1 थेस्सलनीकाकरांस 4
4
परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी जगणे
1प्रिय बंधू आणि भगिनींनो, इतर गोष्टीसंबंधाने आम्ही तुम्हाला आज्ञा केली होती की परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी कसे जीवन जगावे आणि ते तुम्ही जगतच आहात आणि आता आम्ही तुम्हाला सांगतो व प्रभू येशूंमध्ये विनंती करतो की तुम्ही अधिकाधिक वाढ करावी. 2आता प्रभू येशूंच्या अधिकाराने आम्ही तुम्हाला कोणते निर्देश दिले होते हे तुम्हास माहीत आहेत.
3परमेश्वराची ही इच्छा आहे की तुम्ही पवित्र असावे आणि लैंगिक अनैतिकता यापासून स्वतःला दूर ठेवावे. 4आपले शरीर पवित्र आणि सन्माननीय आहे हे लक्षात ठेऊन तुम्हातील प्रत्येकाने स्वतःच्या शरीरावर ताबा ठेवण्यास शिकावे.#4:4 किंवा आपल्या स्वतःच्या पत्नीसोबत राहण्यास शिका 5जे परमेश्वराला ओळखत नाहीत अशा गैरयहूदीयांप्रमाणे कामवासनेच्या लालसेने नव्हे; 6आणि या गोष्टीसंबंधात कोणीही आपल्या बंधू किंवा भगिनींचे अयोग्य करून गैरफायदा घेऊ नये. याबद्दल आम्ही तुम्हाला आधी सांगून ठेवले होते व इशारा दिला होता की असे पाप करणार्यांना प्रभू शिक्षा देतील. 7कारण परमेश्वराने आपल्याला अपवित्रतेसाठी नव्हे, तर पवित्र जीवन जगण्यासाठी पाचारण केले आहे. 8यास्तव, जो कोणी या निर्देशाचा तिरस्कार करतो, तो मनुष्यांचा नव्हे परंतु ज्या परमेश्वराने आपल्याला पवित्र आत्मा दिला आहे त्या परमेश्वराचा तिरस्कार करतात.
9एकमेकांवर प्रीती करण्याविषयी तुम्हाला काही लिहिण्याची गरज नाही, कारण एकमेकांवर प्रीती करावी हे स्वतःच तुम्ही परमेश्वरापासून शिकला आहात. 10आणि वास्तविक, मासेदोनिया प्रांतातील परमेश्वराच्या सर्व कुटुंबावर तुम्ही प्रीती करीत आहात. तरी बंधू आणि भगिनींनो आम्ही विनंती करतो, ती अधिकाधिक करावी. 11शांतीने जीवन जगणे, आपल्या व्यवसायात मग्न असणे आणि स्वतःच्या हाताने काम करणे हे तुमचे ध्येय असू द्या, 12म्हणजे तुमचे दैनंदिन जीवन बाहेरील लोकांच्या सन्मानास पात्र ठरेल आणि तुम्हाला कोणावरही अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही.
मरण पावलेले विश्वासणारे
13बंधू आणि भगिनींनो, जे मरणामध्ये झोपी गेले आहेत, त्यांच्याविषयी तुम्ही अजाण नसावे, अशी आमची इच्छा आहे, यासाठी की ज्यांना आशा नाही अशा इतर मनुष्यासारखा आपण खेद करू नये. 14कारण येशू मरण पावले आणि पुन्हा जिवंत झाले, असा आपला विश्वास आहे, त्याअर्थी येशूंमध्ये झोपी गेले आहेत त्यांना परमेश्वर माघारी आणतील यावर आपण विश्वास ठेवतो. 15स्वतः प्रभू येशूंच्या वचनाप्रमाणे मी तुम्हाला सांगतो की आपण जे जिवंत आहोत आणि प्रभूच्या आगमनासमयी जिवंत असू, ते प्रभूला भेटण्यासाठी, जे आपल्यापूर्वी मरण पावले आहेत, त्यांच्या आधी, वर घेतले जाणार नाही. 16कारण प्रभू स्वतःच आज्ञा करणार्या मोठ्या ध्वनीने, प्रधान दूताच्या वाणीने आणि परमेश्वराच्या तुतारीच्या आवाजाने स्वर्गातून खाली उतरतील. मग ख्रिस्तामध्ये जे मरण पावले आहेत, ते प्रथम उठतील. 17त्यानंतर, जे आपण अजून जिवंत आहोत आणि मागे राहिलेले आहोत, असे सर्वजण मेघारूढ होऊन प्रभूला भेटण्यासाठी अंतराळात घेतले जाऊ आणि प्रभूजवळ सदासर्वकाळ राहू. 18या वचनांद्वारे परस्परांना प्रोत्साहन द्या.
सध्या निवडलेले:
1 थेस्सलनीकाकरांस 4: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.