YouVersion लोगो
सर्च आयकॉन

2 इतिहास 32

32
सन्हेरीब यरुशलेमला धमकी देतो
1हिज्कीयाहने इतके सर्व विश्वासूपणाने केल्यानंतर, अश्शूरचा राजा सन्हेरीबने यहूदीयावर आक्रमण केले. त्याने तटबंदीच्या शहरांना वेढा घातला या विचाराने की, ती स्वतःसाठी जिंकून घ्यावी. 2जेव्हा हिज्कीयाहने पाहिले की सन्हेरीब आला आहे आणि यरुशलेमविरुद्ध युद्ध करण्याचा त्याचा उद्देश आहे, 3तेव्हा त्याने त्याच्या अधिकाऱ्यांबरोबर आणि सैन्यातील कर्मचाऱ्यांबरोबर शहरा बाहेरील झर्‍यांचे पाणी बंद करण्याविषयी सल्ला घेतला आणि त्यांनी त्याला मदत केली. 4त्यांनी लोकांचा एक मोठा गट जमविला, त्यांनी सर्व झरे आणि जमिनीमधून वाहणारे बंद केले. ते म्हणाले “अश्शूरच्या राजाने यावे आणि त्याने भरपूर पाणी का मिळवावे?” 5नंतर त्याने भिंतीचे तुटलेले सर्वभाग दुरुस्त करून त्यावर अत्यंत परिश्रमाने बुरूज बांधले. त्याने त्या भिंतीबाहेर दुसरी भिंत बांधली आणि दावीद नगरीच्या एकमेकांना लागून बांधलेल्या घरांची छते मजबूत केली. त्याने मोठ्या संख्येने शस्त्रे आणि ढालीसुद्धा तयार केल्या.
6त्याने लोकांवर सैन्य अधिकारी नेमले आणि त्यांना शहराच्या वेशीवरील चौकामध्ये त्याच्यासमोर आणले आणि त्यांना या शब्दांनी प्रोत्साहन दिले: 7“बलवान आणि धैर्यशील असा. अश्शूरचा राजा आणि त्याच्याबरोबर असलेले मोठे सैन्यामुळे तुम्ही घाबरून जाऊ नका किंवा निराश होऊ नका, कारण त्याच्यापेक्षा मोठी शक्ती आपल्यासह आहे. 8त्यांच्याबरोबर फक्त शारीरिक शस्त्र आहेत, परंतु आपल्याला मदत करण्यासाठी आणि आपले युद्ध करण्यासाठी आपले परमेश्वर याहवेह आपल्याबरोबर आहेत.” आणि यहूदीयाचा राजा हिज्कीयाह जे काही बोलला त्यावरून लोकांचा आत्मविश्वास वाढला.
9नंतर, जेव्हा अश्शूरचा राजा सन्हेरीब आणि त्याच्या सर्व सैन्याने लाखीशला वेढा घातला, तेव्हा त्याने यहूदीयाचा राजा हिज्कीयाह राजा आणि यहूदीयाच्या सर्व लोकांसाठी हा संदेश त्याच्या अधिकाऱ्यांबरोबर देऊन त्यांना यरुशलेमकडे पाठवले:
10“अश्शूरचा राजा सन्हेरीब असे म्हणतो: तुम्ही कशावर भरवसा टेकवून तुम्ही या वेढ्यात यरुशलेममध्ये राहिला आहात? 11जेव्हा हिज्कीयाह म्हणतो, ‘याहवेह आमचे परमेश्वर हे आम्हाला अश्शूरच्या राजाच्या हातातून वाचवतील,’ तर तुम्ही भुकेले आणि तहानलेले असे होऊन मरावे म्हणून तो तुमची दिशाभूल करत आहे. 12हिज्कीयाहने स्वतःच या दैवताची उच्च स्थाने आणि वेद्या काढून टाकून यहूदीया आणि यरुशलेमला सांगितले नाही का की, ‘तुम्ही एकाच वेदीसमोर आराधना करावी आणि तिच्यावर होमार्पणे करावी?’
13“तुम्हाला हे माहीत नाही का, की मी आणि माझ्या आधीच्या लोकांनी इतर देशातील सर्व लोकांचे काय केले? त्या राष्ट्रांच्या दैवतांनी कधीतरी माझ्या हातातून त्यांच्या राष्ट्रांची सुटका केली आहे काय? 14माझ्या आधी या जागेवर काम करणाऱ्यांनी ज्या राष्ट्रांचा नाश केला त्यांच्या सर्व दैवतांपैकी कोणीतरी त्याच्या लोकांना माझ्यापासून वाचवू शकले का? तर मग तुमचे दैवत तुम्हाला माझ्या हातून कसे बरे सोडवेल? 15तर आता हिज्कीयाहने तुमची फसवणूक करू नये आणि तुमची अशाप्रकारे दिशाभूल करू नये. त्याच्यावर विश्वास ठेवू नका, कारण कोणत्याही राष्ट्राचे किंवा राज्याचे कोणतेही दैवत त्याच्या लोकांना माझ्या हातातून किंवा माझ्या पूर्वीच्या लोकांच्या हातातून सोडवू शकले नाही. तुमचे दैवत तुम्हाला माझ्या हातून कसे सोडवेल!”
16सन्हेरीबचे अधिकारी परमेश्वर याहवेहविरुद्ध आणि त्यांचा सेवक हिज्कीयाहविरुद्ध पुढे बोलले. 17राजाने इस्राएलचे परमेश्वर याहवेहची थट्टा करणारी पत्रेही लिहिली आणि त्यांच्याविरुद्ध असे म्हटले: “जशी इतर देशातील लोकांच्या दैवतांनी त्यांच्या लोकांची माझ्या हातून सुटका केली नाही, त्याचप्रमाणे हिज्कीयाहचे दैवत त्याच्या लोकांना माझ्या हातातून सोडविणार नाही.” 18तेव्हा ते शहर जिंकण्यासाठी त्यांनी तटबंदीवर असलेल्या यरुशलेमच्या लोकांना घाबरवून सोडण्यासाठी आणि त्यांना भीती वाटावी यासाठी यहूदीयाच्या हिब्रू भाषेत मोठ्याने ओरडले. 19यरुशलेमच्या परमेश्वराविषयी ते बोलले, जसे जगातील इतर लोकांची दैवते—म्हणजे मनुष्याची हस्तकृती—त्यांच्याबद्दल त्यांनी तसेच केले होते.
20राजा हिज्कीयाह आणि आमोजाचा पुत्र यशायाह संदेष्टा यांनी याबद्दल रडून स्वर्गाकडे प्रार्थना केली. 21आणि याहवेह यांनी एक देवदूत पाठवला, त्याने अश्शूरच्या राजाच्या छावणीतील सर्व लढवय्ये, सेनापती आणि अधिकारी यांचा नाश केला. त्यामुळे तो अपमानित होऊन स्वतःच्या भूमीकडे मागे फिरला. आणि जेव्हा तो त्याच्या दैवताच्या मंदिरात गेला तेव्हा त्याच्या काही मुलांनी, जे त्याचे स्वतःचे रक्त आणि मांस होते, त्यांनी त्याला तलवारीने कापले.
22अशाप्रकारे याहवेहनी हिज्कीयाह आणि यरुशलेमच्या लोकांना अश्शूरचा राजा सन्हेरीबच्या हातातून आणि इतर सर्वांच्या हातातून वाचविले. त्यांनी सर्वप्रकारे त्यांची काळजी घेऊन त्यांना विसावा दिला. 23पुष्कळ जणांनी यरुशलेमकडे याहवेहसाठी अर्पणे आणली आणि यहूदीयाचा राजा हिज्कीयाह याच्यासाठी मौल्यवान भेटवस्तू आणल्या. तेव्हापासून तो सर्व राष्ट्रांद्वारे अत्यंत आदरणीय मानला गेला.
हिज्कीयाहचा गर्व, यश आणि मृत्यू
24त्या दिवसांमध्ये हिज्कीयाह राजा आजारी पडला आणि मरणपंथाला लागला. त्याने याहवेहकडे प्रार्थना केली ज्यांनी त्याला उत्तर दिले आणि एक आश्चर्यकारक चिन्ह दिले. 25परंतु हिज्कीयाहचे मन गर्विष्ठ होते आणि त्याच्यावर दाखविलेल्या दयेला त्याने अनुकूल प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्याच्यावर आणि यहूदीया व यरुशलेमवर याहवेहचा कोप आला होता. 26तेव्हा हिज्कीयाहने त्याच्या अंतःकरणातील गर्वाबद्दल पश्चात्ताप केला; तसेच यरुशलेमच्या लोकांनीसुद्धा केले; त्यामुळेच हिज्कीयाहच्या कार्यकालामध्ये याहवेहचा क्रोध त्यांच्यावर आला नाही.
27हिज्कीयाहकडे फार मोठी संपत्ती आणि सन्मान होता आणि त्याने त्याच्याकडे असलेले चांदी आणि सोने आणि मौल्यवान रत्ने, मसाले, ढाली आणि सर्वप्रकारच्या मौल्यवान वस्तूंसाठी भांडारे तयार केली. 28हंगामाचे धान्य, नवीन द्राक्षारस आणि जैतुनाचे तेल यांचा साठा ठेवण्यासाठी त्याने इमारती बांधल्या; आणि त्याने वेगवेगळ्या प्रकारची गुरे आणि कळपांसाठी गोठे, मेंढवाडे बांधले. 29त्याने गावे विकसित केली आणि अधिक संख्येने गुरे मिळविली, कारण परमेश्वराने त्याला खूप मोठी संपत्ती दिली होती.
30हिज्कीयाहनेच गीहोन झर्‍याचा वर जाणारा मार्ग अडविला आणि पाण्याचा मार्ग दावीदाच्या नगरीच्या पश्चिमेकडे नेला. त्याने हाती घेतलेल्या प्रत्येक गोष्टीत तो यशस्वी झाला. 31परंतु त्या देशात घडलेल्या चमत्कारिक चिन्हाबद्दल त्याला विचारण्यासाठी बाबेलच्या राज्यकर्त्यांनी जेव्हा दूत पाठवले, तेव्हा परमेश्वराने त्याची परीक्षा घेण्यासाठी आणि त्याच्या अंतःकरणातील सर्वकाही जाणून घेण्यासाठी त्याला सोडून दिले.
32हिज्कीयाहच्या कारकिर्दीतील इतर सर्व घटना व त्याच्या श्रद्धेचे कार्य आमोजाचा पुत्र यशायाह संदेष्ट्याच्या दर्शनात त्याने लिहिलेल्या यहूदीयाच्या व इस्राएलच्या राजांच्या पुस्तकात नमूद केल्या आहेत. 33हिज्कीयाह त्याच्या पूर्वजांबरोबर विसावा पावला आणि त्याला दावीदाच्या वंशजांबरोबर डोंगरावरील कबरेत पुरण्यात आले. तो मरण पावला तेव्हा सर्व यहूदीया व यरुशलेमच्या लोकांनी त्याचा सन्मान केला. आणि वारस म्हणून त्याचा पुत्र मनश्शेह राजा झाला.

सध्या निवडलेले:

2 इतिहास 32: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन