YouVersion लोगो
सर्च आयकॉन

1 योहान 3

3
देवपित्याने दिलेले प्रीतिदान
1आपल्याला देवाची मुले हे नाव मिळाले, ह्यात पित्याने आपल्याला प्रीती हे केवढे दान दिले आहे पाहा आणि आपण तसे आहोतच. ह्यामुळे जग आपल्याला ओळखत नाही, कारण त्याने देवाला ओळखले नाही. 2प्रियजनहो, आपण आता देवाची मुले आहोत आणि पुढे आपण काय होऊ, हे अजून स्पष्ट झालेले नाही, परंतु तो प्रकट होईल तेव्हा आपण त्याच्यासारखे होऊ, हे आपल्याला माहीत आहे, कारण जसा तो आहे, तसाच तो आपल्याला दिसेल. 3जो कोणी त्यासंबंधाने आशा बाळगतो तो, ख्रिस्त जसा शुद्ध आहे, तसे स्वतःला शुद्ध राखतो.
ईश्वरी पुत्रत्व व पाप ह्यांत विरोध
4जो कोणी पाप करतो, तो स्वैराचार करतो, कारण पाप स्वैराचार आहे. 5तुम्हांला माहीत आहे की, पापे हरण करण्यासाठी तो प्रकट झाला आणि त्याच्यामध्ये पाप नाही. 6जो कोणी त्याच्यामध्ये राहतो, तो पाप करत नाही, जो कोणी पाप करतो, त्याने त्याला पाहिले नाही व त्याला ओळखलेही नाही.
7मुलांनो, कोणी तुम्हांला बहकवू नये! जसा तो नीतिमान आहे, तसा नीतीने चालणाराही नीतिमान आहे. 8पाप करणारा सैतानच आहे, कारण सैतान प्रारंभापासून पाप करत आहे. सैतानाची कृत्ये नष्ट करण्यासाठीच देवाचा पुत्र प्रकट झाला.
9जो कोणी देवापासून जन्मलेला आहे, तो पाप करत नाही, कारण देवाचे बीज त्याच्यामध्ये राहते. तो पाप करू शकत नाही, कारण तो देवापासून जन्मलेला आहे. 10ह्यावरून देवाची मुले व सैतानाची मुले उघड दिसून येतात. जो कोणी नीतीने वागत नाही, तो देवाचा नाही आणि जो आपल्या बंधूवर प्रीती करत नाही तोही नाही.
11जो संदेश तुम्ही प्रारंभापासून ऐकला, तो हाच आहे की, आपण एकमेकांवर प्रीती करावी. 12काइन त्या दुष्टाचा होता व त्याने आपल्या बंधूचा वध केला, त्याच्यासारखे आपण नसावे. त्याने त्याचा वध कशासाठी केला? कारण काइनची कृत्ये दुष्ट होती आणि त्याच्या बंधूची कृत्ये नीतीची होती.
बंधुप्रीती
13बंधूंनो, जग तुमचा द्वेष करते ह्याचे आश्चर्य मानू नका. 14आपण बंधुजनांवर प्रीती करतो ह्यावरून आपणास कळून येते की, आपण मरणातून निघून जीवनात आलो आहोत. जो प्रीती करत नाही, तो मरणात राहतो. 15जो कोणी आपल्या बंधूचा द्वेष करतो, तो नरहिंसक आहे आणि कोणाही नरहिंसकामध्ये शाश्वत जीवन राहत नाही, हे तुम्हांला माहीत आहे. 16ख्रिस्ताने आपल्याकरिता स्वतःचा प्राण अर्पिला, ह्यावरून आपल्याला प्रीतीचे ज्ञान झाले आहे. तेव्हा आपणही आपल्या बंधूकरिता स्वतःचा प्राण अर्पिला पाहिजे. 17स्वतःजवळ ऐहिक धन असून व आपला बंधू गरजवंत आहे हे पाहून, जो स्वतःला त्याचा कळवळा येऊ देत नाही त्याच्यामध्ये देवाची प्रीती कशी राहणार? 18मुलांनो, आपल्या शब्दांनी किंवा बोलण्याने नव्हे, तर आपण कृतीने खरी प्रीती करावी.
19आपण सत्याचे आहोत, हे ह्यावरून आपल्याला कळून येईल आणि अशा प्रकारे आपण त्याच्यासमोर आत्मविश्वास बाळगू. जर आपले मन आपल्या स्वतःला दोषी ठरवते, तर आपल्याला ठाऊक आहे की, 20आपल्या मनापेक्षा देव थोर आहे व त्याला सर्व काही कळते. 21प्रियजनहो, आपले मन आपल्याला दोषी ठरवीत नसेल, तर देवासमोर येण्याचे आपण धैर्य बाळगतो. 22आपण जे काही मागतो, ते त्याच्याकडून आपल्याला मिळते, कारण आपण त्याच्या आज्ञा पाळतो व त्याला जे आवडते, ते करतो. 23त्याची आज्ञा आहे की, त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्या नावावर आपण विश्वास ठेवावा आणि त्याने आपल्याला आज्ञा दिल्याप्रमाणे आपण एकमेकांवर प्रीती करावी. 24त्याच्या आज्ञा पाळणारा माणूस त्याच्याबरोबर एकनिष्ठ राहतो व तो त्या माणसामध्ये राहतो. त्याने जो आत्मा आपल्याला दिला, त्यावरून आपल्याला कळून येते की, तो आपल्यामध्ये राहतो.

सध्या निवडलेले:

1 योहान 3: MACLBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन