2 इतिहास 36
36
1आणि त्या देशातील लोकांनी योशीयाहचा पुत्र यहोआहाजला यरुशलेमात त्याच्या पित्याच्या जागेवर राजा केले.
यहूदीयाचा राजा यहोआहाज
2वयाच्या तेवीसाव्या वर्षी यहोआहाज राजा झाला आणि त्याने तीन महिने यरुशलेमात राज्य केले. 3इजिप्तच्या राजाने त्याला यरुशलेममध्ये राज्यपदावरून खाली पाडले आणि यहूदीयावर शंभर तालांत#36:3 अंदाजे 3.4 मेट्रिक टन चांदी आणि एक तालांत#36:3 अंदाजे 34 कि.ग्रॅ. सोने असा कर लादला. 4इजिप्तच्या राजाने यहोआहाजचा भाऊ एल्याकीम याला यहूदीया आणि यरुशलेमचा राजा केले आणि एल्याकीमचे नाव बदलून यहोयाकीम ठेवले. परंतु नखोने एल्याकीमचा भाऊ यहोआहाजाला घेऊन इजिप्तमध्ये नेले.
यहूदीयाचा राजा यहोयाकीम
5वयाच्या पंचवीसाव्या वर्षी यहोयाकीम राजा झाला आणि त्याने यरुशलेममध्ये अकरा वर्षे राज्य केले. त्याने याहवेह त्याच्या परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते केले. 6बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरने त्याच्यावर हल्ला केला आणि त्याला बाबेलला घेऊन जाण्यासाठी त्याला कास्याच्या साखळदंडाने बांधले. 7नबुखद्नेस्सरने याहवेहच्या मंदिरातील वस्तूसुद्धा बाबेलमध्ये नेल्या आणि त्या तिथे त्याच्या मंदिरात#36:7 किंवा राजवाड्यात ठेवल्या.
8यहोयाकीमच्या कारकिर्दीतील इतर घटना, त्याने केलेल्या घृणास्पद गोष्टी आणि त्याच्याविरुद्ध जे काही होते, ते सर्व इस्राएली आणि यहूदीयाच्या राजांच्या पुस्तकात लिहिलेल्या आहेत. आणि त्याचा वारस म्हणून त्याचा पुत्र यहोयाखीन राजा झाला.
यहोयाखीन यहूदीयाचा राजा
9वयाच्या अठराव्या वर्षी यहोयाखीन राजा झाला आणि त्याने यरुशलेमात तीन महिने दहा दिवस राज्य केले. त्याने याहवेहच्या दृष्टीने वाईट ते केले. 10वसंतऋतूमध्ये राजा नबुखद्नेस्सरने त्याला बोलाविणे पाठवले आणि त्याला बाबेलमध्ये आणले, त्याचबरोबर याहवेहच्या मंदिरातील मौल्यवान वस्तू आणल्या आणि त्याने यहोयाखीनचा काका सिद्कीयाहला यहूदीया आणि यरुशलेमवर राजा केले.
यहूदीयाचा राजा सिद्कीयाह
11सिद्कीयाह एकवीस वर्षाचा असताना राजा झाला आणि त्याने यरुशलेमात अकरा वर्षे राज्य केले. 12त्याने त्याचे परमेश्वर याहवेह यांच्या दृष्टीने जे वाईट ते केले आणि यिर्मयाह संदेष्टाने याहवेहचे वचन त्याला सांगितले, तरी त्यांच्यासमोर तो नम्र झाला नाही. 13ज्याने त्याला परमेश्वराच्या नावाने शपथ घ्यायला लावली होती, त्या बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरविरुद्धही त्याने बंड केले. तो ताठ मानेचा झाला आणि त्याने त्याचे हृदय कठोर केले आणि याहवेह इस्राएलचे परमेश्वर यांच्याकडे तो वळला नाही. 14याव्यतिरिक्त याजकांचे सर्व पुढारी आणि लोक अधिकच अविश्वासू झाले, त्यांनी इतर राष्ट्रांच्या सर्व घृणास्पद प्रथांचे पालन केले आणि यरुशलेममध्ये पवित्र केलेले याहवेह यांचे मंदिर त्यांनी अशुद्ध केले.
यरुशलेमचा पाडाव
15याहवेह, त्यांच्या पूर्वजांचे परमेश्वरानी त्यांच्या संदेष्ट्यांच्याद्वारे त्यांना वारंवार संदेश पाठवले, कारण त्यांनी त्यांच्या लोकांवर आणि त्यांच्या निवासस्थानावर दया केली होती. 16परंतु त्यांनी तिथे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाईपर्यंत परमेश्वराच्या संदेष्ट्यांची चेष्टा केली, याहवेहचा राग त्यांच्या लोकांविरुद्ध चेतवेपर्यंत त्यांच्या शब्दांचा तिरस्कार केला आणि त्यांच्या संदेष्ट्यांची थट्टा केली. 17याहवेहनी खाल्डियन लोकांच्या राजाला त्यांच्याविरुद्ध आणले, ज्यांनी त्यांच्या तरुण पुरुषांना मंदिरात तलवारीने मारले आणि तरुण पुरुष किंवा तरुण स्त्रिया, वृद्ध किंवा जे अशक्त होते त्यांनाही सोडले नाही. परमेश्वराने त्या सर्वांना नबुखद्नेस्सरच्या हाती दिले. 18ज्याने परमेश्वराच्या मंदिरातील मोठ्या आणि लहान सर्व मौल्यवान वस्तू आणि याहवेहच्या मंदिरातील खजिने आणि राजा आणि त्याचे अधिकारी, यांचे खजिने बाबेलला नेले. 19त्यांनी परमेश्वराच्या मंदिराला आग लावली आणि यरुशलेमचे तट पाडून टाकले; त्यांनी सर्व राजवाडे जाळले आणि तेथील सर्व मौल्यवान वस्तूंचा नाश केला.
20तलवारीच्या घातापासून सुटलेल्या लोकांना तो बाबेलला बंदिवासात घेऊन गेला आणि पर्शियाचे राज्य सत्तेवर येईपर्यंत ते त्याचे आणि त्याच्यानंतर येणाऱ्यांचे सेवक झाले. 21भूमीने शब्बाथाच्या विश्रांतीचा आनंद घेतला; यिर्मयाहने सांगितलेल्या याहवेहच्या वचनाच्या पूर्णतेची सत्तर वर्षे होईपर्यंत त्या भूमीने तिच्या उजाडपणाच्या सर्व वेळेत विसावा घेतला.
22यिर्मयाहने सांगितलेला याहवेहचा संकल्प पूर्ण व्हावा म्हणून पर्शियाचा राजा कोरेशच्या कारकिर्दीच्या पहिल्याच वर्षी पुढील जाहीरनामा लिहून आपल्या संपूर्ण साम्राज्यात पाठवावा अशी इच्छा याहवेहने राजाच्या मनात निर्माण केली.
23“पर्शियाचा राजा कोरेश, असे जाहीर करतो की:
“ ‘याहवेह, जे स्वर्गाचे परमेश्वर आहेत, त्यांनी पृथ्वीवरील सर्व राज्ये माझ्याकडे दिली आहेत आणि यहूदीयातील यरुशलेमात त्यांचे मंदिर बांधण्यास माझी नियुक्ती केली आहे. तुमच्यातील जे याहवेहचे लोक आहात तुम्ही तिथे वर जाऊ शकता आणि त्यांचे परमेश्वर त्यांच्याबरोबर असोत.’ ”
सध्या निवडलेले:
2 इतिहास 36: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.