2 करिंथ 7
7
1प्रियजनहो, आपणाला ही अभिवचने मिळाली आहेत, म्हणून देहाच्या व आत्म्याच्या सर्व अशुद्धतेपासून आपण स्वतःला शुद्ध करू या आणि देवाचे भय बाळगून आपण पूर्णपणे पवित्र होऊ या.
तीतच्या येण्याने झालेला आनंद
2तुम्ही आमचा अंगिकार करा, आम्ही कोणावर अन्याय केला नाही. कोणाचे नुकसान केले नाही, कोणाचा गैरफायदा घेतला नाही. 3तुम्हांला दोषी ठरविण्यासाठी मी हे म्हणत आहे, असे नाही; कारण मी पूर्वी सांगितले आहे, त्याप्रमाणे तुम्हांला आमच्या अंतःकरणात असे स्थान आहे की, आम्ही मरणार तर तुमच्याबरोबर व जगणार तर तेही तुमच्याबरोबर. 4मी वारंवार तुमच्याविषयी बढाई मारतो. मला तुमचा फार अभिमान वाटतो. मी तुमच्याविषयी समाधानी आहे. आमच्यावर ओढवलेल्या दु:खात मी अतिशय आनंदित आहे.
5आम्ही मासेदोनियात आल्यावरही आम्हांला आराम मिळाला नाही, परंतु आम्ही चहूकडून त्रस्त होतो. बाहेरून वादावादी आतून भय. 6तथापि निराश झालेल्यांचे सांत्वन करणारा देव ह्याने तीताच्या आगमनाने आम्हांला आनंदित केले. 7त्याच्या केवळ येण्यामुळे नव्हे, तर तुम्ही त्याला कसे प्रोत्साहन दिले ह्याविषयी ऐकून मला आनंद झाला. मला भेटण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात, तुम्हांला किती खेद वाटतो व माझे समर्थन करण्यासाठी तुम्ही कसे तयार आहात, हे सर्व आम्हांला सांगत असताना तुमच्याविषयी त्याला जो आनंद झाला ते पाहून माझा आनंद द्विगुणित झाला.
8मी माझ्या पत्राने तुम्हांला दुःख दिले, ह्याबद्दल मला आता वाईट वाटत नाही. त्या पत्रापासून तुम्हांला काही वेळ तरी दुःख होईल असे मला दिसले असते, तर मला वाईट वाटले असते. 9परंतु आता मी आनंदी आहे. तुम्हांला दुःख झाले ह्यामुळे नव्हे तर पश्चात्ताप होण्याजोगे दुःख झाले म्हणून. त्या दुःखाचा देवाने उपयोग करून घेतला म्हणून तुम्हांला काही इजा पोहोचली नाही. 10देवाकडून आलेले दुःख तारणदायक पश्चात्तापास कारणीभूत होते त्याबद्दल खेद वाटत नाही! पण ऐहिक दुःख मरणास कारणीभूत होते. 11पाहा, देवाकडून आलेल्या तुमच्या दुःखाचा देवाने किती उपयोग करून घेतला: ह्या एकाच गोष्टीने तुमच्यामध्ये केवढी कळकळ, स्वत:ला निर्दोष ठरविण्यासाठी केवढी उत्सुकता, केवढा आदर, केवढा प्रामाणिकपणा, केवढी उत्कंठा, केवढा आवेश व केवढी न्यायबुद्धी उत्पन्न झाली! ह्या बाबतीत तुम्ही सर्व प्रकारे निर्दोष आहात ह्याचे प्रमाण तुम्ही पटवून दिले.
12म्हणजे मी तुम्हांला लिहिले, ते ज्याने अन्याय केला त्याच्यामुळे नव्हे, आणि ज्याच्यावर अन्याय झाला त्याच्यामुळेही नव्हे, तर आमच्याविषयी तुम्ही दाखवीत असलेल्या आवेशाची जाणीव तुम्हांला देवासमक्ष व्हावी म्हणून लिहिले. 13ह्यामुळे आमचे समाधान झाले आहे आणि आम्हांलाच नव्हे, तर विशेषकरून तीतला आनंद झाल्यामुळे आम्हीही फारच आनंदित झालो; कारण तुमच्या सर्वांकडून त्याच्या मनाला उभारी मिळाली.
14मी त्याच्याजवळ तुमच्याविषयी जो अभिमान बाळगला त्याबाबतीत तुम्ही मला अपमानित होण्याची वेळ आणली नाही, आम्ही तुमच्याबरोबर सर्व गोष्टी सत्याला स्मरून बोललो, त्याप्रमाणे तीतबरोबर बोलताना आम्ही जो अभिमान व्यक्त केला तो खरा ठरला. 15आदरयुक्त भीतीने कंपित होऊन, त्याचे स्वागत करून आज्ञाधारकपणा तुम्ही सर्वांनी कसा दर्शविला, ह्याची तो आठवण करतो, म्हणून त्याचे तुमच्याविषयीचे प्रेम वृद्धिंगत होत आहे. 16मला सर्व बाबतींत तुमची खातरी वाटते याचा किती हर्ष होत आहे म्हणून सांगू!
सध्या निवडलेले:
2 करिंथ 7: MACLBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र
Copyright © 2018 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.