प्रकटी 15
15
सात वाट्या आणि पीडा
1त्यानंतर मी अत्यंत रहस्यमय, थक्क करणारे व भव्य असे दुसरे एक दृश्य स्वर्गात पाहिले. सात साथीचे रोग आणणारे सात देवदूत दृष्टीस पडले. ते रोग शेवटचे होते, कारण देवाच्या क्रोधाची ती अंतिम अभिव्यक्ती होती.
2मग अग्निमिश्रित काचेच्या समुद्रासारखे काहीतरी माझ्या दृष्टीस पडले. श्वापदावर, त्याच्या मूर्तीवर व त्याच्या नामसंख्येवर जय मिळविलेले लोक हातात देवाने दिलेल्या वीणा घेऊन त्या काचेच्या समुद्रावर उभे राहिलेले माझ्या दृष्टीस पडले. 3ते देवाचा दास मोशे ह्याचे गीत व कोकराचे गीत गाताना म्हणत होते:
“हे प्रभू देवा, हे सर्वसमर्था,
तुझी कृत्ये किती थोर व आश्चर्यकारक आहेत!
हे राष्ट्राधिपते, तुझे मार्ग न्याय्य व सत्य आहेत.
4हे प्रभो, तुला कोण भिणार नाही?
तुझ्या नावाला कोण महिमा देणार नाही?
तूच एकमेव पवित्र आहेस.
सर्व राष्ट्रे तुझ्यासमोर येऊन
तुझी आराधना करतील,
कारण तुझी न्याय्य कृत्ये
प्रकट झाली आहेत.”
5नंतर मी पाहिले, तेव्हा परमेश्वराच्या उपस्थितीच्या मंडपामध्ये असलेले स्वर्गातील मंदिर उघडले 6आणि स्वच्छ व तेजस्वी तागाची वस्त्रे परिधान केलेले व छातीवर सोन्याचे पट्टे बांधलेले असे, सात पीडा घेतलेले ते सात देवदूत त्या मंदिरातून निघाले. 7त्या चार प्राण्यांपैकी एकाने युगानुयुगे जिवंत असणाऱ्या देवाच्या क्रोधाने भरलेल्या सोन्याच्या सात वाट्या त्या सात देवदूतांस दिल्या. 8तेव्हा देवाचे वैभव व सामर्थ्य ह्यांपासून निघालेल्या धुराने मंदिर भरून गेले आणि त्या सात देवदूतांच्या सात पीडा संपेपर्यंत कोणालाही मंदिरात जाता आले नाही.
सध्या निवडलेले:
प्रकटी 15: MACLBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र
Copyright © 2018 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.