नका;
सीमा ओलांडून खाली बैर-शेबालाही जाऊ नका.
गिलगालमधील लोकांस कैदी म्हणून नेले जाईल,
आणि बेथेल नाहीसे होईल.
6परमेश्वरास शोधा म्हणजे तुम्ही जिवंत रहाल,
नाहीतर तो अग्नीसारखा योसेफाच्या घरावर पडेल
आणि ते भस्मसात होऊन जाईल
आणि त्यास विझवायला बेथेलमधे कोणी नसणार.
7जे तुम्ही न्यायाला कडूपणामध्ये बदलता
आणि न्यायीपण धुळीस मिळवता,
8ते तुम्ही, ज्याने कृत्तिका व मृगशीर्ष ही नक्षत्रे बनवली,
तोच दिवसाचे परिवर्तन काळोख्या रात्रीत करतो;
आणि दिवसास रात्रीने अंधकारमय करतो;
समुद्रातील पाण्याला बोलावून पृथ्वीच्या पाठीवर ओततो,
त्याचे नाव “परमेश्वर” आहे.
9तो बलवानावर एकाएकी नाश आणतो
म्हणून किल्ल्यांवर नाश येतो.
10जे त्यांना वेशींवर सरळ करु ईच्छीतात, त्यांचा ते द्वेष करतात,
आणि जे सत्य बोलतात त्यांचा ते तिरस्कार करतात.
11तुम्ही गरिबांना तुडवीता,
आणि त्याच्याकडून गव्हाचा खंड वसूल करता.
जरी तुम्ही कोरीव दगडांची घरे बांधली,
पण त्यामध्ये तुम्ही रहाणार नाही.
तुमच्या द्राक्षाच्या सुंदर बागा आहेत,
पण त्यापासून निघणारा द्राक्षरस तुम्ही पिणार नाही.
12कारण मला तुमच्या पुष्कळ पापांची माहिती आहे,
आणि तुम्ही खरोखरच खूप वाईट कृत्ये केली आहेत.
तुम्ही लाच घेता,
धार्मिकाला त्रास देता,
आणि वेशींत गरिबांचा न्याय विपरीत करता. 13त्यावेळी, सुज्ञ गप्प बसतील, कारण ती वाईट वेळ असेल.
14तुम्ही जगावे म्हणून जे उत्तम आहे त्याचा शोध करा,
वाईटाला शोधू नका.
म्हणजे जसे तुम्ही म्हणता,
त्याप्रमाणे सर्वशक्तिमान परमेश्वर देव खरोखरच तुमच्याबरोबर येईल.
15वाईटाचा द्वेष करा व चांगुलपणावर प्रेम करा,
नगराच्या वेशीत न्याय स्थापित करा.
मग कदाचित सर्वशक्तिमान परमेश्वर देव,
योसेफाच्या वाचलेल्या वंशजांवर कृपा करील.
16यास्तव सेनाधीश परमेश्वर देव, प्रभू असे म्हणतो,
“सर्व चव्हाट्यावर रडणे असेल,
आणि गल्लोगल्ली लोक हाय हाय करतील,
आणि ते शेतकऱ्याला शोक करायला
आणि विलाप करण्यात चतुर असलेल्यांना आक्रोश करायला बोलवून आणतील.
17द्राक्षमळ्यांत लोक रडत असतील,
कारण मी तुमच्यामध्ये फिरत जाईन.”
असे परमेश्वर म्हणतो.
18जे परमेश्वराच्या न्यायाच्या दिवसाची इच्छा धरतात त्यांना हाय हाय!
तुम्हास तो दिवस का बरे पहावयाचा आहे?
तो अंधार आहे, उजेड नाही. 19जणू काय एखादा मनुष्य सिंहापासून दूर पळून गेला
आणि अस्वलाने त्यास गाठले,
अथवा घरात जाऊन त्याने भिंतीवर हात ठेवला
आणि त्यास साप चावाला.
20परमेश्वराचा दिवस प्रकाश न होता अंधार होणार नाही काय?
प्रकाशाचा एक किरण नसलेला व त्यामध्ये काही तेज नाही असा असेल.
21“मला तुमच्या सणांचा तिरस्कार वाटतो,
मी ते मान्य करणार नाही. तुमच्या धार्मिक सभा मला आवडत नाहीत.
22तुम्ही मला होमार्पणे व अन्नार्पणे जरी दिलीत,
तरी मी ती स्वीकारणार नाही,
शांत्यर्पणात, तुम्ही दिलेल्या पुष्ट प्राण्यांकडे मी पाहणारसुध्दा नाही.
23तुमच्या गाण्यांच्या कोलाहल येथून दूर न्या,
तुमच्या वीणांचा आवज मी ऐकणार नाही.
24तर जलांप्रमाणे न्याय व न्यायीपण अविरतपणे वाहणाऱ्या प्रवाहाप्रमाणे वाहो.
25इस्राएल, वाळवंटात, चाळीस वर्षे तू मला यज्ञ व दाने अर्पणे करत होता काय?
26तुम्ही तर आपल्या राजाचा डेरा व तुमच्या मूर्तीचा देव्हारा,
आपणासाठी केलेला तुमच्या देवाचा तारा, ही वाहून न्याल.
27म्हणून मी तुम्हास कैदी म्हणून दिमिष्काच्या पलीकडे घालवीन.” असे परमेश्वर म्हणतो. सेनाधीश देव हे त्याचे नाव आहे.
सध्या निवडलेले:
आमो. 5: IRVMar
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
MAR-IRV
Creative Commons License
Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.