1 योहान 2
2
1अहो माझ्या मुलांनो, तुम्ही पाप करू नये म्हणून मी तुम्हांला लिहितो. जर कोणी पाप केले, तर नीतिमान असा येशू ख्रिस्त पित्याजवळ आपला कैवारी आहे 2आणि त्याच्याच साहाय्याने आपल्याला पापांची क्षमा मिळते; केवळ आपल्याच पापांची नव्हे तर सर्व जगाच्याही पापांची क्षमा मिळते.
आज्ञाधारकपणा देवाच्या सहवासाचे प्रमाण
3आपण देवाच्या आज्ञा पाळल्या तर त्यावरून आपल्याला खातरीने कळून येते की, आपण त्याला ओळखतो. 4“मी त्याला ओळखतो”, असे म्हणून त्याच्या आज्ञा जो पाळत नाही तो लबाड आहे, त्याच्यामध्ये सत्य नाही. 5जो कोणी त्याच्या वचनाप्रमाणे चालतो, त्याच्यामध्ये देवाची प्रीती खरोखर पूर्णत्व पावली आहे. ह्यावरून आपल्याला कळून येते की, आपण त्याच्याशी एकनिष्ठ आहोत. 6“मी त्याच्याशी एकनिष्ठ राहतो”, असे म्हणणाऱ्याने येशू ख्रिस्त जसा चालला, तसे स्वतःही चालले पाहिजे.
7प्रियजनहो, मी तुम्हांला नवी आज्ञा लिहीत नाही, परंतु जी आज्ञा तुम्हांला प्रारंभापासून देण्यात आली आहे, तीच जुनी आज्ञा लिहितो. जे वचन तुम्ही ऐकले, ते ती जुनी आज्ञा होय. 8तरी एक प्रकारे मी तुम्हांला नवी आज्ञा लिहितो. ती ख्रिस्ताच्या व तुमच्या बाबतीत खरोखर तशी आहे. कारण अंधार नाहीसा होत आहे व खरा प्रकाश आता उजळत आहे.
9“मी प्रकाशात आहे”, असे म्हणून जो आपल्या बंधूचा द्वेष करतो तो अजून अंधारातच आहे. 10आपल्या बंधूवर प्रीती करणारा प्रकाशात राहतो आणि तो कोणत्याही प्रकारे दुसऱ्यांना पापास प्रवृत्त करत नाही. 11पण आपल्या बंधूचा द्वेष करणारा अंधारात आहे, अंधारात चालतो आणि तो कोठे चालला आहे, हे त्याचे त्यालाच कळत नाही, कारण अंधाराने त्याच्या डोळ्यांवर अंधत्व आणलेले आहे.
12मुलांनो, मी तुम्हांला लिहितो, कारण ख्रिस्ताच्या नावामुळे तुमच्या पापांची क्षमा झाली आहे. 13वडिलांनो, मी तुम्हांला लिहितो, कारण जो प्रारंभापासून आहे त्याला तुम्ही ओळखता. तरुणांनो, मी तुम्हांला लिहितो, कारण जो दुष्ट त्याला तुम्ही जिंकले आहे.
14मुलांनो, मी तुम्हांला लिहिले आहे, कारण तुम्ही पित्याला ओळखता. वडिलांनो, मी तुम्हांला लिहिले आहे, कारण जो प्रारंभापासून आहे त्याला तुम्ही ओळखता. तरुणांनो, मी तुम्हांला लिहिले आहे, कारण तुम्ही बलवान आहात, तुमच्यामध्ये देवाचे वचन राहते आणि त्या दुष्टाला तुम्ही जिंकले आहे.
15जगावर व जगातल्या गोष्टींवर प्रीती करू नका. जर कोणी जगावर प्रीती करतो, तर त्याच्यामध्ये पित्याची प्रीती नाही. 16जगात जे सर्व आहे, ते म्हणजे देहाची वासना, डोळ्यांची वासना व श्रीमंतीचा अहंकार ह्या गोष्टी पित्याकडून नाहीत, तर जगाच्या आहेत. 17जग व त्याची वासना ही नाहीशी होत आहेत. मात्र देवाच्या इच्छेप्रमाणे वागणारा सर्व काळ जगतो.
ख्रिस्तविरोधकाच्या बाबतीत इशारे
18माझ्या मुलांनो, ही शेवटची घटका आहे! ख्रिस्तविरोधक येणार, असे तुम्ही ऐकले आहे त्याप्रमाणे आत्ताच पुष्कळ ख्रिस्तविरोधक उठले आहेत आणि ह्यावरून आपल्याला दिसून येते की, ही शेवटची घटका आहे. 19जरी आपल्यातूनच ते निघून गेले कारण ते आपले नव्हते. ते आपले असते, तर आपल्याबरोबर राहिले असते. त्यांच्यातील कोणीही आपला नव्हता, हे प्रकट व्हावे म्हणून ते निघून गेले.
20ख्रिस्ताच्या पवित्र आत्म्याकडून तुमचा अभिषेक झाला आहे, म्हणून तुम्ही सत्य जाणता. 21तुम्हांला सत्य कळत नाही म्हणून मी तुम्हांला लिहिले आहे, असे नाही. तुम्हांला ते कळते म्हणून आणि सत्यात कोणतीही लबाडी नसते म्हणून हे लिहिले आहे.
22येशू हा ख्रिस्त आहे, हे जो नाकारतो त्याच्याशिवाय कोण लबाड आहे? जो पित्याला व पुत्राला नाकारतो तोच ख्रिस्तविरोधी आहे. 23जो कोणी पुत्राला नाकारतो, त्याला पिता लाभला नाही, जो पुत्राला स्वीकारतो त्याला पितादेखील लाभला आहे.
24जे तुम्ही प्रारंभापासून ऐकले, ते तुमच्या अंतःकरणात राखून ठेवा. ते जर तुमच्यामध्ये राखून ठेवले तर तुम्हीही पुत्रामध्ये व पित्यामध्ये राहाल. 25जे अभिवचन ख्रिस्ताने स्वतः आपल्याला दिले आहे, ते शाश्वत जीवन होय.
26तुम्हांला बहकविणाऱ्या लोकांविषयी हे मी तुम्हांला लिहिले आहे. 27तुमच्याविषयी म्हणावयाचे तर ख्रिस्ताकडून तुमचा जो अभिषेक झाला, त्यामुळे पवित्र आत्मा तुमच्यामध्ये राहतो, म्हणून तुम्हांला कोणीही शिकविण्याची गरज नाही, त्याचा अभिषेक सत्य आहे, खोटा नाही. पवित्र आत्मा तुम्हांला सर्व गोष्टींविषयी शिकवितो त्याप्रमाणे तुम्ही ख्रिस्तामध्ये राहा.
28तर आता मुलांनो, ख्रिस्तामध्ये राहा, ह्यासाठी की तो प्रकट होईल, तेव्हा आपल्याला धैर्य असावे आणि त्याच्या येण्याच्या वेळेस त्याच्यापुढून लाजेने माघार घ्यावी लागू नये. 29तो नीतिमान आहे, हे जर तुम्हांला माहीत आहे, तर मग जो कोणी नीतीने चालतो, तो त्याच्यापासून जन्मलेला आहे, हेही तुम्हांला माहीत झाले असावे.
सध्या निवडलेले:
1 योहान 2: MACLBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र
Copyright © 2018 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.