प्रकटी 14
14
कोकरू व त्याची प्रजा
1नंतर कोकरू सीयोन डोंगरावर उभे राहिलेले माझ्या दृष्टीस पडले. त्याचे व त्याच्या पित्याचे नाव कपाळावर लिहिलेले एक लक्ष चव्वेचाळीस हजार लोक त्याच्याबरोबर होते. 2अनेक जलप्रवाहांच्या निनादासारखी व प्रचंड मेघगर्जनेच्या ध्वनीसारखी स्वर्गातून निघालेली वाणी मी ऐकली. जी वाणी मी ऐकली, ती जणू काही वीणा वाजविणारे आपल्या वीणा वाजवीत आहेत, अशी होती. 3ते एक लक्ष चव्वेचाळीस हजार लोक राजासन, चार प्राणी व वडीलजन ह्यांच्यासमोर एक नवे गीत गात होते. ते गीत ह्यांच्याशिवाय कोणीही शिकू शकले नाहीत. पृथ्वीवरील सर्व लोकांपैकी ह्यांचेच तारण झाले आहे. 4स्त्री संभोग टाळून शुद्ध राहिलेले ते हेच आहेत, ते ब्रह्मचर्य पाळणारे आहेत. जेथे कोठे कोकरू जाते, तेथे त्याच्यामागे जाणारे ते आहेत. ते देवासाठी व कोकरासाठी प्रथम फळ असे माणसांतून विकत घेतलेले आहेत. 5त्यांच्या तोंडांत असत्य आढळले नाही, ते निष्कलंक आहेत.
तीन देवदूतांचे संदेश
6नंतर मी दुसरा एक देवदूत अंतराळात उडताना पाहिला, त्याच्याजवळ पृथ्वीवर राहणाऱ्यांस म्हणजे सर्व राष्ट्रे, वंश, भाषा बोलणारे आणि लोक ह्यांना सांगावयास शाश्वत शुभवर्तमान होते. 7तो उच्च स्वरात म्हणाला, “देवाची भीती बाळगा व त्याचा गौरव करा, कारण न्यायनिवाडा करावयाची त्याची घटका आली आहे. ज्याने आकाश, पृथ्वी, समुद्र व पाण्याचे झरे निर्माण केले, त्याची आराधना करा.”
8त्या देवदूतामागून दुसरा देवदूत येऊन म्हणाला, “तिचे पतन झाले! महान बाबेलचे पतन झाले! तिने आपल्या जारकर्माबद्दलचा क्रोधरूपी द्राक्षारस सर्व राष्ट्रांना प्यायला लावला.”
9त्याच्यामागून तिसरा देवदूत येऊन मोठ्याने म्हणाला, “जो कोणी श्वापदाची व त्याच्या मूर्तीची आराधना करतो आणि आपल्या कपाळावर किंवा आपल्या हातावर त्याची खूण करून घेतो, 10तोही देवाच्या क्रोधाच्या प्याल्यात भरपूर प्रमाणात ओतलेला त्याचा क्रोधरूपी द्राक्षारस पिईल आणि हे करणाऱ्यांना पवित्र देवदूतांसमक्ष व कोकरांसमक्ष अग्नी व गंधक ह्यापासून पीडा होईल. 11त्यांच्या पीडेचा धूर युगानुयुगे वर येतो आणि जे श्वापदाची व त्याच्या मूर्तीची आराधना करतात, आणि जे कोणी त्याच्या नावाची खूण धारण करतात, त्यांना रात्रंदिवस विश्रांती मिळत नाही.
12म्हणूनच देवाच्या आज्ञा पाळणारे व येशूवरील विश्वासाला धरून राहणारे पवित्र जन ह्यांच्याकडून सहनशीलतेची अपेक्षा केली जाते.”
13तेव्हा स्वर्गातून झालेली वाणी मी ऐकली, ती म्हणाली, “लिही, प्रभूमध्ये मरणारे आत्तापासून धन्य आहेत.” आत्मा म्हणतो, “खरेच, आपल्या कष्टांपासून सुटून त्यांना विसावा मिळेल कारण त्यांची कृत्ये त्यांच्याबरोबर जातात.”
हंगाम व कापणीची वेळ
14नंतर मी पाहिले तेव्हा पांढरा मेघ व त्या मेघावर बसलेला मनुष्याच्या पुत्रासारखा कोणी एक दृष्टीस पडला. त्याच्या मस्तकावर सोन्याचा मुकुट व त्याच्या हाती तीक्ष्ण धारेचा विळा होता. 15त्यानंतर आणखी एक देवदूत मंदिरातून निघून, जो मेघावर बसला होता, त्याला उच्च स्वरात म्हणाला, “तू आपला विळा चालवून कापणी कर कारण कापणीची वेळ आली आहे. पृथ्वीचे पीक तयार आहे.” 16त्यानंतर मेघावर बसलेल्याने आपला विळा पृथ्वीवर चालविला आणि पृथ्वीची कापणी झाली.
17मग आणखी एक देवदूत स्वर्गातील मंदिरातून निघाला, त्याच्याजवळही तीक्ष्ण धारेचा विळा होता.
18ज्याला अग्नीवर अधिकार आहे, असा दुसरा एक देवदूत वेदीतून निघाला. त्याने ज्याच्याजवळ तीक्ष्ण धारेचा विळा होता त्याला उच्च वाणीने म्हटले, “तू आपला तीक्ष्ण धारेचा विळा चालवून पृथ्वीच्या द्राक्षवेलीचे घड तोडून घे. तिची द्राक्षे पिकली आहेत!” 19तेव्हा त्या देवदूताने आपला विळा पृथ्वीवर चालविला आणि पृथ्वीच्या द्राक्षवेलीचे घड तोडून देवाच्या क्रोधाच्या मोठ्या द्राक्षकुंडात टाकले. 20ते द्राक्षकुंड नगराबाहेर तुडविले गेले, त्यातून रक्त वाहू लागले, त्याचा प्रवाह सुमारे दोन मीटर खोल असून तो सुमारे तीनशे किलोमिटर वाहत गेला.
सध्या निवडलेले:
प्रकटी 14: MACLBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र
Copyright © 2018 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.