2 इतिहास 28
28
यहूदीयाचा राजा आहाज
1वयाच्या वीसाव्या वर्षी आहाज राजा झाला आणि त्याने यरुशलेममध्ये सोळा वर्षे राज्य केले. त्याचे पिता दावीदाने केले त्याप्रमाणे, याहवेहच्या दृष्टीने जे योग्य ते त्याने केले नाही. 2त्याने इस्राएलच्या राजांच्या मार्गांचे अनुसरण केले आणि पूजा करण्यासाठी बआल दैवतांच्या मूर्तीसुद्धा बनविल्या. 3त्याने बेन हिन्नोमच्या खोऱ्यात बलिदानांचे यज्ञ केले आणि त्याच्या लेकरांचे अग्नीत अर्पण केले, राष्ट्रांच्या ज्या अमंगळ प्रथा याहवेहने इस्राएल लोकांतून काढून टाकल्या होत्या त्यात तो गुंतला. 4त्याने डोंगरावर, टेकड्यांवर आणि प्रत्येक घनदाट वृक्षाखाली यज्ञार्पणे केली आणि धूप जाळला.
5त्यामुळेच त्याचे परमेश्वर याहवेहनी त्याला अरामच्या राजाच्या हाती सोपविले. अरामी लोकांनी त्याचा पराभव केला आणि त्याच्या अनेक लोकांना कैद करून दिमिष्क येथे आणले.
त्याला इस्राएलच्या राजाच्या हातीही सोपविले, ज्याने त्याला भारी हानी पोहोचविली. 6रमाल्याह याचा पुत्र पेकहने एका दिवसात यहूदीयामधील एक लाख वीस हजार सैनिकांना ठार केले—कारण यहूदीयाच्या लोकांनी त्यांच्या पूर्वजांचे परमेश्वर याहवेहचा त्याग केला होता. 7एफ्राईम येथील योद्धा जिक्रीने राजाचा पुत्र मासेयाह, राजवाड्याचा प्रभारी अधिकारी अज्रीकाम आणि राजाच्या नंतरचा सर्वात उच्चाधिकारी एलकानाह यांना ठार मारले. 8इस्राएली लोकांनी यहूदीया येथून आलेल्या त्यांच्या बंधूइस्राएली लोकांमधून दोन लाख स्त्रिया, पुत्र आणि कन्यांना कैद केले. त्यांनी पुष्कळ लूट घेतली व ती शोमरोनला नेली.
9परंतु ओदेद नावाचा याहवेह यांचा एक संदेष्टा तिथे होता आणि जेव्हा सैन्य शोमरोनकडे परत आले, तेव्हा तो त्यांची भेट घेण्यासाठी निघाला. तो त्यांना म्हणाला, “तुमच्या पूर्वजांचे परमेश्वर याहवेह यहूदीयावर रागावले होते म्हणून त्यांनी त्यांना तुमच्या हाती दिले. परंतु इतक्या क्रोधाने तुम्ही त्यांची कत्तल केली आहे की, त्याचे पडसाद स्वर्गापर्यंत पोहोचले. 10आणि आता तुमचा असा उद्देश आहे की, यहूदीया आणि यरुशलेममधील स्त्री-पुरुषांना तुमचे गुलाम बनवावे. परंतु तुमचे परमेश्वर याहवेह यांच्याविरुद्ध केलेल्या पापाबद्दल तुम्हीदेखील दोषी नाहीत का? 11आता माझे ऐका! तुम्ही कैदी म्हणून आणलेल्या तुमच्या सहइस्राएली लोकांना परत पाठवा, कारण याहवेहचा क्रोधाग्नी तुमच्यावर भडकलेला आहे.”
12नंतर एफ्राईममधील काही पुढारी—यहोहानानचा पुत्र अजर्याह, मेशिल्लेमोथचा पुत्र बेरेख्याह, शल्लूमचा पुत्र यहिज्कीयाह आणि हदलैचा पुत्र अमासा—यांनी जे युद्धातून परत येत होते त्यांचा सामना केला. 13ते म्हणाले, “तुम्ही त्या कैद्यांना इकडे आणू नये, नाहीतर याहवेहसमोर आपण दोषी ठरले जाऊ. आपल्या पापामध्ये आणि दोषामध्ये आणखी भर घालण्याचा तुमचा विचार आहे काय? कारण आधीच आमचे पाप मोठे आहे आणि त्यांचा क्रोधाग्नी आम्हा इस्राएलींवर भडकलेला आहे.”
14त्यामुळे शिपायांनी अधिकारी आणि जमलेल्या सर्व मंडळीच्या उपस्थितीत लूट आणि कैदींना सोडून दिले. 15ज्या माणसांची नेमणूक करण्यात आली होती, त्यांनी कैद्यांना घेतले आणि जे वस्त्रहीन होते त्या सर्वांना कपडे घातले. त्यांनी त्यांना कपडे आणि पायताणे, अन्न आणि पेय आणि बरे होण्यासाठी मलम हे सर्व दिले. जे अशक्त होते त्या सर्वांना त्यांनी गाढवावर बसविले. तेव्हा ते त्यांना त्यांच्या इस्राएली बांधवांकडे यरीहो, खजुरीचे नगर येथे घेऊन गेले आणि ते शोमरोनकडे परत आले.
16त्यावेळेस आहाज राजाने अश्शूरच्या राजांकडे मदतीसाठी बोलाविणे पाठविले होते. 17एदोमी लोक पुन्हा आले होते आणि त्यांनी यहूदीयावर हल्ला केला आणि कैद्यांना पळवून नेले. 18त्यावेळेस पलिष्ट्यांनी डोंगर पायथ्याशी असलेल्या नगरांवर आणि यहूदीयाच्या नेगेवमधील गावांवर हल्ला केला. त्यांनी बेथ-शेमेश, अय्यालोन आणि गदेरोथ, तसेच सोकोह, तिम्नाह आणि गिम्झो आणि त्यांच्या आजूबाजूची गावे काबीज केली. 19इस्राएलचा राजा आहाजमुळे याहवेहनी यहूदीयाला नम्र केले होते, कारण त्याने यहूदीयामध्ये दुष्टमार्गाला चालना दिली होती आणि तो याहवेहबरोबर अत्यंत अविश्वासू राहिला. 20अश्शूरचा राजा तिग्लथ-पिलेसर#28:20 तिग्लथ-पिलेसर याला तिग्लथ-पिल्नेसर म्हणूनही ओळखले जाते त्याच्याकडे आला, परंतु त्याने त्याला मदत करण्याऐवजी त्याला त्रास दिला. 21आहाज राजाने याहवेहच्या मंदिरातून आणि राजवाड्यातून आणि अधिकाऱ्यांकडून काही वस्तू घेतल्या आणि अश्शूरच्या राजाला भेट म्हणून दिल्या, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही.
22त्याच्या संकटकाळात राजा आहाज याहवेहबरोबर आणखीच अविश्वासू झाला. 23त्याने दिमिष्कच्या दैवतांना बलिदान केले, ज्यांनी त्याचा पराभव केला होता; कारण त्याला वाटले, “अरामच्या राजांच्या दैवतांनी त्यांना मदत केली म्हणून मी त्यांना बलिदान करेन म्हणजे ते मला मदत करतील.” परंतु तेच त्याचे आणि सर्व इस्राएलचे पतन होण्याचे कारण होते.
24आहाजाने परमेश्वराच्या मंदिरातील इतर वस्तू एकत्र केल्या आणि कापून त्याचे तुकडे केले. त्याने याहवेहच्या मंदिराचे दरवाजे बंद केले आणि यरुशलेममधील प्रत्येक रस्त्याच्या कोपऱ्यात वेद्या बसविल्या. 25यहूदीयामधील प्रत्येक गावात त्याने इतर दैवतांना बलिदाने अर्पिण्यासाठी उच्च स्थाने बांधली आणि याहवेहच्या, त्याच्या पूर्वजांच्या परमेश्वराच्या रागाला चेतावणी दिली.
26त्याच्या राज्यकाळातील इतर घटना आणि त्याचे सर्व मार्ग, सुरुवातीपासून शेवटपर्यंत, यहूदीया आणि इस्राएलच्या राजांच्या पुस्तकात लिहिलेल्या आहेत. 27आहाज आपल्या पूर्वजांबरोबर विसावा पावला आणि त्याला यरुशलेम शहरात पुरण्यात आले, परंतु त्याला इस्राएलच्या राजांच्या कबरेत ठेवण्यात आले नाही. त्याचा पुत्र हिज्कीयाह त्याचा वारस म्हणून राजा झाला.
सध्या निवडलेले:
2 इतिहास 28: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.