2 इतिहास 29
29
हिज्कीयाह मंदिराचे शुद्धीकरण करतो
1वयाच्या पंचवीसाव्या वर्षी हिज्कीयाह राजा झाला आणि त्याने यरुशलेममध्ये एकोणतीस वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव अबीयाह, ती जखर्याहची कन्या होती. 2त्याने आपला पिता दावीदाप्रमाणे याहवेहच्या दृष्टीने जे योग्य ते केले.
3त्याच्या राज्यकाळाच्या पहिल्या वर्षाच्या पहिल्या महिन्यात, त्याने याहवेहच्या मंदिराचे दरवाजे उघडले आणि त्यांची दुरुस्ती केली. 4त्याने याजकांना आणि लेवींना आणले आणि त्यांना पूर्व बाजूला असलेल्या चौकात एकत्र जमविले. 5आणि म्हणाला: “लेवींनो, माझे ऐका! आता तुम्ही स्वतःला पवित्र करा आणि याहवेह तुमच्या पूर्वजांचे परमेश्वर यांचे मंदिर पवित्र करा. सर्व अशुद्धता या पवित्रस्थानातून काढून टाका. 6आमचे पालक अविश्वासू होते; त्यांनी याहवेह आमच्या परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते केले आणि त्यांचा त्याग केला. त्यांनी याहवेहच्या निवासस्थानापासून त्यांचे मुख फिरविले आणि त्यांच्याकडे पाठ फिरविली. 7त्यांनी अंगणाचे दरवाजे बंद केले आणि दिवे विझविले. त्यांनी धूप जाळला नाही किंवा त्या पवित्रस्थानात इस्राएलच्या परमेश्वराला कोणतेही होमार्पण दिले नाही. 8त्यामुळेच याहवेहचा क्रोध यहूदीया आणि यरुशलेम यांच्यावर आला आहे; त्यांनी त्यांना भयप्रद व दहशत निर्माण करणारे आणि तिरस्काराचा विषय असे केले आहे, जसे तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहू शकता. 9याकारणामुळेच आपले पूर्वज तलवारीने मारले गेले आणि आपले पुत्र आणि कन्या आणि आपल्या स्त्रिया बंदिवासात ठेवलेल्या आहेत. 10आता मी या उद्देशाने इस्राएलचे परमेश्वर याहवेह यांच्याशी एक करार करतो की, जेणेकरून त्यांचा भयंकर क्रोध आपल्यापासून दूर होईल. 11माझ्या मुलांनो, आता निष्काळजी राहू नका, कारण याहवेहनी तुम्हाला त्यांच्यासमोर उभे राहण्यासाठी आणि त्यांची सेवा करण्यासाठी, त्यांचे सेवक होण्यासाठी आणि धूप जाळण्यासाठी निवडले आहे.”
12तेव्हा या लेवीय लोकांनी कामास सुरुवात केली:
कोहाथी वंशातील:
अमासय याचा पुत्र महथ आणि अजऱ्याह याचा पुत्र योएल;
मरारी वंशातील:
अब्दीचा पुत्र कीश आणि यहल्लेलेलाचा पुत्र अजर्याह;
गेर्षोनी वंशातील:
जिम्माहचा पुत्र योवाह आणि यवाहाचा पुत्र एदेन;
13एलीजाफानच्या वंशातील:
शिम्री आणि ईयेल;
आसाफाच्या वंशातील:
जखर्याह आणि मत्तन्याह;
14हेमानच्या वंशातील:
यहीएल आणि शिमी;
यदूथूनच्या वंशातील:
शमायाह आणि उज्जीएल.
15जेव्हा त्यांनी त्यांच्याबरोबर असलेल्या लेवींना एकत्र जमविले आणि त्यांनी स्वतःला पवित्र केले, तेव्हा ते याहवेहच्या वचनाचे पालन करून, राजाज्ञेनुसार याहवेहच्या मंदिराचे शुद्धीकरण करण्यासाठी मंदिरात गेले. 16याजक याहवेहच्या पवित्रस्थानात त्याचे शुद्धीकरण करण्यासाठी आत गेले. त्यांना याहवेहच्या मंदिरात जे काही अशुद्ध सापडले ते सर्व त्यांनी याहवेहच्या मंदिराच्या अंगणात आणले. लेव्यांनी ते घेतले आणि किद्रोन खोऱ्याकडे नेऊन फेकले. 17पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवसापासून त्यांनी शुद्धीकरण सुरू केले आणि पहिल्या महिन्याच्या आठव्या दिवशी ते याहवेहच्या मंदिराजवळ पोहोचले. आणखी आठ दिवस त्यांनी पहिल्या महिन्याच्या सोळाव्या दिवशी काम पूर्ण करून याहवेहचे मंदिर पवित्र केले.
18मग ते हिज्कीयाह राजाकडे गेले आणि त्यांनी अहवाल दिला: “आम्ही याहवेहचे संपूर्ण मंदिर, होमार्पणाची वेदी आणि त्यातील सर्व भांडी आणि पवित्र भाकर ठेवण्यासाठी असलेला मेज, त्याच्या सर्व वस्तू शुद्ध केल्या आहेत. 19राजा आहाज राजा असताना त्यांच्या अविश्वासूपणामध्ये त्यांनी काढून टाकलेल्या सर्व वस्तू आम्ही तयार केल्या आहेत आणि पवित्र केल्या आहेत. त्या सर्व वस्तू आता याहवेहच्या वेदीसमोर आहेत.”
20दुसऱ्याच दिवशी पहाटेच्या वेळेस राजा हिज्कीयाहने शहरातील अधिकाऱ्यांना एकत्र केले आणि तो याहवेहच्या मंदिरात गेला. 21त्यांनी सात गोर्हे, सात मेंढे, सात नरकोकरे आणि सात बोकडे हे राष्ट्राच्या पापार्पणासाठी#29:21 किंवा शुद्धीकरणाचे अर्पण, पवित्रस्थानासाठी आणि यहूदीयासाठी आणले. राजाने याजकांना, अहरोनाच्या वंशजांना हे सर्व याहवेहच्या वेदीवर अर्पण करण्यास सांगितले. 22तेव्हा त्यांनी गोर्ह्यांचा वध केला आणि याजकांनी रक्त घेऊन वेदीवर शिंपडले; नंतर त्यांनी मेंढ्यांची कत्तल केली आणि त्यांचे रक्त वेदीवर शिंपडले. त्यानंतर त्यांनी कोकऱ्यांचा वध केला आणि त्यांचे रक्त वेदीवर शिंपडले. 23पापार्पणासाठी असलेले बोकड राजा आणि जमलेल्या मंडळीसमोर आणले आणि त्यांनी त्यांचे हात त्यांच्यावर ठेवले. 24याजकांनी नंतर बोकडांचा वध केला आणि त्यांचे रक्त सर्व इस्राएलसाठी प्रायश्चिताचे पापार्पण म्हणून वेदीवर अर्पण केले, कारण राजाने सर्व इस्राएलसाठी होमार्पण आणि पापार्पण करण्याची आज्ञा दिली होती.
25दावीद राजा, राजाचा संदेष्टा गाद आणि नाथान संदेष्ट्यांनी सांगितल्याप्रमाणे झांजा, वीणा आणि तंतुवाद्ये घेऊन त्याने लेवींना याहवेहच्या मंदिरात ठेवले; अशी आज्ञा याहवेहनी त्यांच्या संदेष्ट्यांद्वारे दिली होती. 26म्हणून लेवीय लोक दावीदाची वाद्ये आणि याजक तुतारी घेऊन तयार उभे राहिले.
27हिज्कीयाहने वेदीवर बलिदानांचे होमार्पण करण्याची आज्ञा दिली. अर्पण सुरू झाले तेव्हाच इस्राएलचा राजा दावीदाची वाद्ये आणि कर्ण्यांसह याहवेहसाठी गीते गाण्यास सुरुवात झाली. 28जमलेल्या संपूर्ण सभेतील लोकांनी वाकून आराधना केली, त्यावेळेस वादक वाद्य आणि कर्णे वाजवित होते. बलिदानांचे होमार्पण पूर्ण होईपर्यंत हे सर्व सुरू होते.
29जेव्हा अर्पणे करण्याचे संपले, तेव्हा राजा आणि त्याच्याबरोबर उपस्थित असलेल्या प्रत्येकजणांनी गुडघे टेकले आणि आराधना केली. 30राजा हिज्कीयाह आणि त्याच्या अधिकाऱ्यांनी लेवींना दावीद आणि संदेष्टा आसाफ यांच्या शब्दांमध्ये याहवेहची स्तुती करण्याचा आदेश दिला. म्हणून त्यांनी आनंदाने स्तुतिगीते गायली आणि खाली वाकून आराधना केली.
31तेव्हा हिज्कीयाह म्हणाला, “तुम्ही आता स्वतःला याहवेहना समर्पित केले आहे. या आणि याहवेहच्या मंदिरात बलिदाने आणि उपकारस्तुतीची अर्पणे आणा.” म्हणून जमलेल्या लोकांनी बलिदाने आणि उपकारस्तुतीची अर्पणे आणली आणि ज्या सर्वांची अंतःकरणापासून इच्छा होती त्यांनी होमार्पणे आणली.
32तिथे जमलेल्या लोकांनी आणलेल्या होमार्पणांची संख्या सत्तर गोऱ्हे, शंभर मेंढे आणि दोनशे नरकोकरे होती; हे सर्व याहवेहसमोर होमार्पणासाठी आणले होते. 33बलिदाने म्हणून शुद्ध केलेल्या प्राण्यांमध्ये सहाशे गोऱ्हे, आणि तीन हजार मेंढ्या आणि बोकडे होते. 34तरीसुद्धा सर्व होमार्पणाची कातडी काढण्यासाठी याजक फारच कमी होते. म्हणून त्यांचे नातेवाईक लेवी लोकांनी त्यांना दिलेले काम पूर्ण होईपर्यंत आणि इतर याजकांचे शुद्धीकरण होईपर्यंत मदत केली, कारण लेवी लोक स्वतःचे शुद्धीकरण करण्यामध्ये याजकांपेक्षा अधिक प्रामाणिक होते. 35शांत्यर्पणाची चरबी आणि पेयार्पणे यांच्याबरोबरच होमार्पणे विपुल प्रमाणात होती.
अशा रीतीने याहवेहच्या मंदिरातील सेवा पुन्हा प्रस्थापित झाली. 36परमेश्वराने त्यांच्या लोकांसाठी हे त्वरित सिद्धीस नेले होते, म्हणून हिज्कीयाह आणि सर्व लोक आनंदित झाले.
सध्या निवडलेले:
2 इतिहास 29: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.