YouVersion लोगो
सर्च आयकॉन

2 करिंथ 8

8
यरुशलेमच्या गोरगरिबांसाठी निधी
1बंधूंनो, मासेदोनियातील ख्रिस्तमंडळ्यांवर झालेल्या देवाच्या कृपेविषयी आम्ही तुम्हांला कळवू इच्छितो. 2संकटाच्या बिकट परीक्षेत त्यांचा आत्यंतिक आनंद व त्यांचे कमालीचे दारिद्र्य ह्यांमध्ये त्यांची उदंड उदारवृत्ती दिसून आली. 3त्यांनी आपल्या ऐपतीनुसार व ऐपतीपलीकडेही आपण होऊन दान दिले, हे मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगू इच्छितो. 4त्यांनी आमच्याजवळ आग्रहपूर्वक विनंती केली की, यहुदियातील पवित्र जनांची सेवा करण्यात आम्हांला सहकार्य करू देण्याची कृपा व्हावी. 5आम्हांला आशा होती त्यापेक्षा जास्त प्रमाणात त्यांनी प्रथम स्वतःचे समर्पण प्रभूला केले आणि देवाच्या इच्छेनुसार स्वतःस आमच्यासाठीदेखील वाहून घेतले. 6ह्यावरून आम्ही तीतजवळ विनंती केली की, जसा त्याने पूर्वी आरंभ केला होता, त्याप्रमाणे कृपेचे हे कार्य तुमच्यामध्ये पूर्णत्वास न्यावे. 7विश्वास, भाषण, ज्ञान, आत्यंतिक उत्सुकता व आमची तुमच्यावरील प्रीती ह्या सर्वांमध्ये जसे तुम्ही समृद्ध आहा, तसे कृपेच्या ह्या कार्यातही असावे, अशी आमची इच्छा आहे.
प्रभू येशूचे उदाहरण
8मी तुमच्याकरिता आदेश देत नाही, तर दुसऱ्यांच्या कळकळीच्या तुलनेत तुमच्या प्रीतीचा खरेपणा तपासून पाहण्यासाठी मी हे सांगत आहे. 9आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हांला माहीत आहे. तो धनवान असता तुमच्याकरिता गरीब झाला, अशा हेतूने की, त्याच्या गरिबीने तुम्ही धनवान व्हावे.
10तुम्ही गेल्या वर्षी जे कार्य सुरू केले आहे, ते आता पूर्ण करावे, हे तुमच्या हिताचे आहे, असे माझे मत आहे. हे कार्य करण्यासाठी तुम्ही पुढाकार घेतला इतकेच नव्हे तर तशा प्रकारचे कार्य करण्याची इच्छा बाळगण्यातही तुम्ही अग्रेसर होता. 11तर हे कार्य आता पूर्ण करा. ह्यासाठी की, जशी योजना करण्याची उत्सुकता तुम्हाला होती, तशी तुमच्या कुवतीप्रमाणे कार्यसिद्धी व्हावी. 12जर तुम्ही द्यायला उत्सुक असाल, तर देण्यासाठी तुमच्याजवळ जे आहे त्यानुसार, जे नाही त्यानुसार नव्हे, परमेश्वर तुमचे दान स्वीकारील.
13दुसऱ्यांचा भार हलका करण्याकरता तुमच्यावर भार घालावा असे नाही. 14तर हे समानतेने व्हावे म्हणजे प्रस्तुत काळी तुमच्या विपुलतेतून त्यांची गरज भागावी आणि पुढे त्यांच्या विपुलतेतून तुमची गरज भागावी, अशी समानता व्हावी. 15‘ज्याने फार गोळा केले होते, त्याचे अधिक भरले नाही, तसेच ज्याने थोडे गोळा केले होते, त्याचे काही कमी भरले नाही,’ असे धर्मशास्त्रात लिहिले आहे.
तीतची व इतरांची जबाबदारी
16तुम्हांला साहाय्य करण्याच्या बाबतीत तीतच्या मनात तुमच्याविषयी माझ्यासारखीच उत्सुकता उत्पन्न करणाऱ्या देवाचे आभार मानू या. 17कारण तीतने आमचे आवाहन तर मान्य केलेच, पण तो स्वतःच फार उत्सुक असल्यामुळे आपण होऊन तुमच्याकडे यावयास निघाला. 18त्याच्याबरोबर आम्ही एका बंधूला पाठविले आहे. शुभवर्तमान घोषित करण्यासंबंधी ख्रिस्तमंडळ्यांतून त्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे. 19केवळ इतकेच नव्हे तर प्रभूचा गौरव व्हावा व आमची सदिच्छा दिसून यावी म्हणून आम्ही करीत असेलेल्या ह्या कृपेच्या कार्यात आम्हांला प्रवासात सोबत करण्यासाठी ख्रिस्तमंडळ्यांनी त्याची निवड करून त्याला नेमले आहे.
20आम्ही उदारहस्ते करीत असलेल्या कार्यात आमचा हेतू असा आहे की, आम्हांला उदारहस्ते मिळालेल्या ह्या देणगीचा आम्ही कसा विनियोग करतो ह्या बाबतीत आमच्यावर कोणी ठपका ठेवू नये. 21आम्ही प्रभूच्या दृष्टीने जे योग्य, इतकेच नव्हे तर मनुष्याच्याही दृष्टीने जे उचित, ते करण्याची खबरदारी घेतो.
22म्हणून त्यांच्याबरोबर आम्ही आमच्या दुसऱ्या एका बंधूला पाठवीत आहोत. त्याच्या उत्सुकतेची पारख आम्ही पुष्कळ गोष्टींत अनेक वेळा केली आहे आणि आता तुमच्यावर त्याचा फार भरवसा असल्यामुळे तो अधिक उत्सुक आहे. 23तीतविषयी कोणी विचारील, तर तो माझा भागीदार व तुमच्या सेवेत माझा सहकारी आहे. त्यांच्याबरोबर येत असलेल्या आमच्या इतर बांधवांविषयी म्हणाल, तर ते ख्रिस्तमंडळ्यांचे प्रेषित, ख्रिस्ताचे वैभव असे आहेत. 24म्हणून त्यांना तुम्ही तुमच्या प्रीतीचे आणि तुमच्याविषयीच्या आमच्या अभिमानाचे प्रमाण ख्रिस्तमंडळ्यांसमक्ष दाखवा.

सध्या निवडलेले:

2 करिंथ 8: MACLBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन