2 इतिहास 31
31
1जेव्हा हे सर्व समाप्त झाले, तेव्हा तिथे असलेले इस्राएली लोक बाहेर पडून यहूदीयाच्या नगरांमध्ये गेले व त्यांनी पूजास्तंभ फोडून टाकले, अशेराचे स्तंभ नष्ट करून टाकले. त्यांनी यहूदीया, बिन्यामीन आणि एफ्राईम व मनश्शेह येथील उच्च स्थाने आणि वेद्या नष्ट केल्या. त्यांनी ते सर्व नष्ट केल्यानंतर, इस्राएली लोक स्वतःच्या गावी आणि स्वतःच्या वतनाकडे परत आले.
उपासनेसाठी देणग्या
2हिज्कीयाहने याजक आणि लेवी यांची निरनिराळ्या विभागांवर—त्यांच्यातील प्रत्येकाने याजक किंवा लेवी यांनी त्यांना दिलेल्या कार्यानुसार—होमार्पण आणि शांत्यर्पण करण्यासाठी, सेवा करण्यासाठी आणि याहवेहच्या निवासस्थानाच्या फाटकांजवळ उपकारस्तुती आणि स्तुतिगान करण्यासाठी नेमणूक केली. 3राजाने सकाळ आणि संध्याकाळच्या होमार्पणासाठी आणि शब्बाथ, नवचंद्र आणि याहवेहच्या नियमात लिहिल्याप्रमाणे ठरवून दिलेल्या सणांसाठी स्वतःच्या मालमत्तेतून दान दिले. 4त्याने यरुशलेममध्ये राहणाऱ्या लोकांना याजक आणि लेवींना त्यांचा योग्य भाग देण्याची आज्ञा केली, ज्यामुळे ते स्वतःला याहवेहच्या नियमशास्त्रासाठी समर्पित करू शकतील. 5आदेश बाहेर पडताक्षणीच इस्राएली लोकांनी उदारतेने त्यांच्या धान्याचे, नवीन द्राक्षारसाचे, जैतून तेलाचे आणि मधाचे आणि शेतात जे काही उत्पन्न आले त्याचे प्रथमफळ दिले. त्यांनी प्रत्येक गोष्टीचा दशांश मिळून एक मोठा भाग आणला. 6यहूदीयाच्या गावांमध्ये राहणाऱ्या इस्राएली आणि यहूदीयाच्या लोकांनीसुद्धा त्यांची गुरे आणि कळप यांचा दशांश आणि त्यांचा परमेश्वर याहवेहना समर्पित केलेल्या पवित्र वस्तूंचा दशांश आणला आणि त्याचा ढीग रचला. 7त्यांनी तिसऱ्या महिन्यात या कामाची सुरुवात केली आणि सातव्या महिन्यात ते पूर्ण केले. 8जेव्हा हिज्कीयाह आणि त्याचे अधिकारी आले आणि त्यांनी तो ढीग पाहिला, तेव्हा त्यांनी याहवेहची स्तुती केली आणि त्यांच्या इस्राएली लोकांना आशीर्वाद दिला.
9हिज्कीयाहने याजकांना आणि लेवीय लोकांना ढिगाबद्दल विचारले; 10आणि सादोकच्या घराण्यातील अजर्याह या मुख्य याजकाने उत्तर दिले, “लोकांनी याहवेहच्या मंदिरात त्यांची वर्गणी आणण्यास सुरुवात केली, तेव्हापासून आपल्याकडे खाण्यास पुरेसे आणि भरपूर असे उरले आहे, कारण याहवेहनी त्यांच्या लोकांना आशीर्वाद दिला आहे आणि हा मोठा भाग उरला आहे.”
11हिज्कीयाहने याहवेहच्या मंदिरात भांडारगृहे तयार करण्याची आज्ञा दिली आणि ते काम पूर्ण झाले. 12नंतर त्यांनी विश्वासूपणाने वर्गणी, दशांश आणि समर्पित भेटवस्तू आणल्या. कनन्याह नावाचा लेवी या सर्व गोष्टींचा प्रभारी पर्यवेक्षक होता आणि त्याचा भाऊ शिमी त्याच्या नंतरच्या श्रेणीतील अधिकारी होता. 13यहीएल, अजज्याह, नहाथ, असाहेल, यरिमोथ, योजाबाद, एलीएल, इस्माकियाह, महथ आणि बेनाइयाह हे कनन्याह आणि त्याचा भाऊ शिमीचे सहायक होते. या सर्वांना राजा हिज्कीयाहने नियुक्त केल्यामुळे त्यांनी सेवा केली आणि अजर्याह परमेश्वराच्या मंदिराचा नियुक्त प्रभारी अधिकारी म्हणून सेवा करीत होता.
14इम्नाह लेवीचा पुत्र कोरे, पूर्वेकडील वेशीचा रखवालदार, परमेश्वराला स्वैच्छिक अर्पणावरील याहवेहना मिळालेल्या वर्गणीचे वाटप करणे आणि पवित्र भेटवस्तू यावरील अधिकारी होता. 15एदेन, मिन्यामीन, येशूआ, शमायाह, अमर्याह आणि शखन्याहनी त्याला विश्वासयोग्यतेने याजकांच्या गावांमध्ये त्यांच्याबरोबर असलेल्या वृद्ध आणि तरुण याजकांना त्यांच्या विभागानुसार वाटप करण्यासाठी मदत केली.
16त्या शिवाय त्यांनी तीन वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या पुरुषांना ज्यांची नावे वंशावळीच्या नोंदींमध्ये होती त्यांना वाटप केले, जे सर्व लोक त्यांच्या जबाबदाऱ्या आणि त्यांच्या विभागानुसार त्यांची रोजची वेगवेगळी नेमून दिलेली सेवा पार पाडण्यासाठी याहवेहच्या मंदिरात प्रवेश करतील. 17आणि त्यांनी त्यांच्या घराण्यांनी नोंदविलेल्या वंशावळीतील याजकांना आणि त्याचप्रमाणे वीस वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या लेवींना त्यांच्या जबाबदाऱ्या आणि विभागणी यानुसार वाटून दिल्या. 18त्यांनी सर्व लहान मुले, स्त्रिया आणि संपूर्ण समाजातील पुत्र व कन्या यांचा या वंशावळीच्या नोंदीमध्ये समावेश केला. कारण स्वतःला पवित्र करण्यामध्ये ते प्रामाणिक होते.
19याजक, जे अहरोनाचे वंशज होते ते त्यांच्या गावांच्या आसपासच्या शेतजमिनीवर किंवा इतर कोणत्याही नगरांमध्ये राहत होते, त्यांच्यातील प्रत्येक पुरुषाला आणि लेव्यांच्या वंशावळीमध्ये ज्यांची नोंद झाली होती, त्या सर्वांना भागांचे वाटप करण्यासाठी नावानुसार पुरुष नेमले गेले.
20हिज्कीयाहने संपूर्ण यहूदीयामध्ये जे चांगले आणि योग्य होते तेच केले आणि त्याचे परमेश्वर याहवेहसमोर तो विश्वासू राहिला. 21परमेश्वराच्या मंदिराचे जे काही सेवाकार्य त्याने हाती घेतले आणि नियम व आज्ञाचे पालन करण्यामध्ये त्याने त्याच्या परमेश्वराचा सल्ला घेतला आणि संपूर्ण अंतःकरणापासून काम केले आणि त्यामुळे तो समृद्ध झाला.
सध्या निवडलेले:
2 इतिहास 31: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.