स्तोत्र. 78
78
एकनिष्ठपणे न वागणाऱ्यावरही देवाची कृपा
आसाफाचे स्तोत्र
1अहो माझ्या लोकांनो, माझी शिकवण ऐका,
माझ्या तोंडच्या वचनाकडे लक्ष द्या.
2मी शहाणपणाचे गीत गाईन;
मी पूर्वकाळच्या गुप्त गोष्टीबद्दल सांगेन.
3ज्या आम्ही ऐकल्या आणि ज्या आम्हास समजल्या,
त्या आमच्या वाडवडिलांनी आम्हास सांगितल्या.
4त्या आम्ही त्यांच्या वंशजापासून गुप्त ठेवणार नाही.
त्या आम्ही पुढील पिढीला परमेश्वराची स्तुत्य कृत्ये,
त्याचे सामर्थ्य आणि त्याने केलेले आश्चर्ये कृत्ये सांगू.
5कारण त्याने याकोबात निर्बंध स्थापले
आणि इस्राएलासाठी नियमशास्त्र नेमले.
त्याने आमच्या पूर्वजांना आज्ञा दिल्या की,
त्यांनी त्या आपल्या मुलांना शिकवाव्या.
6त्याने ही आज्ञा यासाठी दिली की, पुढच्या पिढीने म्हणजे जी मुले जन्माला येतील, त्यांनी त्या आज्ञा जाणाव्या,
त्या आपल्या स्वतःच्या मुलांना सांगाव्या.
7मग ते आपली आशा देवावर ठेवतील
आणि त्याची कृत्ये विसरणार नाहीत
परंतु त्याच्या आज्ञा पाळतील.
8तर त्यांनी आपल्या पूर्वजासारखे
हट्टी आणि बंडखोर पिढी होऊ नये,
त्यांनी आपले अंतःकरण योग्य राखले नाही,
आणि जिचा आत्मा देवाला समर्पित व प्रामाणिक नव्हता.
9एफ्राइमाचे वंशज धनुष्यासह सशस्र होती,
परंतु त्यांनी युद्धाच्यादिवशी पाठ फिरवली.
10त्यांनी देवाबरोबर करार पाळला नाही,
आणि त्यांनी त्याचे नियमशास्त्र पाळण्याचे नाकारले.
11ते त्याची कृत्ये
व त्याने दाखवलेली विस्मयकारक गोष्टी ते विसरले.
12मिसर देशातल्या सोअन प्रांतात
त्यांच्या वडिलांच्या दृष्टीसमोर त्याने आश्चर्यकारक गोष्टी केल्या.
13त्याने समुद्र दुभागला आणि त्यांना पलिकडे नेले,
त्याने पाणी भिंतीसारखे उभे केले.
14तो त्यांना दिवसा मेघ
व रात्रभर अग्नीच्या प्रकाशात मार्ग दाखवित घेऊन जात असे.
15त्याने रानात खडक फोडला,
आणि समुद्राची खोली पुरे भरण्यापर्यंत त्यांना विपुल पाणी दिले.
16त्याने खडकातून पाण्याचे प्रवाह
आणि नदीसारखे पाणी बाहेर वाहविले.
17तरी ते त्याच्याविरुध्द पाप करितच राहिले.
रानात परात्पराविरूद्ध बंड केले.
18नंतर त्यांनी आपली भूक तृप्त करण्यासाठी,
अन्न मागून आपल्या मनात देवाला आव्हान दिले.
19ते देवाविरूद्ध बोलले,
ते म्हणाले, “देव खरोखर आम्हास रानात भोजन देऊ शकेल का?
20पहा, त्याने खडकावर प्रहार केला तेव्हा पाणी उसळून बाहेर पडले,
आणि पाण्याचे प्रवाह भरून वाहू लागले.
पण भाकरही देऊ शकेल काय?
तो आपल्या लोकांसाठी मांसाचा पुरवठा करील काय?”
21जेव्हा परमेश्वराने हे ऐकले, तेव्हा तो रागावला;
म्हणून याकोबावर त्याचा अग्नि भडकला,
आणि त्याच्या रागाने इस्राएलवर हल्ला केला,
22कारण त्यांनी देवावर विश्वास ठेवला नाही,
आणि त्याच्या तारणावर भरवसा ठेवला नाही.
23तरी त्याने वर आभाळाला आज्ञा दिली,
आणि आभाळाचे दरवाजे उघडले.
24खाण्यासाठी त्याने त्यांच्यावर मान्नाचा वर्षाव केला,
आणि त्यांना आकाशातून धान्य दिले.
25देवदूतांची भाकर लोकांनी खाल्ली.
त्याने त्यांना भरपूर अन्न पाठवून दिले.
26त्याने आकाशात पूर्वेचा वारा वाहविला,
आणि त्याच्या सामर्थ्याने त्याने दक्षिणेच्या वाऱ्याला मार्ग दाखवला.
27त्याने त्यांच्यावर धुळीप्रमाणे मांसाचा
आणि समुद्रातील वाळूप्रमाणे असंख्य पक्षांचा वर्षाव केला.
28ते त्यांच्या छावणीच्यामध्ये पडले,
त्यांच्या तंबूच्या सर्व सभोवती पडले.
29मग त्यांनी ते खाल्ले आणि तृप्त झाले. त्यांच्या हावेप्रमाणे त्याने त्यांना दिले.
30पण अजून त्यांची तृप्ती झाली नव्हती;
त्यांचे अन्न त्यांच्या तोडांतच होते.
31त्याच क्षणाला, देवाच्या कोपाने त्याच्यावर हल्ला केला,
आणि त्यांच्यातील बलवानास मारून टाकले.
त्याने इस्राएलाच्या तरुणास हाणून पाडले.
32इतके झाले तरी ते पाप करितच राहीले,
आणि त्यांनी त्याच्या आश्चर्यकारक कृत्यांवर विश्वास ठेवला नाही.
33म्हणून देवाने त्यांचे दिवस थोडके केले;
त्यांचे आयुष्य भयानक भयात संपवले.
34जेव्हा कधी देवाने त्यांना पीडिले, तेव्हा त्यांनी त्याचा शोध घेण्यास सुरवात केली.
उत्सुकतेने ते त्याच्याकडे वळले.
35देव आमचा खडक आहे,
आणि परात्पर देव आमचा सोडवणारा याची आठवण त्यांना झाली.
36पण त्यांनी आपल्या मुखाने त्याची खोटी स्तुती केली
आणि आपल्या जीभेने त्याच्याजवळ लबाडी केली.
37कारण त्यांचे मन त्यांच्याठायी स्थिर नव्हते,
आणि ते त्याच्या कराराशी एकनिष्ठ नव्हते.
38परंतु तो दयाळू असल्यामुळे त्यांच्या अपराधांची क्षमा करतो आणि त्याने त्यांचा नाश केला नाही.
होय, तो अनेक वेळा आपला राग आवरून धरतो,
आणि आपला सर्व राग भडकू देत नाही.
39ती केवळ देह आहेत,
वारा वाहून निघून जातो आणि तो परत येत नाही याची त्याने आठवण केली.
40त्यांनी किती वेळा रानात त्याच्याविरुध्द बंडखोरी केली,
आणि पडिक प्रदेशात त्यांनी त्यास दु:खी केले.
41पुन्हा आणि पुन्हा देवाला आव्हान केले,
आणि इस्राएलाच्या पवित्र प्रभूला खूप दु:खविले.
42त्यांनी त्याच्या सामर्थ्याविषयी विचार केला नाही,
त्याने त्यांना शत्रूपासून कसे सोडवले होते.
43मिसरात जेव्हा त्याने आपली घाबरून सोडणारी चिन्हे
आणि सोअनाच्या प्रांतात आपले चमत्कारही दाखविले ते विसरले.
44त्याने मिसऱ्यांच्या नद्यांचे रक्तात रुपांतर केले.
म्हणून त्याच्या प्रवाहातील पाणी त्यांच्याने पिववेना.
45त्याने चावणाऱ्या माशांचे थवे पाठवले त्यांनी त्यांना खाऊन टाकले,
आणि बेडकांनी त्यांचा देश आच्छादला.
46त्याने त्यांची पिके नाकतोड्यांच्या हवाली
आणि त्यांच्या श्रमाचे फळ टोळाला दिले.
47त्याने गारांनी त्यांच्या द्राक्षवेलींचा
आणि त्यांच्या उंबराच्या झाडांचा नाश बर्फाने केला.
48त्याने त्यांची गुरेढोरे गारांच्या
व त्यांचे कळप विजांच्या हवाली केली.
49त्यांने आपल्या भयंकर रागाने त्यांच्याविरुद्ध तडाखे दिले.
त्याने अरिष्ट आणणाऱ्या प्रतिनीधीप्रमाणे आपला क्रोध, प्रकोप आणि संकट पाठवले.
50त्याने आपल्या रागासाठी मार्ग सपाट केला;
त्याने त्यांना मरणापासून वाचविले नाही
पण त्याने त्यांना मरीच्या हवाली केले.
51त्याने मिसरमध्ये प्रथम जन्मलेले सर्व,
हामाच्या तंबूतील#हामचे तंबू हा मिसरबद्दल बोलण्याचा एक मार्ग आहे (105:23, 27; 106:22 पहा, जिथे मिसरला “हामची भूमी असे म्हटले आहे”). हाम हा नोहाच्या मुलांपैकी एक होता, आणि त्याला मिसरी लोकांचा पूर्वज म्हटले गेले (उत्पत्ती 10:6 पहा). त्यांच्या शक्तीचे प्रथम जन्मलेले मारून टाकले.
52त्याने आपल्या लोकांस मेंढरांसारखे बाहेर नेले
आणि त्याने त्याच्या कळपाप्रमाणे रानातून नेले.
53त्याने त्यांना सुखरुप आणि न भीता मार्गदर्शन केले,
पण समुद्राने त्यांच्या शत्रूंना बुडवून टाकले.
54आणि त्याने त्यास आपल्या पवित्र देशात,
हा जो पर्वत आपल्या उजव्या हाताने मिळवला त्याकडे आणले.
55त्याने त्यांच्यापुढून राष्ट्रांना हाकलून लावली,
आणि त्यांना त्यांची वतने सूत्राने मापून नेमून दिली; आणि त्यांच्या तंबूत इस्राएलाचे वंश वसविले.
56तरी त्यांनी परात्पर देवाला आव्हान दिले आणि त्याच्याविरुध्द बंडखोरी केली,
आणि त्यांनी त्याच्या आज्ञा पाळल्या नाहीत.
57ते आपल्या पूर्वजाप्रमाणे अविश्वासू होते आणि त्यांनी विश्वासघातकी कृत्ये केली;
फसव्या धनुष्याप्रमाणे ते स्वतंत्रपणे वळणारे होते.
58कारण त्यांनी आपल्या उंच जागा बांधल्या आणि देवाला क्रोधित केले
आणि आपल्या कोरीव मूर्तींमुळे त्यास आवेशाने कोपविले.
59जेव्हा देवाने हे ऐकले, तो रागावला,
आणि त्याने इस्राएलाला पूर्णपणे झिडकारले.
60त्याने शिलोतले #शिलो हे शहर एफ्राइमाच्या कुळाचा प्रदेश होते, जेथे इस्राएलाच्या इतिहासाच्या सुरवातीच्या दिवसात कराराचा कोश ठेवण्यात आला होता (यहो. 18:1; 1 शमु. 1:3 पहा). पवित्रस्थान सोडून दिले,
ज्या तंबूत लोकांच्यामध्ये तो राहत होता.
61त्याने आपल्या सामर्थ्याचा कोश बंदिवासात जाण्याची परवानगी दिली,
आणि आपले गौरव शत्रूच्या हातात दिले.
62त्याने आपले लोक तलवारीच्या स्वाधीन केले,
आणि आपल्या वतनावर तो रागावला.
63अग्नीने त्यांच्या तरुण मनुष्यास खाऊन टाकले,
आणि त्यांच्या तरुण स्रीयांना लग्नगीते लाभली नाहीत.
64त्यांचे याजक तलवारीने पडले,
आणि त्यांच्या विधवा त्यांच्यासाठी रडल्या नाहीत.
65मग प्रभू झोपेतून जागा झालेल्या मनुष्यासारखा उठला,
द्राक्षरसामुळे आरोळी मारणाऱ्या सैनिकासारखा तो उठला.
66त्याने आपल्या शत्रूंना मारून मागे हाकलले;
त्याने त्यांची कायमची नामुष्की केली.
67त्याने योसेफाचा तंबू नाकारला,
आणि त्याने एफ्राईमाच्या वंशाचा स्वीकार केला नाही.
68त्याने यहूदाच्या वंशाला निवडले,
आणि आपला आवडता सियोन पर्वत निवडला.
69उंच आकाशासारखे व आपण सर्वकाळ स्थापिलेल्या
पृथ्वीसारखे त्याने आपले पवित्रस्थान बांधले.
70त्याने आपला सेवक दावीदाला निवडले,
आणि त्यास त्याने मेंढरांच्या कोंडवाड्यांतून घेतले.
71आपले लोक याकोब व आपले वतन इस्राएल यांचे पालन
करण्यास त्याने त्यास दुभत्या मेंढ्याच्या मागून काढून आणले.
72दावीदाने आपल्या मनाच्या सरळतेने त्याचे पालन केले,
आणि आपल्या हातच्या कौशल्याने त्यास मार्ग दाखविला.
सध्या निवडलेले:
स्तोत्र. 78: IRVMar
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
MAR-IRV
Creative Commons License
Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.