प्रेषितांचे कार्य 26
26
अग्रिप्पापुढे पौलाने केलेले भाषण
1अग्रिप्पाने पौलाला म्हटले, “तुला स्वतःसाठी बोलावयास परवानगी आहे.” पौलाने हात पुढे करून प्रत्युत्तर केले:
2-3“महाराज अग्रिप्पा, यहुदी लोकांच्या चालीरीती व त्यांच्या वादविषयक बाबी ह्यांत आपण विशेष जाणते आहात आणि यहुदी लोक ज्या गोष्टींविषयी माझ्यावर दोषारोप ठेवतात, त्या सर्वांविषयी मला आज आपणापुढे प्रत्युत्तर करावयाचे आहे, ह्याबद्दल मी स्वतःला धन्य समजतो आणि मी आपल्याला विनंती करतो की, माझे भाषण शांतपणे ऐकून घ्या.
4तरुणपणापासून माझ्या लोकांत व यरुशलेममध्ये माझे वर्तन कसे होते, हे सर्व यहुदी लोकांना माहीत आहे. 5ते पहिल्यापासून मला ओळखतात म्हणून त्यांची इच्छा असल्यास ते साक्ष देतील की, आमच्या धर्माच्या अत्यंत कट्टरपंथाप्रमाणे मी परुशी होतो. 6देवाने आमच्या पूर्वजांना जे वचन दिले त्याची आशा धरल्याबद्दल माझा न्याय व्हावा म्हणून मी आता उभा आहे. 7ते वचन प्राप्त होण्याची आशा बाळगून आमचे बारा वंश, देवाची सेवा रात्रंदिवस एकाग्रतेने करत आहेत. महाराज, मी तीच आशा बाळगल्याबद्दल माझ्यावर यहुदी लोकांनी आरोप ठेवला आहे. 8देव मेलेल्यांना उठवतो हे तुमच्यापैकी कित्येकांना अविश्वसनीय का वाटावे?
9मलाही असे वाटत असे की, नासरेथकर येशूच्या नावाविरुद्ध पुष्कळ गोष्टी कराव्यात 10आणि तसे मी यरुशलेममध्ये केलेसुद्धा. मी मुख्य याजकांकडून अधिकार मिळवून पुष्कळ पवित्र जनांना तुरुंगात टाकले आणि त्यांचा वध होत असताना मी संमती दिली. 11सभास्थानात वारंवार शासन करून मी त्यांना देवनिंदा करावयास लावण्याचा प्रयत्न करीत असे. त्यांच्यावर अतिशय क्रोधाविष्ट होऊन परक्या शहरांपर्यंतदेखील मी त्यांचा पाठलाग करत असे.
12हाच हेतू साध्य करण्याकरिता मुख्य याजकांकडून आदेश व अधिकारपत्र मिळवून, मी दिमिष्ककडे जात होतो. 13तेव्हा महाराज, वाटेवर मध्यान्हसमयी सूर्याच्या तेजापेक्षा प्रखर असा प्रकाश आकाशातून माझ्या व माझ्याबरोबर चालणाऱ्या माणसांच्या सभोवती चकाकताना मी पाहिला. 14आम्ही सर्व जमिनीवर पडलो. इतक्यात हिब्रू भाषेत माझ्याबरोबर बोलताना मी अशी वाणी ऐकली, ‘शौल, शौल, माझा छळ का करतोस? पराणीवर लाथ मारून तू स्वतःलाच इजा करून घेतोस!’ 15मी म्हटले, ‘प्रभो, तू कोण आहेस?’ प्रभू म्हणाला, ‘ज्या येशूचा तू छळ करतोस, तोच मी आहे. 16तर ऊठ व आपल्या पायांवर उभा राहा, मी तुला एवढ्यासाठी दर्शन दिले आहे की, तू जे माझ्याविषयी पाहिले आहे व ज्याबाबत मी तुला दर्शन देणार आहे, त्याचा सेवक व साक्षीदार असे तुला नेमावे. 17इस्राएली लोकांपासून व यहुदीतरांपासून मी तुझे रक्षण करीन. 18त्यांनी अंधारातून उजेडाकडे व सैतानाच्या सत्तेखालून देवाकडे वळावे म्हणून तू त्यांचे डोळे उघडावे आणि त्यांच्या पापांची क्षमा व्हावी व माझ्यावरील विश्वासाने पवित्र झालेल्या लोकांमध्ये वतन मिळावे ह्यासाठी मी तुला त्यांच्याकडे पाठवतो.’
19म्हणून महाराज, अग्रिप्पा, मी त्या स्वर्गीय दृष्टान्ताचा अवमान केला नाही 20तर प्रथम दिमिष्क, यरुशलेम आणि नंतर अवघ्या यहुदियात व परराष्ट्रीय लोकांत मी उपदेश करीत फिरलो की, पश्चात्ताप करा आणि पश्चात्तापास शोभतील अशी कृत्ये करून देवाकडे वळा. 21ह्या कारणामुळे यहुदी मला मंदिरात धरून ठार मारावयास पाहत होते. 22तथापि देवाकडून साहाय्य प्राप्त झाल्यामुळे मी आजपर्यंत लहानमोठ्यांना साक्ष देत आहे आणि ज्या गोष्टी होणार आहेत म्हणून संदेष्ट्यानी व मोशेने सांगितले त्यांखेरीज मी दुसरे काही सांगत नाही, 23त्या अशा की, ख्रिस्ताने दुःख सोसावे आणि त्यानेच मेलेल्यांतून उठणाऱ्यांपैकी पहिला होऊन आमच्या लोकांना व यहुदीतरांनाही तारणाचा प्रकाश प्रकट करावा.”
24ह्याप्रमाणे तो प्रत्युत्तर करत असता फेस्त ओरडून म्हणाला, “पौल, तू वेडा आहेस! अतिशिक्षण मिळवल्यामुळे तुझे डोके फिरले आहे!”
25पौल म्हणाला, “फेस्त महाराज, मी वेडा नाही, तर मी सत्याच्या व सुज्ञपणाच्या गोष्टी बोलत आहे. 26ह्या गोष्टी महाराज अग्रिप्पा ह्यांना ठाऊक आहेत, त्यांच्यासमोर मी मनमोकळेपणे बोलतो. ह्यांतले त्यांच्यापासून काही गुप्त नाही अशी माझी खातरी आहे; कारण हे एखाद्या कोपऱ्यात घडलेले नाही. 27महाराज अग्रिप्पा, संदेष्ट्यांवर आपला विश्वास आहे ना? विश्वास आहे, हे मला ठाऊक आहे.”
28अग्रिप्पाने पौलाला म्हटले, “मी ख्रिस्ती व्हावे म्हणून तू अल्पावधीत माझे मन वळवितोस काय?”
29पौल म्हणाला, “अल्पावधी किंवा दीर्घकाळ, कसेही असो केवळ आपणच नव्हे, तर आज हे जे सर्व माझे भाषण ऐकत आहेत त्यांनी माझ्या बेड्यांखेरीज इतर बाबतीत माझ्यासारखे व्हावे अशी देवाजवळ माझी प्रार्थना आहे.”
30त्यानंतर राजा, राज्यपाल, बर्णीका व त्यांच्याबरोबर जे बसले होते ते उठले 31आणि एकीकडे जाऊन आपापसात म्हणाले, “ह्या माणसाने मरणास किंवा तुरुंगवासास पात्र असे काही केले नाही.” 32अग्रिप्पाने फेस्तला म्हटले, “ह्या माणसाने कैसरजवळ न्याय मागितला नसता, तर त्याला सोडून देता आले असते.”
सध्या निवडलेले:
प्रेषितांचे कार्य 26: MACLBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र
Copyright © 2018 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.