YouVersion लोगो
सर्च आयकॉन

2 तीमथ्य 4

4
1देवासमक्ष आणि जो ख्रिस्त येशू जिवंतांचा व मृतांचा न्याय करील त्याच्यासमक्ष आणि तो व त्याचे राज्य येणार आहे हे लक्षात घेऊन मी तुला निक्षून आवाहन करतो की, 2शुभसंदेशाची घोषणा कर, तो घोषित करण्याचा आग्रह सुवेळी व अवेळी धर, आत्यंतिक सहनशीलतेने शिक्षण देत खातरी पटवून दे, निषेध कर व प्रोत्साहन दे. 3लोक सुशिक्षण ऐकून घेणार नाहीत, परंतु आपल्याच इच्छेप्रमाणे ऐकण्याची आवड धरणारे बनून आपणाभोवती शिक्षकांची गर्दी जमवतील, 4ते सत्य ऐकण्यापासून फिरतील, व दंतकथांकडे वळतील, अशी वेळ येईल. 5परंतु तू सर्व गोष्टींविषयी सावध रहा, दुःखे सोस, शुभवर्तमान प्रचारकाचे सेवाकार्य कर व तुझ्याकडे सोपविलेली पूर्ण जबाबदारी देवाचा सेवक म्हणून पार पाड.
6आता मी स्वतःचे बलिदान म्हणून अर्पण करावे, अशी वेळ येत आहे, माझा प्रयाणकाळ जवळ आला आहे. 7मी सुयुद्ध लढलो आहे, शर्यत पूर्ण केली आहे, विश्वास राखला आहे. 8आता जे राहिले ते हेच की, माझ्यासाठी देवाबरोबरच्या नीतिमत्त्वाचा मुकुट ठेवला आहे. प्रभू, न्यायप्रिय न्यायाधीश, न्यायाच्या दिवशी तो मुकुट मला देईल. तो केवळ मलाच नव्हे, तर जे त्याच्या प्रकट होण्याची प्रेमाने उत्कंठा बाळगतात, त्या सर्वांनाही देईल.
संदेश व शुभेच्छा
9तू होईल तितके करून माझ्याकडे लवकर ये, 10ऐहिक सुख प्रिय मानून देमास मला सोडून थेस्सलनीकाला गेला. क्रेस्केस गलतीयाला निघून गेला व तीत दालमतियाला गेला. 11लूक मात्र माझ्याजवळ आहे. मार्कला आपल्याबरोबर घेऊन ये, कारण तो सेवाकार्यासाठी मला उपयोगी आहे. 12तुखिक ह्याला मी इफिस येथे पाठविले आहे. 13माझा झगा त्रोवस येथे कार्पजवळ राहिला आहे, तो येताना घेऊन ये आणि पुस्तके, विशेषकरून चर्मपत्रेही आण.
14तांबट आलेक्सांद्र ह्याने मला पुष्कळ त्रास दिला. त्याची फेड त्याच्या कृत्यांप्रमाणे प्रभू करील. 15त्याच्याविषयी तूही जपून राहा; कारण त्याने आपल्या संदेशाला तीव्र विरोध केला होता.
16माझ्या पहिल्या समर्थनाच्या वेळेस मला कोणीही आधार दिला नाही, तर सर्वांनी मला सोडले होते. त्याबद्दल परमेश्वराने त्यांचा हिशेब घेऊ नये. 17परंतु प्रभू माझ्याजवळ उभा राहिला, माझ्याकडून घोषणा पूर्णपणे व्हावी आणि ती सर्व यहुदीतरांनी ऐकावी म्हणून त्याने मला शक्ती दिली आणि त्याने मला मृत्युदंडापासून वाचविले. 18सर्व दुष्ट डावपेचांपासून प्रभू माझा बचाव करील व आपल्या स्वर्गीय राज्यात मला सुरक्षितपणे स्वीकारील. त्याला युगानुयुगे गौरव असो! आमेन. 19प्रिस्का, अक्विला व अनेसिफरच्या कुटुंबीयांना माझ्या शुभेच्छा सांग. 20एरास्त करिंथमध्ये राहिला. त्रफिम आजारी झाला म्हणून मी त्याला मिलेत येथे ठेवून आलो. 21होईल तितके करून हिवाळ्यापूर्वी ये.
युबूल, पुदेस, लीन, क्लौदिया व सर्व बंधू तुला शुभेच्छा कळवितात.
22प्रभू तुमच्या आत्म्याबरोबर राहो. तुम्हांला देवाची कृपा मिळो.

सध्या निवडलेले:

2 तीमथ्य 4: MACLBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन