1 थेस्सलनीकाकरांस 5
5
प्रभूचा दिवस
1आता, बंधू आणि भगिनींनो, वेळ आणि घटका याविषयी तुम्हाला लिहिण्याची गरज नाही, 2कारण तुम्हाला हे पक्के ठाऊक आहे की जसा चोर रात्री येतो तसा प्रभूचा दिवस येईल. 3“शांतता आणि सुरक्षितता,” असे लोक म्हणत असतानाच, ज्याप्रमाणे गर्भवती स्त्रीला प्रसूती वेदना होतात, त्याचप्रमाणे त्यांच्यावर अचानक नाश ओढवेल आणि त्यातून ते सुटणार नाहीत.
4परंतु बंधू आणि भगिनींनो, तुम्ही अंधारात असू नये जेणे करून हा दिवस तुम्हाला अचानक येणाऱ्या चोरासारखा चकित करेल. 5परंतु बंधू आणि भगिनींनो, तुम्ही सर्व प्रकाशाची व दिवसाची मुले आहात. आम्ही रात्रीचे किंवा अंधकाराचे नाही. 6आपण झोपी गेलेल्या सारखे असू नये, परंतु जागृत आणि शुद्धीवर असलेले असावे. 7झोप घेणारे, रात्री झोपतात, मद्य पिणारे, रात्री मद्य पितात. 8परंतु जे आपण दिवसाचे आहोत, ते आपण संयमी असावे, विश्वास आणि प्रीतीचे चिलखत धारण करावे आणि तारणाची आशा हे शिरस्त्राण धारण करावे. 9क्रोध सहन करावा म्हणून परमेश्वराने आपली निवड केली नाही, तर प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आपले तारण व्हावे म्हणून केली आहे. 10ते आपल्यासाठी मरण पावले, यासाठी की आपण जागे असलो किंवा झोपेत असलो तरी त्याच्याबरोबर जिवंत राहावे. 11म्हणून तुम्ही आता जे करीत आहात त्याचप्रमाणे एकमेकांना प्रोत्साहन द्या आणि एकमेकांची वुद्धी करण्यासाठी झटा.
अंतिम बोध
12बंधू आणि भगिनींनो, तुम्हाला सांगतो की जे तुम्हामध्ये परिश्रम करतात, जे प्रभूमध्ये तुमची काळजी घेतात आणि तुम्हाला बोध करतात त्यांचा मान राखा. 13त्यांच्या कार्यामुळे त्यांना प्रीतीने सर्वोच्च मान द्या, एकमेकांबरोबर शांतीने राहा. 14बंधू आणि भगिनींनो, आम्ही तुम्हाला विनंती करतो की जे आळशी आणि लुडबुड करणारे आहेत त्यांना ताकीद द्या, जे निराश आहेत त्यांना उत्तेजन द्या, अशक्तांना आधार द्या, प्रत्येकाशी सहनशीलतेने वागा. 15कोणी वाईटाची फेड वाईटाने करणार नाही याची काळजी घ्या, परंतु प्रत्येकाचे आणि सर्वांचे सर्वदा चांगले करण्यासाठी झटा.
16सर्वदा आनंदित राहा, 17निरंतर प्रार्थना करा, 18सर्व परिस्थितीत उपकारस्मरण करा, कारण ख्रिस्त येशूंमध्ये तुमच्यासाठी परमेश्वराची इच्छा हीच आहे.
19पवित्र आत्म्याला विझवू नका. 20संदेशाला तुच्छ मानू नका. 21परंतु त्या सर्वांची परीक्षा करा; जे चांगले आहे ते धरून ठेवा, 22सर्वप्रकारच्या वाईटाचा निषेध करा.
23परमेश्वर स्वतः जे शांतीचे परमेश्वर आहेत, ते तुम्हाला परिपूर्णतेने पवित्र करोत. आपले प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत तुमचा पूर्ण आत्मा, जीव आणि शरीर निर्दोष राखली जावोत. 24ज्यांनी तुम्हाला पाचारण केले आहे ते विश्वासू आहेत आणि ते करतीलच.
25बंधू आणि भगिनींनो, आमच्यासाठी प्रार्थना करा.
26परमेश्वराच्या सर्व लोकांचे पवित्र चुंबनाने अभिवादन करा.
27हे पत्र सर्व बंधू आणि भगिनींना वाचून दाखवावे, अशी मी तुम्हाला प्रभूसमोर आज्ञा करतो.
28आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हावर असो.
सध्या निवडलेले:
1 थेस्सलनीकाकरांस 5: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.